केवळ महिलांचा समावेश असलेल्या चमूने गेल्या आठवडय़ात स्पेसवॉक यशस्वी केले. एरवी कुठल्याही महिलेबरोबर स्पेसवॉकसाठी पुरुषाला पाठवले जात असे, त्या पाश्र्वभूमीवर ही ताजी अंतराळ-चाल निराळी ठरली. स्पेसवॉक ही आता नित्याची बाब झाली आहे, पण हे साहस पहिल्यांदा खूप अवघड होते; कारण यात जीवाशी खेळच असतो. असा जगातील पहिला  स्पेसवॉक रशियाचे अलेक्सी लिओनोव यांनी १९६५ मध्ये केला होता! सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाच्या त्या काळात, स्पेसवॉकमध्ये रशियाने अमेरिकेवर मात केली होती. या जिद्दी अवकाशवीराचे नुकतेच निधन झाले. लिओनोव यांचा जन्म सायबेरियात १९३४ साली अल्ताई भागात झाला. हवाई दल अकादमीतून शिक्षण घेतल्यावर, अवकाश कार्यक्रमातील २० अवकाशवीरांत त्यांची निवड झाली. लिओनोव यांना खरे तर चित्रकार व्हायचे होते, पण प्रत्यक्षात त्यांच्या जीवनात अवकाश प्रवासाचे विलक्षण वळण आले. लिओनोव यांनी जगातील पहिले स्पेसवॉक केले, ती जगातील सतरावी समानव अवकाश सफर होती. १८ मार्च १९६५ रोजी ‘व्होसखोड २’ या अवकाशयानाबाहेर पडून त्यांनी जगातील पहिल्या स्पेसवॉकचा मान मिळवला. त्यासाठी दीड वर्ष त्यांनी सराव केला होता. जूनमध्ये अमेरिकेचा स्पेसवॉक ठरला असताना, लिओनोव यांनी मार्चमध्येच तो करून रशियाला मोठा मान मिळवून दिला. १२ मिनिटे ९ सेकंदांचा हा स्पेसवॉक झाल्यानंतर यानाकडे परतताना त्यांनी जवळपास मृत्यूचा अनुभव  घेतला होता; कारण त्यांचा स्पेससूट हवेने अपेक्षेपेक्षा जास्त फुगवला गेला होता. पण त्यांनी अवघी पाच मिनिटे हाताशी असताना काही हवा बाहेर काढून टाकली आणि यानाकडे सुखरूप परतले. हे अवकाशयान उरल पर्वतात परतले, तेथे दोन रात्री गोठलेल्या अवस्थेत काढून ते परत आले. अवकाशवीरांसाठीचे ‘नेपच्यून’ हे छोटे वृत्तपत्र ते संपादित करीत असत. रशियाने चांद्रमोहिमा रहित केल्या नसत्या, तर लिओनोव हे रशियाचे पहिले चांद्रवीर ठरले असते. १९७५ मध्ये लिओनोव हे अमेरिका-रशिया यांच्या ‘अपोलो-सोयूझ’ या संयुक्त प्रकल्पातही सहभागी झाले. चित्रकला त्यांना तेव्हाही खुणावत होतीच, त्यामुळे त्यांनी सहकारी अमेरिकी अवकाशवीराचे चित्रही काढले होते. तत्कालीन महासत्तांच्या या मैत्रीतून पुढे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची निर्मिती झाली. ‘अवकाशात गेल्यानंतर आपण कुठल्या देशाचे नागरिक आहोत हे विसरूनच जातो,’ अशा शब्दांत त्यांनी मानवी संस्कृतीचा सारांशच ‘टू साइड्स ऑफ दी मून’ या पुस्तकात सांगितला होता.