28 January 2021

News Flash

पं. सतीश व्यास

सतीश व्यास यांनी लौकिकार्थाने उत्तम शिक्षण घेतल्यानंतर संगीताची वाट पकडली आणि त्यात मग्न होण्याचे ठरवले.

पं. सतीश व्यास

 

मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्काराचा बहुमान मिळवणारे पं. सतीश व्यास यांचे अभिनंदन अशासाठी करायचे, की त्यांनी घरातच असलेल्या संगीताच्या परंपरेत स्वत:ची वेगळी वाट निर्माण केली. संतूर हे वाद्यच मुळी भारतीयांना या शतकात समजले. काश्मीरच्या लोकसंगीतात मिसळलेल्या या वाद्याला अभिजात संगीताच्या मांडवात प्रतिष्ठा मिळाली, ती पंडित शिवकु मार शर्मा यांच्यामुळे. परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे, हे वाद्य अधिक लोकप्रिय केले ते चित्रपट संगीताने. भारतातला असा एकही संगीतकार नसेल, की ज्यास संतूर या वाद्याचा वापर करण्याचा मोह झाला नसेल. सतीश व्यास यांनी लौकिकार्थाने उत्तम शिक्षण घेतल्यानंतर संगीताची वाट पकडली आणि त्यात मग्न होण्याचे ठरवले.

वडील पं. सी. आर. व्यास हे प्रसिद्ध गायक कलावंत. त्यांच्याकडून संगीताचे बाळकडू मिळणे दुरापास्त नव्हतेच, तरीही सतीश यांनी संगीतात वेगळी वाट चोखाळायचे ठरवले हे विशेष. संतूर हे वाद्य वाजवण्यास तसे कठीण. त्यातून सुमधुर संगीत निर्माण करणे हे तर अधिकच आव्हानात्मक. याचे कारण भारतातील अन्य लोकप्रिय वाद्यांप्रमाणे या वाद्यात एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर सहजपणे जाण्यासाठी मिंड वाजवणे अधिक अवघड. प्रत्येक स्वर स्वतंत्र असणाऱ्या या वाद्याला सतीश व्यास यांनी आपलेसे केले, कारण त्यांना शिवकु मार शर्मा यांच्यासारखा- या वाद्याचा अध्वर्यू गुरू म्हणून मिळाला. या वाद्यावर हुक मत मिळवून ते लोकप्रिय करण्यासाठी व्यास यांनी त्यांच्या गुरूंप्रमाणेच खूप कष्ट घेतले. त्याचा परिणाम असा झाला की, आता भारतीय अभिजात संगीताच्या कोणत्याही कार्यक्रमात संतूर हे वाद्य अविभाज्य घटक झाले. या वाद्याची खुमारी रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे प्रयत्न म्हणूनच कारणी लागले, असे म्हणता येते.

वाद्य व त्याच्या क्षमता यांच्या जाणिवेबरोबरच त्याच्या मर्यादांचाही विचार कलावंताला करावा लागतो. सतीश व्यास असा विचार करतात, म्हणूनच या वाद्याच्या क्षमता विस्तारण्याचे काम त्यांना करता येऊ शकते. स्वत: उत्तम वादक असल्याने संगीत सर्वदूर पोहोचण्यासाठी व्यास यांनी संगीत कार्यक्रमांच्या आयोजनाचे काम मोठय़ा प्रमाणावर केले. देशात आणि परदेशातही संगीत रसिकप्रिय होण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान, पद्मश्री यांसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये तानसेन पुरस्काराची पडलेली भर त्यांच्या संगीत कारकीर्दीची झळाळी वाढवणारी आहे. आजच्या काळात अभिजात संगीताच्या क्षेत्रासमोर असलेली अनेक गुंतागुंतीची आव्हाने स्वीकारून त्याला सामोरे जाण्यासाठी सतीश व्यास यांच्यासारखे कलावंत अधिक मोलाचे योगदान देत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2020 12:01 am

Web Title: pt satish vyas profile abn 97
Next Stories
1 सुगथाकुमारी
2 किम की-डॉक
3 रॉबर्ट लेवांडोवस्की
Just Now!
X