News Flash

नगीनदास संघवी

आपल्या संचिताचा एक स्पष्टवक्ता साक्षीदार आपण गमावला आहे. 

नगीनदास संघवी

‘नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांचे मतभेद होते, पण सरदार पटेल यांच्या रुजवातीमुळे प्रसाद दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाले. मतभेद कायम ठेवून साहचर्य आजच्या काँग्रेस वा भाजपमध्ये अशक्यच’ असे वयाच्या ९८ व्या वर्षी स्वत:च्या सत्कार समारंभात सुनावणारे, त्याच सोहळ्यात काश्मीरचा विषय काढणारे.. ‘तुम्हाला आज लोकशाही दिसते का?’ असे विचारणारे किंवा ‘काँग्रेसपासून उच्च जाती दुरावल्याने गुजरातमधून या पक्षाची अधोगती सुरू झाली’ असे मत साधार मांडणारे नगीनदास संघवी यांच्या निधनाने एक स्पष्टवक्ता हरपला आहे. या स्पष्टवक्तेपणाची लोभस बाजू, गुजराती दैनिके/साप्ताहिकांत कैक वर्षे त्यांनी लिहिलेल्या ‘तड ने फड’सारख्या लोकप्रिय सदरातून दिसत राहिली. पुढे या सदराची विषयानुरूप नऊ पुस्तके झाली! ती सारी गुजरातीच, पण इंग्रजीतही ‘गुजरात: अ पोलिटिकल अ‍ॅनालिसिस’(१९९६), ‘गांधी- द साउथ आफ्रिका इयर्स’( २००६) आणि  ‘गुजरात अ‍ॅट क्रॉसरोड्स’ (२०१०) ही पुस्तके त्यांच्या अभ्यासूपणाची साक्ष देत राहातील.

ब्रह्मदेशात १० मार्च १९२० रोजी जन्म, बालपण गुजरातेत आणि १९४७ साली ‘वाया वीरमगामना’ तरुणांप्रमाणे मुंबईत, १९५० च्या दशकापासून भवन्स, रूपारेल महाविद्यालयांत राज्यशास्त्राचे अध्यापन, मिठिबाई महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून निवृत्ती, १७ पुस्तकांचे (इंग्रजी-गुजराती) अनुवाद;  राजकारण  व समाजकारणाप्रमाणेच गीता, रामायण, इतिहास याही विषयांवर अभ्यासपूर्ण ग्रंथलेखन.. असा संघवी यांचा व्यक्तिमत्वपट. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातही मराठी सहकाऱ्यांनी कधीच कटुता दाखवली नाही, या आठवणीदेखील आवर्जून सांगणारे, सदाउत्साही- काहीसे काटकुळे नगीनबापा (हे त्यांचे गेल्या ४० वर्षांतले अभिधान) १०० वर्षे कसे जगले? याचे उत्तर ‘योग वगैरे नाही. व्यायामही फार नाही. सकाळी पाचपासून दिनचर्या कसोशीने पाळतो, पण देव मानतच नसल्यामुळे त्याचे आभार वगैरे मानायचा प्रश्न नाही’ असे त्यांच्याच शब्दांत!

राजकारणातला लोकांशी केला जाणारा खोटा व्यवहार न खपणारे, धार्मिक नसले तरीही अभ्यास म्हणून महाकाव्ये आणि गीता वाचणारे, गांधीजी आणि त्यांच्या काळाकडे अजिबात ‘स्मृतिरम्य’ प्रकारे न पाहणारे, अशी स्वभाववैशिष्टय़े त्यांच्या लिखाणात उतरली होती. मुंबईचे (जोगेश्वरी) घर सोडून  २०१८ साली सुरतला मुलीकडे स्थलांतर केल्यावर, २०१९ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ ने सन्मानित करण्यात आले. १२ जुलै रोजी दमा, श्वसनाचा त्रास आणि अखेर हृदयविकाराचा झटका या कारणांनी त्यांचे निधन झाले. आपल्या संचिताचा एक स्पष्टवक्ता साक्षीदार आपण गमावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:01 am

Web Title: nagindas sanghavi profile abn 97
Next Stories
1 एनिओ मॉरिकोन
2 सरोज खान
3 लीलाधर कांबळी
Just Now!
X