पंचाहत्तर पुस्तके लिहिली हे त्यांचे मोठे कर्तृत्व नव्हे किंवा त्या पुस्तकांपैकी मूळ गुजराती भाषेतच लिहिलेल्या ‘सदाचार’ या पुस्तकाच्या वीसहून अधिक आवृत्त्या निघाल्या हेही नव्हे. मूळचे स्पॅनिश असूनही गुजराती उत्तमरीत्या आत्मसात करणाऱ्या फादर कालरेस वालेस यांनी गुजरातेतील विद्यार्थ्यांना हिशेबाच्या पलीकडचे संकल्पनात्मक गणित कित्येक वर्षे शिकवले आणि महाविद्यालयीन पातळीवरही संकल्पना समजण्यासाठी मातृभाषाच उपयोगी पडेल या हेतूने त्यांनी गणिताची गुजराती परिभाषाही तयार केली! ‘सेट’ (मराठीत ‘संच’)ला ‘गण’ म्हणणे- आणि त्यासाठी शिवाचा नि पार्वतीचा गण अशी उदाहरणे देणे.. ‘रिंग’ला ‘मंडल’, ‘वन-वन रिलेशन’ला ‘सती संबंध’, तर ‘वन-मेनी रिलेशन’ला ‘द्रौपदी संबंध’ म्हणणे.. ही संकल्पनावाही परिभाषा हे त्यांच्या व्यक्तित्वाचा आविष्कार ठरणारे खरे कर्तृत्व! राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्रात जसे डझनावारी ‘परिभाषा कोश’ तयार करवून घेतले गेले, तसे काहीही गुजरातेत होत नसताना, स्वप्रेरणेने वालेस यांनी हे केले. सहप्राध्यापकासह, नवगणिताचे पाठय़पुस्तकही लिहिले.

गुजरातलाच कर्मभूमी मानून, २००५ नंतर ‘आईच्या आजारपणामुळे’ स्पेनला परत गेलेले फादर वालेस तिथेच ४ नोव्हेंबरला ९५वा वाढदिवस साजरा केल्यानंतरच्या आठवडय़ात निवर्तले.

स्पेनच्या यादवीत (१९३६-३९) वडील गेले, मग ख्रिस्ती संस्थेतच कालरेस शिकले आणि आयुष्यात पुढे करायचे काय म्हणून धर्मशिक्षणही घेऊ लागले. गांधीविचाराने गारूड केले, म्हणून धर्मसंस्थांचा थोडाफार वापर करून घेऊन कालरेस भारतात- गुजरातेत (गांधी खुनानंतर, १९५३ साली) आले. इथे स्पेनमधील शिक्षण निरुपयोगी, म्हणून बीए-एमए झाले आणि पुण्याच्या धर्मशिक्षण संस्थेतही काही काळ रुजू झाले. तिथे १९५८ मध्ये ‘फादर’ ही उपाधी मिळवून, दोन वर्षे धर्मसेवा करून १९६० पासून अहमदाबादेत आले आणि महाविद्यालयात रुजू झाले. विद्यार्थ्यांमध्ये योग्यपणे गुंतले, म्हणूनच गणिताखेरीज ‘सदाचार’ हे पुस्तक त्यांनी गुजरातीत लिहिले! प्रकाशक मिळेना, तर स्वखर्चाने छापले. त्याच्या आता वीसहून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत. ‘कुमार’ या गुजराती मासिकातील त्यांच्या स्तंभलेखनाची पुस्तके झाली, गांधींविषयीही त्यांनी लिहिले. त्यांची २७ पुस्तके गुजराती, तर ४५ इंग्रजीत आहेत. पुढे पन्नाशीनंतर, हिंदू व जैनधर्मीय परिचितांच्या कुटुंबांत एक संपूर्ण दिवस-रात्र राहणे, संवाद साधणे, असा क्रम त्यांनी सुरू केला. याला ते ‘तीर्थयात्रा’ म्हणत! संस्कृतीचा समन्वयच नव्हे तर ‘जीवांचे मैत्र’ साधणारा हा खरोखरीचा धर्मयात्री शंभरी न गाठताच गेला.