22 March 2018

News Flash

व्लादिमीर ड्रिनफेल्ड

गणित विषय फार थोडय़ा लोकांच्या आवडीचा असतो

लोकसत्ता टीम | Updated: February 19, 2018 2:50 AM

गणित विषय फार थोडय़ा लोकांच्या आवडीचा असतो, किंबहुना अनेकांना त्यात गती नसते, पण ज्यांना गणितात गती असते त्यांच्यासाठी तो विषय ध्यास बनलेला असतो. अशाच गणितज्ञांपैकी एक म्हणजे व्लादिमीर गेरशोनोविच ड्रिनफेल्ड. त्यांना नुकताच गणितातील प्रतिष्ठेचा वुल्फ पुरस्कार मिळाला आहे. एक लाख डॉलर्सचा हा पुरस्कार इस्रायलच्या वुल्फ फाऊंडेशनच्या माध्यमातून दिला जातो.

ज्यांना आधी वुल्फ पुरस्कार मिळाला अशा अनेकांना नंतर नोबेलही मिळाले आहे. गणितात नोबेल दिले जात नसले तरी विज्ञानातील बहुतांश संशोधन हे गणितावर आधारित असते त्याला जनुकशास्त्रापासून ते भौतिकशास्त्रापर्यंत कुठलेही विज्ञान अपवाद नाही.  ड्रिनफेल्ड यांचे गणितातील संशोधन हे अंकीय सिद्धांत, थिअरी ऑफ अ‍ॅटॉमॉर्फिक फॉम्र्स, बीजगणितीय भूमिती, एलिप्टिक मोडय़ुल, थिअरी ऑफ लँग्लांड्स कॉरस्पाँडन्स या विषयांमध्ये आहे. पुंज समूहाची संकल्पना त्यांनी व मिशियो जिंबो यांनी एकाच वेळी मांडली. त्यातून गणितीय भौतिकशास्त्रात मोठी भर पडली. थिअरी ऑफ सॉलिटॉन्समध्ये ड्रिनफेल्ड-सोकोलोव्ह यांनी अनेक सुधारणा केल्या. ड्रिनफेल्ड यांचा जन्म पूर्वीच्या सोविएत रशियातील युक्रेनचा. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी बुखारेस्ट येथे गणित ऑलिम्पियाडमध्ये रशियाचे प्रतिनिधित्व केले होते. १९७८ मध्ये मॉस्को विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली, नंतर स्टेकलोव इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथॅमेटिक्स या संस्थेतून त्यांनी विज्ञानातील डॉक्टरेट मिळवली. १९८१ ते १९९९ या काळात त्यांनी व्हेरकिन इन्स्टिटय़ूट फॉर लो टेम्परेचर फिजिक्स अँड इंजिनीअरिंग या संस्थेत काम केले. १९९९ मध्ये  शिकागो विद्यापीठात त्यांनी काम सुरू केले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लँॅग्लांड्स काँजेक्सर्स फॉर जीएल २ हा कूटप्रश्न सोडवला. एलिप्टिक मोडय़ुल्स म्हणजे ड्रिनफेल्ड मॉडय़ुल्सची कल्पना त्यांनी मांडली होती. गणितात नंतर युरी मॅनिन हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी यांग-मिल्स इन्स्टँटनच्या मॉडय़ुलाय स्पेसची संकल्पना मांडली. ती नंतर मिखाइल अतिया व निगेल हिचीन यांनी स्वतंत्रपणे सिद्ध केली. क्वांटम ग्रूप हा शब्दप्रयोगही त्यांनीच प्रथम वापरला. त्यांचा संबंध यांग बॅक्सटर समीकरणाशी जोडून त्यांनी या संशोधनास नवी दिशा दिली. व्हर्टेक्स बीजगणितीय सिद्धांत त्यांनी अ‍ॅलेक्झांडर बेलीनसन यांच्यासमवेत नव्याने विकसित केला. ड्रिनफेल्ड यांनी समकालीन गणिताच्या विकासात मोठा हातभार लावला असून अनेक नवीन सिद्धांतांना त्यांचे नाव नंतर देण्यात आले. सूत्र सिद्धांतासह, भौतिकशास्त्राच्या अभ्यासात पायाभूत असलेले अनेक गणिती सिद्धांत त्यांनी विकसित केले आहेत.

First Published on February 19, 2018 2:50 am

Web Title: loksatta vyakti vedh vladimir drinfeld
  1. No Comments.