मूलनिवासींना नामशेष करण्याचा चंग बांधूनच अमेरिकी वसाहतींची ‘प्रगती’ झाली, हा इतिहास आहे. ‘रेड इंडियन’ या नावाने अमेरिकी मूलनिवासी जमातींना ओळखले जाई आणि आता त्यांना ‘नेटिव्ह अमेरिकन’ म्हणण्याइतपत उदारमतवाद अमेरिकनांनी दाखविला आहे. वसाहत करायची आणि मूलनिवासींना हुसकून लावायचे, अशा पद्धतीने आजची अमेरिका वाढली. ही वाढ हिंसेतूनच झाली, त्यासाठीच्या लढायांना १७७५ ते १९२३ अशी जवळपास दीडशे वर्षे तोंड फुटत होते. ‘ते’ आणि ‘आपण’ हे दोन तुकडे जणू कधीच सांधता येऊ नयेत, अशा त्या काळात- १९१३ साली जन्मलेले आणि ‘१८७६ ची बिगहॉर्न लढाई’ लढलेल्या मूलनिवासींच्या वंशातले ज्यो मेडिसिन क्रो यांनी आपल्या हयातीत मात्र, हे दोन तुकडे सांधण्याचेच काम पुढे नेले.. या १०४ वर्षीय समाजनेत्याचे निधन रविवारी- ३ एप्रिल रोजी झाले.

‘क्रो’ टोळीत जन्मलेले ज्यो हे या जमातीपैकी पहिले पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारेही पहिलेच! ओरेगॉन राज्यातून १९३८ साली समाजशास्त्र व मानसशास्त्र या विषयांत पदवी मिळवून, दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून पुढल्याच वर्षी त्यांनी मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. याच विद्यापीठाने पुढे २००३ मध्ये त्यांना सन्माननीय डॉक्टरेटही दिली. शिकतानाही त्यांची ख्याती होती, ती ‘१८७६ च्या लढाईची रोमांचक वर्णने करणारा’ अशी.. त्या लढाईत, हल्ला करण्यासाठी आलेल्या सर्व अमेरिकी सैनिकांना मूलनिवासींनी निष्प्राण केले होते. गोऱ्या बंदुकांपुढे ‘रेड इंडियन’ जिंकले होते आणि हा विजय कसा मिळवला, हे लढवय्यांकडून प्रत्यक्ष ऐकण्याची संधी लहानपणापासून क्रो यांना मिळत होती. वीरश्रीपूर्ण ओजस्वी कथनातून दुहीची विखारी बीजेही पेरली जातात, तसे मात्र क्रो यांनी कधी केले नाही. उलट, शिक्षणातून समन्वयाची पालवी कशी फुटावी, याचे उदाहरण ज्यो क्रो यांनी १९४२ मध्ये दिले.. दुसऱ्या महायुद्धात लढण्यासाठी ते अमेरिकी सैन्यात गेले! पायदळाच्या १०३व्या तुकडीत आधी उमेदवारी करून, पुढे नाझी तुकडीशी प्रत्यक्ष धुमश्चक्रीत त्यांनी नेतृत्वही केले आणि शत्रूकडील ५० घोडे ताब्यात घेतले. अमेरिकी मूलनिवासी जमातींमध्ये ‘लढाऊ वीर’ (वॉर चीफ) होण्याच्या ज्या चार अटी असतात, त्यात ‘घोडे ताब्यात घेणे’ ही महत्त्वाची. अमेरिकी सैन्यात राहून या चारही अटी पूर्ण केल्याने त्यांना मूलनिवासी ‘वॉर चीफ’ होता आले! याच पराक्रमासाठी त्यांना ६० वर्षांनंतर, २००८ मध्ये अमेरिकी सैन्यातील ‘ब्राँझ स्टार’ मिळाला.

१९४८ पासूनचे त्यांचे आयुष्य मूलनिवासींचे प्रश्न धसाला लावण्यात गेले. त्यांच्या कथनांची पुस्तकेही निघाली. फ्रान्सचा ‘पद्म-पुरस्कार’तुल्य (शवालिए दु ऑर) सन्मान २००८ मध्ये त्यांना मिळाल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी २००९ मध्ये ‘प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम’ने त्यांना गौरविले.