समाजवादाची भारतीय संदर्भात मांडणी करणारे राम मनोहर लोहिया यांनी राम एकबाल सिंह ‘वारसी’ यांना ‘पिरो के गांधी’ अशी उपाधी दिली होती. बिहार विधानसभेच्या पिरो या मतदारसंघात सिंह यांचे काम अधिक होते, म्हणून ते ‘पिरो के गांधी’. पुढे काम वाढले आणि लोक त्यांना ‘शहाबाद के गांधी’ म्हणूनही ओळखू लागले. ही – आणि हीच- राजकारणातील त्यांची कमाई. ते आमदारही झाले होते, पण केवळ ‘माजी आमदार’ असणे, एवढेच त्यांचे कर्तृत्व कधीही नव्हते. ते १९६९ मध्ये आमदार झाले, हे पद १९७२ पर्यंत टिकले. मात्र आधी जसे जगलो तसेच आमदारकीच्या नंतरही जगणे त्यांनी पसंत केले.. कार्यकर्ता म्हणूनच ते जगले!

हे असे जगण्यासाठी आजच्या राजकारणात कोणत्याही पक्षात न दिसणारी जी सचोटी लागते, ती राम एकबाल सिंह यांनी वयाच्या १७ व्या वर्षी १९४२ च्या लढय़ात भाग घेतला तेव्हापासून टिकवली. आमदार म्हणून मिळणारे निवृत्तिवेतनही त्यांनी नाकारले होते. ‘मला ही लाच नको’ असे ते म्हणत. ‘आमदार झालो तो लोकांसाठी. प्रसंगी यापुढेही मी सरकारशी लढेन, लोकांचे लढे उभारेन.. त्यात पेन्शनचा अडथळा नको’ असे त्यांचे म्हणणे. आधी ‘संघटना समाजवादी पक्षा’तर्फे, तर पुढे ‘जनता दला’तर्फे ते स्थानिक लोकलढे उभारत राहिले. जनता दलाची शकले झाली, तेव्हा पुढे भाजपला साथ देणाऱ्या ‘संयुक्त जनता दला’त ते गेले खरे, पण पक्षनेतृत्वाच्या जवळ जाणे शक्य असूनही ते गेले नाहीत.

त्यांनीच अगदी नवख्या रामविलास पासवान यांचे नाव विधानसभा गटनेतेपदासाठी पक्षात पहिल्यांदा सुचवले. तोवर, रामानंद तिवारींसारखे नेते असताना पासवानांसारख्या ‘कालच्या तरुणा’चा विचारही पक्ष करीत नव्हता. ‘शेवटच्या माणसाकडे पाहण्या’चा आणि त्याच्यासाठी काम करण्याचा बाणा राम एकबाल सिंह सोडत नसत. ‘चले जाव’ चळवळ सुरू होताना ते नुकतेच डालमियानगरच्या डालमिया फॅक्टरीत मुन्शी म्हणून नोकरीस लागले होते. तिच्यावर लाथ मारून चळवळीत आले, ते कायमचे. त्या वेळी तुरुंगात राम मनोहर लोहियांची भेट झाली, तर पुढे जयप्रकाश नारायण यांची. जयप्रकाशजींचे ‘सम्पूर्ण क्रांती’चे स्वप्न आणि गांधीजींचे हिंदस्वराज एकमेकांहून निराळे नाही, अशी खूणगाठ बांधलेल्या सिंह यांचे काम आणीबाणीनंतरही थांबले नाही. गावागावांत गांधीवादी मार्गाने लोकांना जगण्याचे आणि चळवळीचे बळ देणे, हे त्यांनी महत्त्वाचे मानले. इतके की, अखेपर्यंत तेही स्वत: विपन्नावस्थेत, कौले फुटलेल्या साध्याशा घरात राहात होते. त्यांचे आजारपण लक्षात आल्यामुळे माजी समाजवादी असलेल्या नेत्यांनीच भोजपूरच्या ‘इंदिरा गांधी आयुर्विज्ञान संस्थे’च्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करविले, तेथेच मुख्यमंत्री नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांची रीघ गेल्या शुक्रवारपासून लागली.. पण अखेर हाही सच्चा कार्यकर्ता हे जग सोडून गेला. यापुढेही ‘माजी आमदार राम एकबाल सिंह’ यांच्या बातम्या हिंदी पट्टय़ात वाचल्या जातील, पण ते बलिया (उत्तर प्रदेश) येथील भाजपचे, भ्रष्टाचाराचा आरोप झालेले, तुरुंगवास टाळणारे.. म्हणजे चारचौघांसारखेच. गेले ते राम एकबाल सिंह वेगळेच होते.