एखाद्या व्यक्तीच्या अंगी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, कौशल्य आणि कमालीची समर्पण वृत्ती असते, तेव्हा त्याला आपल्या आसपासच्या प्रत्येकानेच तितक्याच क्षमतेने काम करावे, असे वाटत असते. असे होणे प्रत्येक वेळी शक्य नसल्याने त्या व्यक्तीची संतापी वृत्ती उफाळून येते आणि ती प्रत्येकाशीच विक्षिप्तपणे वागू लागते. कालांतराने अशा व्यक्तीच्या कलागुणांपेक्षा त्याच्या विक्षिप्त वृत्तीचीच चर्चा समाजात अधिक होते. ब्रिटिश दिग्दर्शक जॉन गिलरमिन यांच्या बाबतीत आयुष्यभर हेच घडत आले. ‘द टॉवरिंग इन्फनरे’, ‘किंगकाँग’, ‘टारझन्स ग्रेटेस्ट अ‍ॅडव्हेंचर’ अशा साहसी थरारपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या गिलरमिन यांचे नुकतेच, वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.

‘द टॉवरिंग इन्फनरे’ (१९७४) हा गिलरमिन यांच्या तीन दशकांच्या दिग्दर्शन कारकीर्दीतील मैलाचा दगड होता. एका गगनचुंबी इमारतीच्या ८१ व्या मजल्यावर आग लागल्यानंतर घडणारा थरार या चित्रपटातून रंगवण्यात आला होता.  या चित्रपटाने तीन ऑस्करही कमावले. पण गिलरमिन यांना वैयक्तिकरीत्या या पुरस्काराने हुलकावणी दिली.  १९२५ साली लंडनमध्ये एका फ्रेंच दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या गिलरमिन यांनी केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या ‘रॉयल एअर फोर्स’मध्ये नोकरी केली. मात्र, काही काळातच त्या नोकरीवर पाणी सोडून वयाच्या २२ व्या वर्षी ते चित्रपट क्षेत्राकडे वळले. ५० च्या दशकात त्यांनी ‘आय वॉज मॉन्टीज डबल’, ‘टारझन्स ग्रेटेस्ट अ‍ॅडव्हेंचर’ असे वेगवेगळय़ा धाटणीचे सिनेमे दिग्दर्शित केले. पण साहसी थरारपटांमुळेच गिलरमिन अधिक चर्चेत राहिले. ‘किंगकाँग’सारखे विशेष तंत्रावर आधारित सिनेमे करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यातीत तंत्रकौशल्य प्रभावी नसले तरी, त्या सिनेमाने चांगला गल्ला जमवला.  गिलरमिन त्यांच्या चित्रपटांपेक्षा विक्षिप्त स्वभावामुळेच अधिक चर्चेत राहिले. कधी चित्रीकरणाला उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संतापण्यावरून तर कधी मनासारखे काम न झाल्याने खुर्चीची मोडतोड करण्यावरून गिलरमिन  सहकाऱ्यांशी कधीच जुळवून घेऊ शकले नाहीत. काही वेळा तर चित्रपटाच्या अध्र्या चित्रीकरणातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. शीघ्रकोपी आणि विक्षिप्त अशा दुर्गुणांचे बिरुद लागलेल्या या हरहुन्नरी दिग्दर्शकाने रविवारी जगाचा निरोप घेतला.