चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या अर्थात सागरी सीमा लाभलेल्या देशासाठी नौदलाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. अशा राष्ट्राला आपले नौदल सामथ्र्यशाली ठेवण्यावर अधिक लक्ष द्यावे लागते. आकाराने लहान असूनही जगाच्या नकाशावर अशा राष्ट्रांचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे ठरते. व्यापारी जहाजांचे सागरी मार्ग निर्धोक ठेवण्यासाठी बडय़ा राष्ट्रांनाही या चिमुकल्या देशांशी सौहार्दाचे संबंध ठेवावे लागतात. अशा देशांपैकी एक म्हणजे आपला शेजारी श्रीलंका. या देशाच्या नौदल प्रमुखपदाची धुरा चार दशकांनंतर प्रथमच तामिळी वंशांच्या रिअर अ‍ॅडमिरल ट्रॅव्हिस सिनिया यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

प्रदीर्घ काळ हा देश वांशिक व भाषिक वादाने गृहयुद्धात होरपळला. श्रीलंकेत तामीळ वंशाच्या नागरिकांना शिक्षण व रोजगारात स्थान मिळत नसल्याचे सांगत तामिळी बंडखोरांनी १९७० मध्ये शस्त्र हाती घेऊन पुकारलेल्या युद्धाचा मे २००९ मध्ये शेवट झाला. या काळात तामिळी वंशाच्या व्यक्तीला कधी सैन्य दलाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. सिनिया यांच्या सर्वोच्च पदावरील नियुक्तीने अल्पसंख्याक गटातील तामिळींमध्ये आशेचा किरण तेवणार आहे. नौदलप्रमुखाची जबाबदारी स्वीकारल्यावर खुद्द सिनिया यांनी देशाचे सार्वभौमत्व व सागरी सीमांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडण्यास श्रीलंका नौदल कटिबद्ध असल्याची ग्वाही देत राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडविले. आजवर देशासाठी प्रामाणिकपणे केलेल्या त्यांच्या कार्याची दखल या निमित्ताने घेण्यात आली. तामिळी बंडखोरांविरोधातील लढाईत सिनिया यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. या मोहिमेचे काही काळ त्यांनी नेतृत्व केले.

लढाई अंतिम टप्प्यात असताना सिनिया यांच्या नेतृत्वाखाली सागरी मार्गावर अवलंबून असलेली तामिळी बंडखोरांची पुरवठा व्यवस्था तोडण्यात आली. लिट्टेसाठी शस्त्रास्त्र घेऊन निघालेली नौका त्यांनी उद्ध्वस्त केली. गृहयुद्ध नियंत्रणात आणण्यात श्रीलंकन नौदलाचे हे सर्वात मोठे यश मानले जाते. श्रीलंकन नौदलात सागरी युद्ध कार्यवाहीचा प्रदीर्घ अनुभव असणारे ज्येष्ठतम अधिकारी ही सिनिया यांची ओळख.

सिनिया यांचा जन्म कॅण्डी येथे झाला. ट्रिनिटी महाविद्यालयात शिक्षण घेऊन ते १९८२ मध्ये सब-लेफ्टनंट म्हणून नौदलात दाखल झाले. नेव्हल व मेरिटाइम अकॅडमीत प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी ब्रिटानिया रॉयल महाविद्यालयात पदवी, युद्धनौकांवर विशेष प्रशिक्षण, नेव्हल कम्युनिकेशन व इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राचे शिक्षण, डिफेन्स सव्‍‌र्हिसेस स्टाफ महाविद्यालयातून संरक्षण व सामरिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. ‘दहशतवादविरोधातील लढाई’ या विषयावर सखोल अभ्यास केला. नौदलात आजवर अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी सिनिया यांनी सांभाळली.

त्यात जलदगतीने हल्ला चढविण्याची क्षमता राखणाऱ्या ‘फ्लोटिला’ स्क्वॉर्डनचे कमांडोर, श्रीलंकन नौदलाच्या प्रमुख युद्धनौकेचे कप्तान, फ्लॅग ऑफिसर, पूवरेत्तर आणि उत्तर पश्चिम विभागाची जबाबदारी आदींचा अंतर्भाव आहे. नौदल प्रकल्प, योजना व संशोधन विभागाचे संचालक, नौदल (प्रशासन) विभागात उपसंचालक, संशोधन व विकास विभागात वरिष्ठ अधिकारी आदी पदांवरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सागरी सीमांच्या रक्षणासोबत देशाच्या प्रगतीत आणि आर्थिक विकासात नौदलाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. श्रीलंका नौदलाचे हे काम सिनिया यांच्या नेतृत्वाखाली नेटाने पुढे जाईल का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल..