स्पंदक ताऱ्यांबाबतचे संशोधनच इतके नाटय़मय आणि वेगळे होते, की १९७४ मध्ये त्यासाठी हेविश यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला, पण त्यांच्याच बरोबरीचे काम करणाऱ्या जोसलिन बेल बर्नेल यांना त्यात विचारातही घेतले नाही. त्या निर्णयावर ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांनी टीका केली होती, पण श्रीमती बर्नेल यांनी स्वत: मात्र काही बोलायचे टाळले. नोबेल नाकारल्याने झालेल्या या अवमानाची परतफेड आता वेगळ्या मार्गाने म्हणजे मूलभूत भौतिकशास्त्रातील विशेष पुरस्कार मिळवून त्यांनी केली आहे. आसमंतात सर्वाचे आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या पल्सार म्हणजे स्पंदक ताऱ्यांचे संशोधन डेम जोसलिन बेल बर्नेल यांनी केले. त्या सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. वैज्ञानिकांच्या मंडळाने त्यांना ३ दशलक्ष डॉलरचा पुरस्कार जाहीर केला आहे. तो नोव्हेंबरात दिला जाणार आहे.

बेल बर्नेल यांचा जन्म उत्तर आर्यलडमधील लुरगनचा. यॉर्क व ग्लासगो येथून त्या पीएच.डी.साठी अपघातानेच केम्ब्रिजला आल्या. कॅव्हेंडिश विद्यापीठात त्या काम करीत असताना पल्सारचे संशोधन जोरात होते. त्या वेळी त्यांना एक अस्पष्ट रेडिओ संदेश दिसला. त्या पुन:पुन्हा येणाऱ्या रेडिओ लहरी होत्या. तो अतिशय क्षीण संदेश होता. बर्नेल यांना इम्पोस्टर सिंड्रोम असल्याने त्यांना कुठलीही गोष्ट चुकेल या भीतीने ती काळजीपूर्वक पाहण्याची सवय होती. कदाचित त्यामुळेच त्यांनी तो संदेश काळजीपूर्वक बघितला. नंतर तो दिसेनासा झाला, पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. अखेर सिद्ध झाले की, त्या रेडिओलहरी आकाशातून आलेल्या होत्या. त्यात पृथ्वीवरचा कुठलाही स्रोत नव्हता. ते ताऱ्यांपासून आलेले संदेश होते. हा परग्रहवासीयांचा संदेश नाही हे तर त्यांनाही माहिती होते, पण त्याची अधिक निरीक्षणे त्यांनी घेतली. त्यातून दीर्घिकांच्या वेगवेगळ्या बिंदूपासून अशा लहरी येताना दिसल्या. ते संदेश गिरकी घेणाऱ्या पल्सारपासूनच आलेले होते.

या शोधाचे नोबेल मिळाले नाही याचा त्यांना जराही खेद व खंत वाटली नाही. त्यांना आता जो पुरस्कार मिळाला तो यापूर्वी स्टीफन हॉकिंग, हिग्ज बोसॉनचा शोध लावणारे वैज्ञानिक व लायगो (गुरुत्वीय लहरी) प्रयोगातील वैज्ञानिक यांना यापूर्वी देण्यात आला आहे. बर्नेल या एडिंबर्गच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स व रॉयल सोसायटी ऑफ एडिंबर्गच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. महिलांचे विज्ञान शिक्षणातील स्थान उंचावण्यासाठी त्यांनी अ‍ॅथन स्वान कार्यक्रम सुरू केला.