एखाद्या शिक्षणसंस्थेची, विशेषत: नावाजलेल्या, संपूर्ण देशाच्या अपेक्षांचे ओझे वाहणाऱ्या संस्थेची धुरा ही फक्त उत्तम प्रशासकीय अधिकारी किंवा फक्त चांगला शिक्षक यांकडे असून चालत नाही. प्रशासन, अध्यापन, संशोधन अशा तिन्ही घटकांचा तोल सांभाळाव्या लागणाऱ्या या पदावर अत्यंत कार्यसक्षम व्यक्तीची आवश्यकता असते. म्हणूनच ‘आयआयटी’ मुंबईच्या नेतृत्वाचे अवघड धनुष्य डॉ. शुभाशीष चौधरी यांच्या हाती सोपविण्यात आलेले आहे.

डॉ. चौधरी हे मूळचे प. बंगालमधील बहुतली गावचे. आयआयटी खरगपूर येथून विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) शाखेची पदवी घेतल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी कॅनडामध्ये गेले. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथून त्यांनी पीएचडी मिळवली. नव्वदच्या दशकात गुणवान मनुष्यबळासमोर विकसित देशांमध्ये आर्थिक, व्यावसायिक अशा सर्वच पातळ्यांवरील आकर्षक प्रलोभने असताना डॉ. चौधरी यांनी मायदेशी परतणे स्वीकारले.  पुन्हा एकदा ‘आयआयटी’चा घटक होत त्यांनी ‘आयआयटी’ मुंबई येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. ‘आयआयटी’ मुंबईची धुरा तिथल्याच प्रांगणात घडलेल्या व्यक्तीच्या हाती जाणे ही संस्थेच्या भविष्यातील अधिक उंच भराऱ्यांसाठी जमेचीच बाजू ठरावी. गेली २९ वर्षे मुंबईतील हजारो ‘आयआयटीयन्स’ची जडणघडण डॉ. चौधरी यांच्या नजरेसमोर झाली आहे. संस्थेत विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून, कमल नयन बजाज अध्यासनात प्राध्यापक, मोनाश अ‍ॅकॅडमीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

प्राध्यापक म्हणून नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर फक्त रोजच्या तासिका पूर्ण करणे आणि परीक्षा घेणे एवढय़ातच धन्यता मानण्याची वृत्ती त्यांच्याकडे नव्हती. मूळ संशोधकाचा पिंड त्यांना शांत बसू देईना. कॉम्प्युटर व्हिजन, इमेज प्रोसेसिंग, सुपर रिझोल्युशन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या क्षेत्रांतील त्यांचे संशोधन जागतिक पातळीवर नावाजले गेले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांमधून त्यांची संशोधने प्रकाशित झाली आहेत. भारत आणि अमेरिकेत त्यांना अनेक संशोधनांसाठी स्वामित्व हक्क मिळाले आहेत. विज्ञान क्षेत्रातील मानाच्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराबरोबरच जी. डी. बिर्ला पुरस्कार, विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार, आयआयटी मुंबईचा प्रा. एच. एच. माथूर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आयईईईकडून प्रसिद्ध होणाऱ्या संशोधन नियतकालिकासह इतरही अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांच्या संपादक मंडळावर त्यांनी काम केले आहे. ‘आयआयटी’ मुंबईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्रमुख, शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा विकास मंडळाचे सहसंचालक अशा जबाबदाऱ्याही त्यांनी निभावल्या. संस्थेचे अमेरिकेतील केंद्र सुरू होण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. ‘आयआयटी’ मुंबईचे विद्यमान संचालक डॉ. देवांग खक्कर  एप्रिलमध्ये निवृत्त होत आहेत. त्यानंतर डॉ. चौधरींसारख्या सक्षम हातात संस्थेचा कार्यभार जाणार आहे.