इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीनचतुर्थाश एवढे प्रचंड बहुमत मिळाले होते. तरुण पंतप्रधान देशाचा कायापालट करणार असे चित्र रंगविण्यात आले होते. संगणक किंवा अन्य बाबींच्या माध्यमातून राजीव गांधी यांनी सुधारणांना सुरुवातही केली होती. तेवढय़ात बोफोर्स तोफांच्या खरेदी व्यवहारात दलाली दिली गेल्याचा संशय भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांनी व्यक्त केल्यावर, राजीव गांधी यांनाच लाच मिळाल्याचा आरोप होऊ लागला. लोकसभेत केवळ दोन जागा मिळालेल्या भाजपने राजीव गांधी यांच्या विरोधात जनमत तापविण्यास प्रारंभ केला. राम जेठमलानी यांनी बोफोर्स घोटाळ्याशी संबंधित दररोज काही प्रश्न उपस्थित केले. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकूणच जनमत राजीव गांधी यांच्या विरोधात जाऊ लागले.. ‘कॅग’चा तो अहवाल दिला होता, तेव्हा या पदावर असणारे टी. एन. ऊर्फ त्रिलोकीनाथ चतुर्वेदी यांनी. बोफोर्स तोफा खरेदीत राजीव गांधी सरकारवर ‘कॅग’च्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले होते. अशा या कणखर प्रशासकीय अधिकाऱ्याचे सोमवारी (७ जानेवारी) वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.

भारतीय प्रशासकीय सेवेतून (आय.ए.एस.) निवृत्त झाल्यावर चतुर्वेदी यांची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. १९८४ ते १९८९ या काळात हे पद भूषविलेल्या चतुर्वेदी यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. १९९२ मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली आणि १९९८ पासून खासदारकीचा दुसरा कालावधी सुरू असतानाच २००२ मध्ये त्यांना राज्यपालपद मिळाल्याने त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. १९५० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केलेल्या चतुर्वेदी यांनी केंद्रात गृह आणि शिक्षण या महत्त्वाच्या खात्यांचे सचिवपद भूषविले होते. दिल्लीचे मुख्य सचिव, चंडीगडचे प्रशासकीय अधिकारी आदी पदांवर त्यांनी काम केले. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर त्यांची २००२ मध्ये कर्नाटकचे राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. काही काळ त्यांच्याकडे केरळच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच राज्यपालपदी असलेल्या चतुर्वेदी यांनी त्यांचे कान टोचले होते. प्रशासकीय अधिकारी किंवा भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून केलेल्या उत्तम कामगिरीबद्दलच त्यांना १९९१ मध्ये पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.