02 March 2021

News Flash

इगोर स्टिमॅच

स्टिमॅच यांनीच, क्रोएशियाला २०१४च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

इगोर स्टिमॅच

स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांच्या चार वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय फुटबॉल संघ बऱ्यापैकी मजल मारेल, असे वाटले होते. पण जानेवारी महिन्यात एएफसी आशियाई चषक स्पर्धेतील गच्छंतीनंतर कॉन्स्टन्टाइन यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यावर आता भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी क्रोएशियाच्या इगोर स्टिमॅच यांच्याकडे सोपवण्यात आली आहे!

ते भारतीय संघाचे पहिले सुपरिचित आणि वलयांकित प्रशिक्षक ठरतात. गतवर्षी क्रोएशियाने विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. त्या संघाचे प्रेरणास्थान होता क्रोएशियाचा नव्वदच्या दशकातील संघ. या संघाने १९९८च्या विश्वचषक स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकवताना उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीसारख्या बलाढय़ संघाला ३-० अशी धूळ चारली होती. त्या संघाचा एक आधारस्तंभ होता इगोर स्टिमॅच. स्टिमॅच एक उत्तम बचावपटू होते. पण एक फुटबॉलपटू यापलीकडे त्यांची ओळख विविधरंगी आहे. त्यांची स्वतची बेटिंग कंपनी होती, जी अपयशी ठरली. त्यांनी ऑलिव्ह तेल आणि वाइनच्या व्यवसायात यश मिळवले. संगीताची आवड होती आणि स्टिमॅच यांचे एक गीत (जे त्यांनी गायले आणि गिटारही वाजवली) तुफान लोकप्रिय झाले होते. स्टिमॅच काही वेळा वादांमध्येही सापडले. समलिंगी संबंधांविरुद्ध त्यांनी जाहीर भूमिका घेतली होती. बाल्कन यादवीमुळे क्रोएशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती असता एका सामन्यापूर्वी ‘फुटबॉल मैदानाऐवजी रणभूमीवर जायला आवडले असते’ असे त्यांनी म्हटले होते. १९८७ मध्ये २० वर्षांखालील फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या युगोस्लाव्हिया संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्याचबरोबर ‘सेंटरबॅक’ म्हणून वेस्टहॅम युनायटेड या इंग्लिश प्रीमिअर लीगमधील क्लबकडून ते दोन वर्षे खेळले आहेत. काही क्लबचे प्रशिक्षकपद सांभाळल्यानंतर २०१२मध्ये त्यांच्याकडे क्रोएशियाच्या राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपवण्यात आली. स्टिमॅच यांनीच, क्रोएशियाला २०१४च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. कतारमधील अल-शहानिया क्लबचे प्रशिक्षकपदही त्यांनी भूषवले आहे. हॅरी राइट, बॉब हॉटन, विम कोएवरमन्स आणि कॉन्स्टन्टाइन यांच्यानंतर भारतीय संघाला फुटबॉलच्या इतिहासामधील सर्वात प्रसिद्ध प्रशिक्षक लाभल्यामुळे स्टिमॅच यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

थायलंड येथे ५ जूनपासून सुरू होणाऱ्या किंग्ज चषक स्पर्धेपासून स्टिमॅच यांच्या कर्तृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. १८ वर्षे प्रशिक्षकपदाचा अनुभव गाठीशी असलेल्या स्टिमॅच यांच्यासमोर दुसरे आव्हान असेल ते भारताला फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरवण्याचे. दोन वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात स्टिमॅच हे भारतीय फुटबॉलला कोणत्या उंचीवर नेऊन ठेवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2019 12:25 am

Web Title: croatian igor stimac become india football coach
Next Stories
1 डोरिस डे
2 डॉ. सी. व्ही. पटेल
3 अभय परांजपे
Just Now!
X