रूपम शर्मा हा अवघ्या २३ वर्षांचा भारतीय तरुण. बुद्धिमत्तेच्या जोरावर सध्या जागतिक पातळीवर चमकतो आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ज्या भन्नाट कल्पना वापरून नवनिर्मिती केली त्याला तोड नाही. त्यामुळेच आज त्याची तुलना स्टीव्ह जॉब्ज व एलोन मस्क यांच्यासारख्या दिग्गज वैज्ञानिक-तंत्रज्ञांशी होत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान त्याने विकसित करण्यासाठी अलीकडेच बर्लिनमध्ये त्याला जागतिक आरोग्य शिखर बैठकीचा २०१८ मधील स्टार्ट अप पुरस्कार मिळाला आहे. दृष्टिहीनांसाठी मॅनोव्ह्य़ू ही प्रणाली त्याने विकसित केली असून त्यामुळे आता छापील मजकूर वाचण्यासाठी ब्रेल लिपीची गरज उरणार नाही. रूपमने दृष्टी बुद्धिमत्तेचा वापर करून वेगळ्या पद्धतीने अंधांना वाचनाची सुविधा निर्माण करून दिली आहे. याच प्रणालीला २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्ट इमॅजिन करंडक व नंतर याहू असेंशुअर इनोव्हेशन जॉकीज पुरस्कार मिळाला होता.

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाने ही उंची गाठली, हे निश्चितच अभिमानस्पद. हरयाणातील फरिदाबाद येथे शिकलेल्या रूपमने तेथील मानव रचना विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. रूपमला रंगांध व्यक्तींसाठी सुरुवातीला गेम तयार करायचा होता. त्यासाठी त्याने संशोधन सुरू केले. ब्रेल लिपीनंतर अंधांच्या साक्षरतेसाठी फारसे काम झालेले नाही, हे त्याच्या लक्षात आले. त्यातून त्याने ‘मानवरचना इनक्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर’च्या मदतीने अंधांच्या समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला. त्यातून तयार झालेले मॅनोव्ह्य़ू हे उपकरण, हातमोज्यांसारखे हातात घालता येते. त्यात कॅमेरा असून तो सर्व मजकूर वाचतो व त्याचे आवाजात रूपांतर करतो. जर वाटेत अडथळे असतील, तर कंपनांच्या माध्यमातून इशारा देतो. शिवाय, यामुळे दृष्टिहीनही मोबाइल-संदेश पाठवू शकतात. त्याने आरोग्य क्षेत्रासाठी ‘फिजिओ’ हे दुसरे उपकरण तयार केले आहे. त्यातून आरोग्य उद्योगाला विशेषकरून फिजिओथेरेपिस्टला फायदा होणार असून मायक्रोसॉफ्टचा किनेक्ट संवेदक यात वापरला आहे.

एमआयटी टेक रिव्ह्य़ूने त्याचा २०१६ मध्ये गौरव केला असून त्याला भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कारही मिळाला होता. समाजात बदलासाठी रूपमने विज्ञान-तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे उपयोग केला, त्यातच त्याचे वेगळेपण दिसते.