20 January 2018

News Flash

जॉर्ज रोमेरो

झॉम्बी ही संकल्पना अमेरिकेच्या साठोत्तरी सुखलोलुप समाजाशी जोडली जाते.

लोकसत्ता टीम | Updated: July 18, 2017 2:59 AM

जॉर्ज रोमेरो

 

 

भुतांमधील सर्वात ढ आणि सर्वात संसर्गोत्कट प्रकार म्हणजे झॉम्बी. १९६८ साली या झॉम्बींचा जन्म चित्रपटात झाला, त्याची मुळं आणि कुळं ही रिचर्ड मथीसन या विज्ञान कादंबरीकाराच्या ‘आय अ‍ॅम लीजंड’ या कलाकृतीमध्ये होती. तब्बल दीडेक दशक जुन्या कादंबरीतील रक्तपिपासू भूतवैशिष्टय़ांमध्ये आणखी भर घालण्यात आली. पीट्सबर्गमधील दहा सिनेमावेडय़ांच्या गटातील प्रत्येकाने ६०० डॉलर देऊन आर्थिक जुळवणी केली. ‘नाइट ऑफ द लिव्हिंग डेड’ चित्रपट तयार झाला आणि भीतीची नवी मिती त्याने तयार केली. त्या दहा जणांनी आपल्या गुंतवणुकीच्या कित्येकपट कमाई केली, पण त्यांचा म्होरक्या जॉर्ज अ‍ॅण्ड्रय़ू रोमेरो याला झॉम्बी भुतांचा आणि या चित्रप्रकाराचा पितामह म्हणून मान्यता मिळाली. झॉम्बी ही संकल्पना अमेरिकेच्या साठोत्तरी सुखलोलुप समाजाशी जोडली जाते. नाठाळपणे सतत ओरपण्याच्या वृत्तीला झॉम्बीची रक्त पिण्याची ओढ प्रतीक म्हणून वापरले जाते. या चित्रपटापूर्वी भयपटात राक्षस किंवा अक्राळविक्राळ भुतं होती. ब्रॅम स्टोकर यांच्या ड्रॅक्युलाचा प्रभाव सर्वच व्हॅम्पायरपटांवर होता. पण मानवी गळ्याचा नियोजनाद्वारे घोट घेणाऱ्या, व्हॅम्पायरहून मानवी; पण मृत झालेल्या तरी शरीराने मानवीच दिसणाऱ्या झॉम्बीची निर्मिती रोमेरो यांनी केली. भुताचा हा वेगळा प्रकार चित्रपटाला अभिजात सिनेमांच्या पंगतीत घेऊन गेला. पुढे काही काळ त्यांनी झॉम्बीऐवजी साधारण, दुय्यम भयपटांचा मार्ग स्वीकारला, त्या चित्रपटांना यश मिळाले नाही. मग पुन्हा झॉम्बी सिनेमा हीच आपली ओळख असल्याचे जाणून त्यांनी झॉम्बाळलेल्या चित्रपटांची कास धरली. आज झॉम्बी भुतांवर कित्येक कल्पक चित्रपट आले असून, त्यात दरवर्षी नव्या संकल्पनांची भर पडत आहे.

न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरित व्यावसायिक कलाकारांच्या पोटी जन्मलेले रोमेरो; वाढले मात्र ब्राँक्स या स्थलांतरितांच्या शहरात. पीट्सबर्ग विद्यापीठातून पदवी मिळवण्यापूर्वीच त्यांनी ८ मि.मी. कॅमेऱ्यावर हौशी सिनेमा बनविण्यास सुरुवात केली होती. पीट्सबर्गमधील चित्रकर्त्यांच्या वातावरणात त्यांची चित्रपटाची हौस फळली. सुरुवातीला जाहिराती बनविण्याची कामे त्यांना मिळाली. पण त्यावर समाधान न झाल्याने समविचारी नऊ मित्रांना घेऊन त्यांनी एक चित्रपट कंपनी काढली. सायकल वापरण्याइतपतच ऐपत असलेल्या इतर कंपनी मालकांनी रोमेरो यांच्या भलत्याच भूतपट बनविण्याच्या कल्पनेला पाठिंबा दिला. हा घाट इतका यशस्वी होईल याची कल्पना त्यांना नव्हती. पुढे ‘डॉन ऑफ द डेड’, ‘डे ऑफ द डेड’ या झॉम्बीपटांची त्यांची मालिका कायम राहिली. त्यांच्या झॉम्बी संकल्पना व्हिडीओ गेम आणि कॉमिक्समध्ये वापरल्या गेल्या. त्यांच्या मते झॉम्बी हा कधीही धावू शकत नाही. त्याचा मानवी मेंदू मृत होतो. पण गेल्या दीडएक दशकात वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी धावणारे आणि क्रूरभावना शिल्लक असलेले झॉम्बी तयार केले. एडगर राइटपासून डॅनी बॉएल आणि मनोज नाइट श्यामलनपासून पीटर जॅक्सनपर्यंत दिग्गज दिग्दर्शकांना या झॉम्बींची भुरळ पडली. या भुतांना गेल्या तीन पिढय़ांमध्ये मान्यता मिळाली आहे. वॉकिंग डेड नावाची टीव्ही मालिकाही अमेरिकेत प्रचंड मोठा दर्शकवर्ग बनवून आहे.

भय हा मानवाच्या मेंदूत दाटलेला चिरंतन घटक असला, तरी भीतीच्या आणि भूतपटांच्या संकल्पना बदलण्यामध्ये रोमेरोच्या चित्रपटांचा मोठा वाटा आहे. या दिग्दर्शकाच्या चित्रपट निर्मितीचा गाभा हा साहित्यप्रेमावर पोसलेला होता. फुप्फुसांच्या प्रदीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला असला, तरी झॉम्बीपटांचे पितामह ही त्यांची ओळख पुसलीच जाऊ शकत नाही.

First Published on July 18, 2017 2:59 am

Web Title: george romero american canadian filmmaker
  1. No Comments.