‘रेडिओ सिलोन’वर ‘आवाज की दुनिया के दोस्तों’ हा कार्यक्रम लोकप्रिय करणारे उद्घोषक गोपाल शर्मा हे २२ मे रोजी निवर्तले. त्या काळातील गाणी कर्णमधुर होतीच परंतु दोन गाण्यांच्या मध्ये गोपाल शर्मा यांच्या निवेदनशैलीमुळे तीच गाणी रेडिओ सिलोनवर अधिक ऐकली जात. ज्या काळात आजचा ‘आरजे’ हा शब्द अस्तित्वात नव्हता, तेव्हा रेडिओ सिलोनवर १९५६ ते १९६७ पर्यंत आणि त्यानंतर विविधभारतीवर त्यांनी उद्घोषक म्हणून काम केले. ते स्वत:ला उद्घोषक म्हणवून घेत. रेडिओ कलाकारांना ज्या काळी ‘रेडिओ स्टार’ म्हणत असत त्या काळात ते खऱ्या अर्थाने, अमाप लोकप्रियता लाभलेले रेडिओ स्टार होते. वयाच्या २५व्या वर्षी त्यांनी रेडिओवर आपला पहिला कार्यक्रम सादर केला. पुढली सुमारे ५० वर्षे उद्घोषक, निवेदक आणि मुलाखतकार म्हणून नभोवाणीवर काम केले. वयाच्या ८४ व्या वर्षांपर्यंत ते संगीताच्या अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करीत असत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी सूत्रसंचालित केलेला कुंदनलाल सैगल यांच्या गाण्यांचा कार्यक्रम हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात चित्रपट कलाकार, संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायक अशा संगीताशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती त्यांनी रेडिओसाठी घेतल्या. ‘जब आप गा उठे’, ‘दृश्य और गीत’, ‘अनोखे बोल’, ‘बदलते हुए साथी’, ‘बहनोंकी पसंद’, ‘जाने पहचाने गीत’, ‘साज और आवाज’, ‘हमेशा जवाँ गीत’, ‘ये भी सुनिये’ असे अनेक कल्पक कार्यक्रम त्या वेळी सादर केले जात. चित्रपटातील परिस्थितीनुसार काही गाण्यात तीन गायक गायिकांच्या आवाजातसुद्धा चित्रपट गीते ध्वनिमुद्रित झाली आहेत (उदा. संगम चित्रपटातील ‘हर दिल जो प्यार करेगा वो गाना गायेगा’ – मुकेश, लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर), अशा गाण्यांचा ‘त्रगान’ या नावाचा कार्यक्रम त्यांनी केला. त्यांनी सुरू केलेला ‘आपके अनुरोधपर’ हा रविवारी रात्री सादर होणारा कार्यक्रम आजही विविध भारतीवर वेगवेगळ्या निवेदकांकडून सादर केला जातो. चित्रपट संगीताला लोकप्रियता लाभण्याला गोपाळ शर्मा यांच्या निवेदन शैलीचा मोठा वाटा असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. गोपाल शर्मा आपल्या निवेदनात ‘आवाज की दुनियाके दोस्तों’, ‘शुभाशीष’, ‘शुभरात्री’, ‘बंधुवर’ असे शब्दप्रयोग करीत. हे शब्द त्यांची ओळख! २८ डिसेंबर १९३१ ते २२ मे २०२० हा त्यांचा जीवनकाळ असला तरी रसिक श्रोते त्यांची स्मृती आपली हृदयात कायम जपून ठेवतील.