News Flash

गुरू मंगलाप्रसाद मोहंती

वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षांपासून त्यांनी ‘कन्सारीसाई छाऊ अखाडा’ येथे नृत्यशिक्षण घेणे सुरू केले

गुरू मंगलाप्रसाद मोहंती

पोलाद आणि कोळसा खाणींचा झारखंड तसेच ओडिशातील भाग आणखी एका वैशिष्टय़ासाठी प्रसिद्ध आहे- ‘छाऊ’ नृत्य! मुखवटे घालून केले जाणारे ‘छाऊ’ हे रूढार्थाने लोकनृत्य नाही, कारण ते प्रशिक्षितांनीच करायचे असते. हे प्रशिक्षित नर्तक पिढय़ान्पिढय़ा पुरुषच असत, हेही विशेष. छाऊ नृत्य पदलालित्य आणि शरीराच्या लवचिकतेची परीक्षा पाहणारे. या नृत्यातही शैली आहेत, उदा.- मयूरभंज छाऊ ही शैली सोनल मानसिंह शिकल्या आणि पहिल्या महिला छाऊ नर्तक ठरल्या.. तर ‘सराइकेला छाऊ’ या नृत्यशैलीत गुरू मंगलाप्रसाद मोहंती यांनी प्रावीण्य मिळवले होते. इतके की, छाऊ नृत्यशैलीसाठी त्यांना २००९ मध्ये ‘पद्मश्री’ने भारत सरकारकडून गौरविण्यात आले होते आणि चार सप्टेंबररोजी त्यांचे निधन झाल्यामुळे, या शैलीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ निखळला आहे. त्यांनी स्थापलेले ‘सरायकेला नटराज कलामंदिर’देखील पोरके झाले आहे.

वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षांपासून त्यांनी ‘कन्सारीसाई छाऊ अखाडा’ येथे नृत्यशिक्षण घेणे सुरू केले. शालेय शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता, बीए होऊन त्यांनी जमशेदपूरच्या झेवियर्स व्यवस्थापन संस्थेतून (एक्सएलआरआय) औद्योगिक संबंध विषयात पदविकाही घेतली आणि ‘टेल्को’मध्ये नोकरीस लागले. मात्र छाऊकडे दुर्लक्ष न करता, १९९४ पासून त्यांनी १७ छाऊ नृत्यनाटय़े दिग्दर्शित केली. त्यातील बहुतेक सहभागी कलावंत हे मोहंती यांनी घडवलेले शिष्य होते. छाऊ नृत्यनाटय़े सहसा आख्यानांवरच आधारित असतात (हे साम्य थेट आसामच्या माजुली बेटावरील मुखवटेनाटय़ापर्यंत पूर्व भारतात सर्वत्र सापडते), परंतु मोहंती यांनी ‘अछूत कन्या’ सारखे नवे विषय छाऊ शैलीत आणले.

छाऊला शास्त्रीय नृत्य मानले जात नाही, याची  केवळ खंत न बाळगता, छाऊ नृत्याचा रीतसर अभ्यासक्रम तयार करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. तशी काहीएक शास्त्रीय बैठक हवी, म्हणून ते १९८८ मध्ये चंडीगढच्या प्राचीन कला मंदिरमध्ये  आणि पुढे कोलकात्याच्या संगीत नृत्य अकादमीत कथ्थक शिकले १९९५ साली ‘नृत्य रत्न’ ही पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळवली. तबलावादनातही ते विशारद झाले. हे सारे करताना, छाऊच्या प्रसाराचे प्रयत्न सुरू होतेच. १९६० साली तत्कालीन बिहार सरकारने शालेय अभ्यासक्रमात छाऊचा उपयोग करण्याच्या शक्यता पडताळणी समितीवर त्यांची नेमणूक केली होती, मात्र ते प्रयत्न आजही अपूर्णच राहिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:01 am

Web Title: guru mangala prasad mohanty profile abn 97
Next Stories
1 फा. गस्टन रॉबर्ज
2 के. एस. बाजपेई
3 डॉ. नोएल रोझ
Just Now!
X