News Flash

अंजूम चोप्रा

अंजूमच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली.

भारताची माजी कर्णधार अंजूम चोप्राला मेरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) प्रतिष्ठेचे आजीव सदस्यत्व बहाल करून तिच्या शिरपेचात मानाचा तुराच जणू खोवला आहे. हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू. पण हे पहिलेपण भारतीय क्रिकेटमध्ये तिने अनेकदा अनुभवले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक अंजूमच्या नावावर आहे. याचप्रमाणे देशासाठी शंभर एकदिवसीय सामने खेळण्याचा पराक्रम असो किंवा सहा विश्वचषक (चार एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२०) स्पर्धा खेळण्याचा मान अशा अनेक यशांनी तिची कारकीर्द चर्चेत राहिली.

अंजूमच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली. २००२ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून ही अभूतपूर्व यशोगाथा लिहिली होती. याच वर्षी तिच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध ५-० असे निभ्रेळ यश मिळवले होते. घरातच खेळासाठी अनुकूल वातावरण लाभल्यामुळे शाळा-महाविद्यालयाच्या दिवसांमध्ये अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, जलतरण आदी अनेक खेळांमध्ये तिने ठसा उमटवला. राष्ट्रीय बास्केटबॉल स्पध्रेत तिने दिल्लीचे प्रतिनिधित्वसुद्धा केले. मात्र क्रिकेटची आवड तिने जिवापाड जोपासली. त्यामुळेच वयाच्या १७व्या वर्षी तिला आंतरराष्ट्रीय पदार्पण करता आले. १९९५ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापासून हा प्रवास सुरू झाला. तेव्हापासून पुढील १४ वष्रे तिने भारतीय क्रिकेटची सेवा केली. १२ कसोटी, १२७ एकदिवसीय आणि १८ ट्वेन्टी-२० सामन्यांत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची तांत्रिक सल्लागार म्हणून तिने २०१२-१३ या वर्षांत काम पाहिले आहे. याशिवाय पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे समालोचन करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. देशात पुरुषांच्या क्रिकेटला मिळणारी राजेशाही वागणूक महिला क्रिकेटला मिळत नाही. या विरोधात अंजूमने आवाज उठवला होता. कठीण परिस्थितीत जिद्दीने खेळत संघाला विजयासमीप नेण्याचे तिचे कर्तृत्व अनेकदा मैदानावर दिसून आले. दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर तिने उद्योग प्रशासन विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या वेळी विपणन आणि मानव संसाधन हे तिचे प्रमुख विषय होते. त्यामुळेच आता अनेक प्रथितयश कंपन्या आणि महाविद्यालयांमध्ये ती मार्गदर्शनपर व्याख्याने देते. याशिवाय ‘वुमन्स क्रिकेट वर्ल्ड – ए जर्नी फ्रॉम १७४५-२०१३’ या पुस्तकाची ती सहलेखिका आहे. २०११ मध्ये ‘पुअर कझिन्स ऑफ मिलियन डॉलर बेबीज’ या माहितीपटात तिने काम केले होते. क्रिकेटमधील स्त्री-पुरुष भेदाभेद आणि तरीही खेळाचा यथेच्छ आनंद लुटणाऱ्या महिला खेळाडू यांच्यावर आधारित हा माहितीपट होता. ‘खतरों के खिलाडी’ या मालिकेतसुद्धा ती आव्हानांचा सामना करताना दिसली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 3:17 am

Web Title: anjum chopra
Next Stories
1 डॉ. बिभूती लहकार
2 शंकर बडे
3 नलिनीधर भट्टाचार्य
Just Now!
X