मूळचे नागपूरचे असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुणेस्थित लष्कराच्या साऊथ कमांडचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून झालेली निवड त्यांच्या गेल्या ३५ वर्षांच्या लष्करी सेवेचा गौरव वाढवणारी आहे. उपराजधानीतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पांडे यांचे मनोज चिरंजीव. घरात कोणतीही लष्करी पाश्र्वभूमी नसताना त्यांची लष्कराकडे वळण्याची कथा मोठी रंजक आहे.

पांडे कुटुंब शहरापासून दूर असलेल्या विद्यापीठ परिसरात राहायचे. तेव्हा या भागात शालेय शिक्षणासाठी शाळा नव्हती. जवळच असलेल्या वायुसेनानगरात केंद्रीय विद्यालय होते, पण तिथे बाहेरच्यांना प्रवेश नव्हता. डॉ. पांडे यांनी हवाई दलातील अधिकाऱ्यांना विनंती करून मनोज यांना या शाळेत प्रवेश मिळवून दिला. या शाळेच्या लष्करी शिस्तीत ते रमले व तिथूनच त्यांना सैन्यदलात जाण्याची प्रेरणा मिळाली. अकरावी उत्तीर्ण केल्यावर ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून एनडीएत दाखल झाले. तेथील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डेहराडूनच्या मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. १९८२ मध्ये ते बॉम्बे सॅपर्स या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. मनोज पांडे यांना देशाच्या सर्व भागांत सेवा करण्याचा अनुभव आहे. त्यांनी इथिओपिया व इरिशिया या देशांत संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतसुद्धा काम केले आहे. कारगिलमध्ये डिव्हिजन कमांडची जबाबदारी सांभाळताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या सेवेचा गौरव म्हणून पांडे यांना विशिष्ट तसेच अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले आहे. वायुसेनानगरातील शाळा व कर्नाटकातील बेळगावच्या एका मामाचे लष्करी सेवेत असणे, या दोन गोष्टींमुळे मी लष्कराकडे वळलो, असे ते आज अभिमानाने सांगतात. त्यांचे लहान बंधू संकेतसुद्धा लष्करात कर्नल होते व काही वर्षांपूर्वीच त्यांनी निवृत्ती घेतली. तर सर्वात लहान बंधू डॉ. केतन पांडे ब्रुनोईच्या राजाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत. मनोज पांडे यांचा मुलगा अक्षय व त्याची पत्नी सौम्या सिंगसुद्धा लष्करी सेवेत असून सध्या हवाई दलात वैमानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आई प्रेमा पांडे येथील आकाशवाणीत उद्घोषिका होत्या. त्या सादर करीत असलेल्या ‘बेला के फूल’ या कार्यक्रमाची आजही आठवण येते, असे मनोज पांडे सांगतात. अमुक कर अशी सक्ती वडिलांनी कधी केली नाही. त्या काळात लष्करी सेवेत कसे जायचे याविषयीची फारशी माहितीही नव्हती. तरीही केवळ जिद्दीने व स्वयंप्रेरणेने हा मार्ग निवडला, असे ते बोलून दाखवतात. आतापर्यंत तीन नागपूरकर अधिकाऱ्यांना हवाई दलप्रमुखाचा सन्मान मिळाला आहे, तर सैन्यदलातील निंभोरकर व रवी कोडगे लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचले आहेत. त्याच वाटेवर आता जायला मिळाले हा मोठा सन्मान आहे, अशी भावना ते बोलून दाखवतात. १९६२ ला जन्मलेले मनोज पांडे यांचा अजून साडेचार वर्षांचा सेवा कालावधी शिल्लक असून निवृत्तीनंतर युवकांमध्ये लष्करी सेवेविषयीची आवड निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.