दिग्दर्शक-अभिनेते गुरुदत्त हे मामा, श्याम बेनेगलही नातेवाईक, आई ललिता लाजमी या ख्यातकीर्त चित्रकर्ती आणि त्याहून उत्तम कलाशिक्षिका, संगीतकार भूपेन हजारिका हे जन्माचे जोडीदार.. तरीही या साऱ्यांमुळे नव्हे – स्वत:च्याच कर्तृत्वाने कल्पना लाजमी ओळखल्या गेल्या. १९८० आणि १९९०च्या दशकांत स्त्रीकेंद्री आणि बुद्धिनिष्ठपणे पाहता येतील अशा चित्रपटांना ‘समांतर’च्या रांगेतून ‘मुख्य धारे’त आणण्याचे श्रेय कल्पना लाजमी यांचे होते. गेली दोन वर्षे मूत्रपिंडाच्या कर्करोगाशी झगडल्यानंतर रविवारी पहाटे त्यांची निधनवार्ता आली, तेव्हा चित्रपटक्षेत्रच नव्हे तर रसिकही हळहळले.

कल्पना लहानपणापासून आजी-आजोबांकडेच (आईच्या माहेरी) वाढल्या. हे घर कोलकात्यात होते आणि आजी वासंती पडुकोण यांना कन्नड, तुळू, हिंदी, उर्दू आणि बंगाली अशा भाषा येत होत्या. ‘या भाषेतल्या गोष्टी त्या भाषेत सांगण्याची कला माझ्या आजीला सहज अवगत होती,’ असे कल्पना सांगत. उत्तमोत्तम साहित्यकृतींचा आशय कल्पना यांना कोलकाता मुक्कामी भिडला. अगदी तरुणपणीच त्यांनी मुंबई व कोलकात्याच्या चित्रपट-क्षेत्रात उमेदवारी सुरू केली, श्याम बेनेगल यांच्या पथकात विविध कामे केली आणि त्यांच्या ‘भूमिका’ची वेषभूषाही सांभाळली, ‘पायोनिअर’ (१९७८) हा त्यांनी बनविलेला पहिला लघुपट. पुढल्याच वर्षी त्यांचा आसामच्या चहा-मळ्यातील कामगारांवर आधारित लघुपट गाजला. आसामातच राहून त्यांनी १९८१ मध्ये ‘अलाँग द ब्रह्मपुत्र’ हा लघुपटही बनवला. एव्हाना, खरे तर वयाच्या १७ व्या वर्षीच, त्या वेळी पंचेचाळिशीचे असलेल्या भूपेन हजारिका यांच्या प्रेमात त्या पडल्या होत्या. लग्नाविना हे जोडपे राहू लागले. दहा वर्षांपूर्वी भूपेन आजारी असत, म्हणून स्वत:च्या मधुमेहाकडे लक्ष न देता भूपेन यांची काळजी घेणारे प्रेम कल्पना यांनी केले. याचा परिणाम म्हणजे मधुमेहाने आधी मूत्रपिंडविकार आणि मग याच अवयवाचा कर्करोग त्यांना जडला. ‘चौकटीबाहेरचे सहजीवन’ हा कल्पना यांच्या अनेक चित्रपटांचा विषय; पण तो त्यांचा जीवनमार्गही होता. मैत्रेयीदेवींच्या ‘बिधि ओ बिधाता’ या कादंबरीवर आधारलेला ‘एक पल’ (१९८६) हा पहिला पूर्ण लांबीचा कथापट कल्पना यांनी दिग्दर्शित केला, त्यातील नायिका (शबाना आजमी) नवरा आणि लग्नापूर्वीचा प्रियकर या दोघांवरही प्रेम करते. ‘लोहित किनारे’ ही दूरदर्शन मालिका (१९८८) बनवितानाच त्यांना महाश्वेतादेवींच्या ‘हजार चुराशीर मां’वर चित्रपट करायचा होता. पण हक्क आधीच विकले गेल्याने तो विचार सोडून महाश्वेतादेवींची दुसरी कथा त्यांनी निवडली, त्यावरचा चित्रपट ‘रुदाली’ (१९९३)! डिम्पल कपाडिया यांना अभिनयाचा पुरस्कार या चित्रपटाने दिला. पुढल्या ‘दमन’ या कौटुंबिक हिंसाचाराबद्दलच्या चित्रपटासाठी (२००१) रवीना टंडन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या; हे यश कल्पना यांच्या दिग्दर्शनाचेही होते. नंतरचे ‘क्यों’ (२००३) आणि ‘चिंगारी’ (२००६) हे चित्रपट मात्र गाजले नाहीत. भूपेन यांच्या निधनानंतर (२०११) कल्पना यांची प्रकृती खालावतच गेली.