22 July 2019

News Flash

प्रा. डॉ. बी. शेषाद्री

असमतोल मोजण्याचे ३८ निकष कोणते असावेत, हे या समितीसाठी शेषाद्री यांनी ठरविले.

प्रा. डॉ. बी. शेषाद्री

विद्यापीठीय क्षेत्रात कारकीर्द करत असताना अनेक जण समाजाकडे पाहात नाहीत, समाजाच्या उपयोगी पडत नाहीत, म्हणून तर ‘हस्तिदंती मनोऱ्या’त राहिल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. याला अपवादही असतात. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. डॉ. बी. शेषाद्री. वैकासिक अर्थशास्त्र या विषयात विद्यापीठीय कारकीर्द करत असताना त्यांनी आपल्या परिसराच्या विकासाचा सातत्याने अभ्यास केला, त्याविषयी निष्कर्ष काढले आणि या परिसराच्या शैक्षणिक विकासात कृतिशील भूमिकाही बजावली.

उत्तर कर्नाटक हा बी. शेषाद्री यांचा प्रांत. स्वातंत्र्यपूर्व काळात निजामी मुलखात असलेले या भागातील जिल्हे मागासच राहिले होते. कर्नाटक राज्यनिर्मितीनंतर थोडेफार औद्योगिकीकरण या जिल्ह्य़ांतही पोहोचले, पण तेवढे पुरेसे असते का? सरकारी सवलतींमुळे झालेले औद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरणाला आधुनिक शेतीची जोड देऊन उभी राहणारी विकासाची चळवळ यात फरक असतो की नाही? या प्रश्नांचे प्रतिबिंब, ‘औद्योगिकीकरण आणि विभागीय विकास’ या विषयीच्या त्यांच्या पीएच.डी. प्रबंधातही दिसून आले. राज्यांतर्गत प्रादेशिक असमतोल जसा महाराष्ट्रात आहे, तसा कर्नाटकातही आहे. त्याचा विशेष अभ्यास डॉ. शेषाद्री यांनी सातत्याने केला. त्यामुळेच, राज्य सरकारने विभागीय असमतोलाच्या अभ्यासासाठी डॉ. डी. एम. नंजुन्दप्पा यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीत शेषाद्री यांचा समावेश होता. असमतोल मोजण्याचे ३८ निकष कोणते असावेत, हे या समितीसाठी शेषाद्री यांनी ठरविले. दोनच वर्षांत या समितीचा अहवाल सादर झाला. हैदराबाद-कर्नाटकी विभागातील सहा जिल्ह्य़ांसाठी वैधानिक विकास मंडळे नेमण्याची तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७१ (जे) मध्ये आहेच, पण त्यात बेल्लारी जिल्ह्य़ाचा समावेश शेषाद्री यांच्या अभ्यासामुळे होऊ शकला. शेषाद्री यांनी शैक्षणिक क्षेत्रात एखाद्या कार्यकर्त्यांसारखे काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठातून इंग्रजी आणि अर्थशास्त्र अशा दोन्ही विषयांतून पदव्युत्तर पदवी (एम.ए.) केल्यानंतर १९६९ साली बेल्लारी येथील एएसएम महिला महाविद्यालयात ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले, तेथील अर्थशास्त्र विभाग त्यांनी नावारूपाला आणला, सक्षम केला. ‘सदर्न इकॉनॉमिस्ट’ या संशोधन पत्रिकेत तसेच ‘विचार वाहिनी’ या स्वत: स्थापलेल्या संस्थेच्या अनियतकालिकात लिहिणे, व्याख्याने देणे हा क्रम त्यांनी उतारवयातही सुरू ठेवला होता. अशा या शेषाद्रींना गुरुवारी वयाच्या ८०व्या वर्षी मृत्यूने गाठले, तेव्हा परिसराशी इमान राखणारा अभ्यासक गेल्याची हळहळ अनेकांना वाटली.

First Published on August 14, 2018 2:15 am

Web Title: prof dr b seshadri profile