टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस. टाटा समूहाची ‘ब्ल्यू आईड’ कंपनी आणि समूहाच्या शिरपेचात तिला हिऱ्याचे स्थान देणारे नटराजन चंद्रशेखरन ऊर्फ एन. चंद्रा. टाटा समूहाचे टाटा कुटुंबाबाहेरील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारल्यानंतर टीसीएसचे काय, असा सवाल महिन्याभरापूर्वीच उपस्थित झाला होता. मात्र लगेचच राजेश गोपीनाथन हे नाव त्यासाठी कोणतीही समिती अथवा मुलाखत आदी प्रक्रिया पार न पडता निश्चित झाले यातच चंद्रा यांच्या उत्तराधिकाऱ्याची योग्यता स्पष्ट झाली.

गोपीनाथन यांनी १६ वर्षांपूर्वी टीसीएसमधील आपली कारकीर्द सुरू केली. २००१ मध्ये टीसीएसमध्ये आले. या वेळी इंटरनेट ब्राऊजिंगकरिता मागणी होती आणि टीसीएस अन्य कंपन्यांकरिता त्यांच्या व्यवसायासाठी ते तयार करून देत होती. गोपीनाथन पुढे २०१३ मध्ये कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी झाले. आर्थिक गणितांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. टीसीएसमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसायातील नफा-वाढीचे आकडे त्यांनी स्वत: बांधले आहेत. प्रकल्प, धोरण, विपणन, विदेशातील व्यवसाय असे सारे व्यवहार त्यांनी टीसीएसमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी होईपर्यंत हाताळले आहेत.

केरळमधील निसर्गरम्य थ्रिसुरमधील गोपीनाथन यांचे बालपण मात्र लखनऊमध्ये गेले. त्यांचे वडील रेल्वेत असल्याने बदलीनुसार त्यांचे शिक्षण विविध शहरांमध्ये घडत गेले. टाटा समूहाच्या व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये ते रुजू झाले. त्यानंतर तीन वर्षांनी ते टाटा इंडस्ट्रीजमध्ये आले. टीसीएसमध्ये येण्यापूर्वी ते येथे दोन वर्षे होते.

अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेतून त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण, एनआयटीमधून इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्सची अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. टीसीएसचे मुख्य वित्तीय अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी ही दोन्ही पदे गोपीनाथन यांच्याकडे एन. चंद्रा यांच्यापेक्षा लवकर आली आहेत.

४९ वर्षीय गोपीनाथन हे एन. चंद्रांच्या मुशीत तयार झालेले आहेत. तेव्हा त्यांच्यासाठी टीसीएस ही तशी नवीन नाही. फक्त नव्या पदावरील भूमिका ते कशी पार पाडतात, हे पाहावे लागेल. ३ लाख टीसीएशियन्सबरोबर (कर्मचारी) त्यांचे बॉस म्हणून संबंध कसे राहतात, हेही सध्याच्या आयटी क्षेत्रातील कर्मचारी गळतीच्या वातावरणात महत्त्वाचे ठरणार आहे.

लाभांशरूपात मुख्य प्रवर्तक टाटा सन्सला मोठा लाभ मिळवून देणारी ही कंपनी आहे. १०३ अब्ज डॉलरच्या टाटा समूहाचा या कंपनीत ७३ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. १६.५ अब्ज डॉलरची टीसीएस ही देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. वार्षिक १२ टक्के दराने तिची वाढ सध्या होत आहे. अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशामार्फत तिला ६५ टक्क्यांपर्यंतचा व्यवसाय मिळतो.

नवे मुख्य परिचलन अधिकारी एन. जी. सुब्रमण्यम, मुख्य वित्तीय अधिकारी व्ही. रामकृष्णन अशी नवीन फळीच गोपीनाथन यांच्याबरोबर टीसीएसमध्ये आहे. चंद्रशेखरन यांनी भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मात्र अमेरिकेतील बदलती धोरणे, ब्रेग्झिटमधील घडामोडी यामुळे टीसीएसपुढेही येत्या कालावधीत आव्हाने कायम असतील. एन. चंद्रा यांच्याबरोबरच टीसीएसला १० अब्ज डॉलरपुढील माहिती तंत्रज्ञान कंपनी बनविण्यात गोपीनाथन यांचा काही हिस्सा आहेच. उलाढालीच्या तुलनेत ही कंपनी अधिक मोठी करण्याचे वचन त्यांनी नियुक्तीच्या पहिल्या दिवशी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या ई-मेलमध्ये दिलेच आहे.