News Flash

निरंजन भाकरे

सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या या कलाकाराने  सोडलेला देहदानाचा संकल्पही करोनाने अपूर्ण राहिला.

इंडियन नॅशनल थिएटरकडून सोंगी भारूड कलावंत निरंजन भाकरे यांच्या मुंबईतील पहिल्याच कार्यक्रमासाठी बोलावणे आले, तेव्हा अनेक निमंत्रित नागर संवेदनेपायी काहीशा अनिच्छेनेच तेथे पोहोचले. परंतु भारूडकाराच्या पारंपरिक वेशात भाकरेंनी भारूडकलेचे जे नानाविध विभ्रम तिथे सादर केले त्याने शब्दश: गारूडच केले आणि ‘निरुत्साही निमंत्रितां’ना आपल्याच ‘शहरी’ कलासंवेदनेची मनोमन लाज वाटली. अशोकजी परांजपे या रत्नपारख्याने त्यांच्यामधील हुन्नर जोखला आणि भाकरे यांना मुंबईच्या अथांग कलासागरात पेश केले. तिथून या कलावंताचा जो झळाळता कलाप्रवास सुरू झाला, तो गेल्या आठवडय़ातील त्यांच्या अकस्मात जाण्यानेच थांबला. अवर्षणग्रस्त मराठवाडय़ाला लोककला व कलावंतांची समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यापैकीच भाकरे हे एक. अत्यंत गरिबीमुळे जिथे रोज दोन घास पोटात जाण्यासाठीही भीषण संघर्ष करावा लागतो, तिथे लोककलेचे बीज कसे काय रुजत असेल, हा एक गहन प्रश्नच! पण हे भाकरे यांच्या बाबतीत हे घडले खरे. एकीकडे जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतानाच मुंबईतील त्या कार्यक्रमाने भाकरे अचानक प्रकाशझोतात आले. त्यांचे महाराष्ट्रभर कार्यक्रम गाजू लागले. कलेद्वारे समाजप्रबोधनाचा वसा त्यांनी घेतलेला होताच; त्याचबरोबर प्रचलित एकनाथी भारुडाला आधुनिक उदाहरणांची जोड देत ते समकालीन प्रश्नांवरही त्यातून भाष्य करीत. ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाने त्यांची कला सर्वदूर पोहोचविली. अगदी अमेरिकेतसुद्धा त्यांचे हे सोंगी भारूड गेले. ‘बये तुला बुरगुंडा होईल गं..’ हे त्यांचे अफाट गाजलेले भारूड. किंबहुना, तो त्यांचा ट्रेडमार्कच झाला. ‘व्यसनमुक्ती पहाट’ अभियानात सलग चार वर्षे ते प्रथम विजेते ठरले. या प्रवासात त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार लाभले. दूरचित्रवाहिन्यांवरील त्यांच्या कार्यक्रमांनी ते घराघरांत पोहोचले. मुंबईसारख्या महानगरांत हल्ली लोककलांचे फारसे कार्यक्रम होत नसल्याने जी पोकळी निर्माण झाली होती, ती टीव्हीवरील लोककलांच्या अशा कार्यक्रमांनी काहीशी भरून निघते आहे. भाकरे यांनी ९० मीटर कापडाच्या आणि अलंकारांसह २० किलो वजनाच्या पायघोळ वेशभूषेत पेश केलेले भारूड त्यांना ‘वर्ल्ड अ‍ॅमेझिंग रेकॉर्ड’मध्ये स्थान देते झाले. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत ते सोंगी भारुडाचे प्रशिक्षण देत. आपल्या मूळ गावी रहिमाबादमध्ये लोककला प्रशिक्षण संस्था काढण्याचे आणि येणाऱ्या नव्या पिढीत भारूडकला रुजविण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु ते अधुरे राहिले. सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या या कलाकाराने  सोडलेला देहदानाचा संकल्पही करोनाने अपूर्ण राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 3:26 am

Web Title: folk artist niranjan bhakre profle zws 70
Next Stories
1 विजय के. कुचरू
2 मायकेल कॉलिन्स
3 प्रा. सुमन चक्रबर्ती
Just Now!
X