१९६२ चे भारत-चीन युद्ध तसेच १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धांत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविणारे युद्धनायक मेजर जनरल आर. एन. छिब्बर (निवृत्त) यांचे नुकतेच निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. लष्करात शिस्तीला सर्वाधिक महत्त्व आहे. प्रशिक्षणात कठोर शिस्त अंगी बाणवली जाते. अशा वातावरणात उच्च पदावर कार्यरत राहिलेल्या छिब्बर यांच्यातील सहृदयता बहुतेकांनी अनुभवली. जवानांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला ते आपलेसे वाटायचे. त्याचे प्रत्यंतर छिब्बर यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर उमटलेल्या शेकडो भावनांमधून आले. खरे तर तीन दशकांपूर्वी ते लष्करातून निवृत्त झाले होते. इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतरदेखील ते अनेकांच्या मनात स्थान मिळवून होते.

छिब्बर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९३४ रोजीचा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे १९५५ मध्ये ते लष्करी सेवेत दाखल झाले. कर्नल ते मेजर जनरल या प्रवासात त्यांनी लष्करातील महत्त्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. रणनीतीची आखणी, ती तडीस नेण्याचे कौशल्य त्यांच्या नावलौकिकात भर घालणारे ठरले. सलग तीन युद्धांत आघाडीवर राहण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. आठ जाट रेजिमेंटचे त्यांनी नेतृत्व केले. भारतीय लष्करातील ‘संघटन आणि वीरता’ हे घोषवाक्य असलेली जाट रेजिमेंट ही भारतीय लष्करातील सर्वात जुनी आणि सर्वाधिक शौर्य पुरस्कार मिळवणारी रेजिमेंट आहे. अनेक युद्धांत या रेजिमेंटने वीरतेचे दर्शन घडविले; त्यास पाकिस्तानच्या जोखडातून बांग्लादेशला मुक्त करणारे १९७१ चे युद्धही अपवाद नव्हते. पूर्व सीमेवर पराभवाला तोंड द्यावे लागत असल्याने पाकिस्तानी सैन्याने पश्चिम सीमेवरील हुसैनीवाला येथील भारतीय चौकीवर हल्ला चढविला. फिरोजपूर तळावर कब्जा करण्याचा त्यांचा प्रयत्न कमी संख्येने असलेल्या जाट रेजिमेंटच्या तुकडीने निकराची झुंज देत उधळला. जाट रेजिमेंटच्या प्रत्येक युद्धात अशा यशोगाथा आहेत. या लढाऊ रेजिमेंटमध्ये छिब्बर हे कार्यरत होते. १९७१ च्या युद्धानंतर त्यांनी अफगाणिस्तानमध्ये दूतावास अधिकारी या प्रतिष्ठित पदाची तीन वर्षे जबाबदारी सांभाळली. लष्करातील त्यांच्या कार्याचा गौरव विशिष्ट सेवा पदकाने करण्यात आला. संपूर्ण सेवाकाळात छिब्बर यांनी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. त्यांच्या लहानसहान अडचणी सोडविण्यासाठी ते युद्धभूमीत असावे त्याप्रमाणे आघाडीवर राहिले. मातृभूमीच्या रक्षणासाठी छिब्बर यांचे योगदान नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे.