20 September 2020

News Flash

मीना देशपांडे

आचार्य अत्रे यांच्या कवयित्री कन्या शिरीष पै आणि लेखिका मीना देशपांडे अशा विरळा उदाहरणांत मोडतात.

मीना देशपांडे

आचार्य अत्रे यांच्यासारखे उत्तुंग, बहुआयामी  व्यक्तिमत्त्वाचे वडील असणे हे एकीकडे कितीही भाग्याचे असले तरी त्यांच्या लांबशार, घनगर्द छायेत लहानाचे मोठे होणे आणि त्या सावलीतून बाहेर येऊन आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे ही खचितच सोपी गोष्ट नाही. कारण समाज सतत दिग्गज वडिलांशी मुलांची तुलना करत राहतो. त्याचे एक विलक्षण दडपण असते. ते जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळू शकते. त्यामुळे बहुश: अशा मोठय़ा माणसांची मुले अकाली कोमेजून जाण्याची शक्यता अधिक असते. तथापि याला अपवाद ठरणारी उदाहरणेही आढळतात. आचार्य अत्रे यांच्या कवयित्री कन्या शिरीष पै आणि लेखिका मीना देशपांडे अशा विरळा उदाहरणांत मोडतात. शिरीष पै यांच्या मानाने मीना देशपांडे या तशा थोडय़ा उशिरा लिहित्या झाल्या असल्या तरी त्यांनी नंतर ज्या झपाटय़ाने लेखन केले ते आश्चर्य वाटावे असेच आहे. वडिलांविषयीची त्यांची संपादित-संशोधित पुस्तके येणे तसे स्वाभाविकच म्हणायला हवे. त्यातही १९६० पर्यंत येऊन थांबलेले अत्र्यांचे ‘कऱ्हेचे पाणी’ हे बहुखंडीय आत्मकथन त्यापुढील तीन खंडांत (खंड ६, ७, ८) मीनाताईंनी पूर्णत्वाला नेले. अत्र्यांचे बहुअंगी, बहुढंगी कर्तृत्व त्यातून त्यांनी उलगडून दाखवले आहे. अत्र्यांच्या काहीशा राणाभीमदेवी थाटातील लेखनशैलीशी प्रामाणिक राहात त्यांच्या आयुष्यातील उर्वरित कालखंडाचा लेखाजोखा मांडणे हे एक प्रकारे शिवधनुष्य उचलण्यासारखेच. परंतु त्यांना ते अभ्यासू वृत्तीमुळे साध्य झाले. मीना देशपांडे यांनी स्वतंत्रपणे ‘महासंग्राम’ आणि ‘हुतात्मा’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या. पैकी पहिली १९९५-९६ मधील भारतातील अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवरची होती, तर दुसरी संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या काळावरची. दोन्हीत त्या ‘अभ्यासोनि प्रकटल्या’चे पानोपानी प्रत्ययाला येते. मदालसा मर्लिन मन्रो या मनस्वी अभिनेत्रीवरील कादंबरी आणि मायकेल जॅक्सन या विख्यात गायकावरचे पुस्तक हे त्यांच्या लेखणीचे एक वेगळेच रूप. याखेरीज,  ‘टक्कल पडलेली सुंदरी’ (अ‍ॅब्सर्ड), ‘एटीकेटी’ (विनोदी) या एकांकिका, ‘शोध’ हे रहस्यनाटय़, तसेच टेस्ट टय़ूब बेबी या संकल्पनेवरचे ‘नलू  सांगा कुणाची?’ या नाटकांद्वारे वडिलांनी गाजवलेल्या नाटय़क्षेत्रातही त्यांनी लीलया मुशाफिरी केली. संवेदनशील वृत्तीच्या मीनाताई नेहमीच काळाबरोबर राहिल्या. लेखनासाठीचे नवे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले.. कार चालवायला शिकावे, तितक्या सहजपणे!  निसर्ग, अद्ययावत वाचन, जगभरातले नवनवे चित्रपट या सगळ्यांत त्या रमत असत. आयुष्य समरसून जगण्याची वडिलांची वृत्ती त्यांच्यात होती. अगदी जाण्यापूर्वीही मायकेल जॅक्सनवरचे लिखाण पूर्ण करूनच त्या शेवटच्या प्रवासाला निघाल्या..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 12:01 am

Web Title: meena deshpande profile abn 97
Next Stories
1 प्रा. गोविंद स्वरूप
2 गुरू मंगलाप्रसाद मोहंती
3 फा. गस्टन रॉबर्ज
Just Now!
X