निव्वळ राजेशाह्य, लढाया किंवा भारतीय परिप्रेक्ष्यात ब्रिटिश सत्तेच्या पलीकडे पाहून दक्षिण आशिया व त्यातही दक्षिण भारताच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या इतिहास संशोधकांमध्ये डेव्हिड वॉशब्रुक हे नाव अग्रणी ठरते. त्यांचे अलीकडेच निधन झाले. पण ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचा अभ्यास भांडवलशाही व वर्गसंघर्षांच्या अंगाने करण्याचा निराळा पायंडा त्यांनी आपल्या लेखन व संशोधनातून पाडला. वॉशब्रुक यांनी केंब्रिज विद्यापीठातून इतिहास विषयात पदवी घेतली. तेथेच त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. मग केंब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात ते काही काळ रिसर्च फेलो होते. पुढे वॉर्विक विद्यापीठात इतिहासाचे अध्यापन, अमेरिकेत हार्वर्ड आणि पेनसिल्वेनिया विद्यापीठांमध्ये अभ्यागत  अध्यापकाच्या भूमिकेतून अध्यापन असे करत ते ऑक्सफर्ड विद्यापीठात भारतीय इतिहासाचे प्रपाठक म्हणून रुजू झाले. मात्र त्यांचा केंब्रिजशी ऋणानुबंध कायम राहिला. ऑक्सफर्डचे सेंट अँटनी महाविद्यालय आणि केंब्रिजचे ट्रिनिटी महाविद्यालय या दोन प्रतिष्ठित संस्थात एकाच वेळी अध्यापन-संशोधन करणाऱ्या दुर्मीळ अभ्यासकांमध्ये त्यांची गणना होते.

‘साउथ इंडिया : पोलिटिकल इन्स्टिटय़ुशन्स अँड पोलिटिकल चेंज, १८८०-१९४०’ (१९७५, सहलेखक ख्रिस्तोफर बेकर) आणि ‘द इमर्जन्स ऑफ प्रोव्हिन्शियल पॉलिटिक्स : द मद्रास प्रेसिडेन्सी, १८७०-१९२०’ (१९७६) हे त्यांचे सुरुवातीचे ग्रंथ वॉशब्रुक यांना ब्रिटिशकालीन दक्षिण भारताचे साक्षेपी अभ्यासक अशी ओळख बहाल करण्यात महत्त्वाचे ठरले. त्यांचे पुढील अनेक निबंध अर्थव्यवस्था, कृषीव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था यांचे परस्परसंबंध नव्याने प्रस्थापित करणारे ठरले. आज ऑक्सफर्ड विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम, तसेच तेथील प्राच्यविद्या विभागात त्यांचे लेखन संदर्भग्रंथ म्हणून मान्यता पावले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था पूर्वी समृद्ध होती का, ती ब्रिटिश साम्राज्याने खरोखरच खिळखिली केली का, मग ब्रिटिशांची लोकशाही मूल्ये सर्वार्थाने आजही आपल्या समाजात का रुजू शकली नाहीत असे प्रश्न पडणाऱ्यांसाठी वॉशब्रुक यांचे संशोधनपर लेखन अतिशय उद्बोधक आणि मार्गदर्शक ठरेल. इतिहास हा चर्चा, वाद-प्रतिवादाचा विषय असला पाहिजे याविषयी ते आग्रही होते. वरकरणी त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय ऋजू आणि खेळकर होते. परंतु त्यांच्या लेखणीची धार भल्याभल्यांचा थरकाप उडवी. खास ब्रिटिश चिकित्सक तिरकसपणा त्यांच्या लेखनातून जाणवतो.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या भारतात धर्मनिरपेक्षतावाद रुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु हा धर्मनिरपेक्षतावाद पाश्चिमात्य धाटणीचा व म्हणून पाश्चिमात्य विचारवंतांना मानवणारा होता. तो रुजवताना नेहरूंनी देशी सांस्कृतिक धारणांचा पुरेसा विचार केला नाही. यातून संघर्ष अपेक्षितच होता. याच भूमिकेतील त्रुटीचा फायदा हिंदुत्ववादी उठवताना, नेहरूंना एका विचारसरणीतून खलनायक ठरवण्यात यशस्वी होतात, असे वॉशब्रुक यांनी दाखवून दिले होते. ‘हिंदुत्ववाद’ म्हणजे भारताला एक स्वतंत्र सांस्कृतिक ओळख देण्याचा आणि त्याद्वारे हिंदुत्ववादी भव्यतावादामध्ये समाधान मानून घेण्याचा एक प्रयत्न आहे. त्याच्याला केवळ विभाजनवादी ठरवून दुर्लक्षिता येणार नाही अशा इशाराही त्यांनी दिला होता.