16 December 2017

News Flash

डेरेक वॉलकॉट

अंतरीचे भाव शब्दांत मांडण्याबाबत तुम्ही जेवढे स्थानिक, प्रादेशिक होता..

लोकसत्ता टीम | Updated: March 21, 2017 3:18 AM

अंतरीचे भाव शब्दांत मांडण्याबाबत तुम्ही जेवढे स्थानिक, प्रादेशिक होता.. म्हणजे भूमीशी इमान राखत जाता, तेवढे तुम्ही अधिकाधिक वैश्विक होत जाता, असा एक धारणाप्रवाह साहित्यात आहे. नुकतेच निवर्तलेले ज्येष्ठ कवी, नाटककार, चित्रकार डेरेक वॉलकॉट यांच्याबाबत हा धारणाप्रवाह नि:शंक खरा ठरतो. ‘मी कॅरेबियन लेखक आहे.. मला त्याचा यथायोग्य अभिमान आहे,’ अशी स्पष्ट भूमिका वॉलकॉट यांची होती व त्यावर ते अखेपर्यंत कायम राहिले. २३ जानेवारी १९३० रोजी सेंट ल्युसियाची राजधानी कॅस्ट्रिज येथे झालेला जन्म. वयाच्या १४व्या वर्षी स्वत:च प्रसिद्ध केलेला कवितासंग्रह येथपासून ते साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवण्यापर्यंतचा आणि त्याहीपुढचा वॉलकॉट यांचा प्रवास म्हणजे एका लेखक-कवीचे-कलावंताचे वाढत व विस्तारत जाणेच आहे. गाळणी करून ‘नोबेल’साठीच्या अगदी शेवटच्या फेरीपर्यंत त्यांचे नाव अनेकदा आले, मात्र प्रत्यक्षात त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तो सन १९९२ मध्ये. त्यांची साहित्यरचना.. विशेषत: सन १९९० मध्ये गाजलेल्या ‘ओमेरॉस’ यासाठीचा हा सन्मान होता. ‘ओमेरॉस’चा ऐवज एकदम भरभक्कम. ग्रीक मिथककथेला केंद्रस्थानी ठेवून आणि त्या कथेची आजच्या काळाशी असलेली आणि कॅरेबियन बेटांशी एरवी नसलेली संगती जुळवत वॉलकॉट यांनी हा काव्यखंड सिद्ध केला. तीन-तीन ओळींचा एक गुच्छ, सात पुस्तके व त्यात ६४ प्रकरणे अशी ‘ओमेरॉस’ची मांडणी आहे. ‘वेस्ट इंडियन संस्कृतीला लाभलेला एक थोर कवी’, असे कौतुक वॉलकॉट यांना नोबेल देणाऱ्या स्वीडिश अकादमीने केले होते. ‘ओमेरॉस’मधून वॉलकॉट यांनी दर्शन घडवले ते वेस्ट इंडियन माणसाच्या जगण्याचे, त्याच्या सुखदु:खाचे. या जगण्याला, त्याच्या सुखदु:खाला खास कॅरेबियन भूमीचा गंध बिलगलेला होता. केवळ ‘ओमेरॉस’च नव्हे, तर वॉलकॉट यांच्या समग्र साहित्यातून हाच अकृत्रिम गंध सतत जाणवत राहतो.

वॉलकॉट हे कृष्णवर्णीय. वर्णभेदातून उद्भवणाऱ्या समस्या त्यांनी आयुष्यात थेट अनुभवलेल्या होत्या. वसाहतवादी मनोवृत्तीतून माणसाचे जगण्यातील व्यवहार कसे बदलतात, हे त्यांनी निरखले होते. त्यातून जे साहित्य उगवले ते वर्णाच्या.. खरे तर देशाच्याही सीमा ओलांडणारे होते. कॅरेबियन जगण्याचे समृद्ध आणि तेवढेच गुंतागुंतीचे पैलू हे वॉलकॉट यांच्या लिखाणाचे वैशिष्टय़. कविता, नाटके, चित्रकला यांतून वॉलकॉट यांनी जे मांडले त्यास आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीसह वाचकमान्यताही मिळाली. मात्र, ‘अद्यापही कृष्णवर्णीय लेखक, कलावंत म्हणूनच माझी कप्पेवारी केली जाते,’ अशी भावना वॉलकॉट व्यक्त करीत. इंग्रजी साहित्यातील एक थोर कवी कृष्णवर्णीय आहे, ही गोष्ट अनेक समीक्षकांच्या पचनी पडत नसल्याने त्यांनी त्यांची संभावना प्रादेशिक लेखक, अशी करून टाकल्याची तक्रार तोलामोलाचे सोव्हिएतकालीन कवी जोसेफ ब्रॉडस्की यांनी केली होती. अगदी अलीकडला प्रकार म्हणजे, २००९ साली ‘ऑक्सफर्डचे काव्य-प्राध्यापक’ म्हणून त्यांची नेमणूक होणार, असे वातावरण असताना, २५ वर्षांपूर्वी त्यांनी एका विद्यार्थिनीशी लैंगिक दुर्वर्तन केल्याचा आरोप करणारे पत्र कुणा अनामिकामार्फत निवड समितीकडे पाठविण्यात आले. ही माहिती बाहेर आणवली गेली, तेव्हा ७९ वर्षांच्या वॉलकॉट यांनीच आपण या मानाच्या पदासाठी उमेदवार नाही, असे जाहीर केले.

‘कविता म्हणजे माझ्यासाठी प्रार्थनेसारखीच आहे. तिच्यापासून मी वेगळा होऊच शकत नाही,’ असे वॉलकॉट एका मुलाखतीत म्हणाले होते. वॉलकॉट शुक्रवारी, १७ मार्च रोजी निवर्तले. मात्र त्यांच्या कवितांपासून वाचक वेगळा होऊ शकणार नाही.

 

First Published on March 21, 2017 3:17 am

Web Title: derek walcott