पोलंडमधून अमेरिकेत आलेल्या निर्वासित जोडप्याची ती कन्या. अमेरिका हा प्रगत देश असला तरी रसायनशास्त्र मुलींसाठी नसते असा शहाजोग पुरुषी सल्ला तिलाही सहकाऱ्यांकडून मिळालेला. पण तिने उमेद सोडली नाही. तिने रेणूंच्या रचनेबाबत बरेच संशोधन केले होते. स्फटिकशास्त्रज्ञ हीच तिची ओळख होती. तिचे रेणूंच्या रचनेचे संशोधनच तिच्या पतीला नोबेल मिळण्यामागचे एक रहस्य होते. तिचे नाव इसाबेला हेलन कार्ले; पूर्वाश्रमीची ल्युगोस्की. इसाबेला यांचे नुकतेच निधन झाले. मिशिगनमधील डेट्रॉइट येथे जन्मलेल्या इसाबेलाच्या शिक्षिकेने तिला रसायनशास्त्राची गोडी लावली, ती अखेपर्यंत कायम टिकली. नंतर मिशिगन विद्यापीठातून त्यांना विद्यावृत्ती मिळाली. तिथेच त्यांनी वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी विज्ञानात पदवी घेतली. पीएचडीपर्यंत क्रमाने शिक्षण होत गेले. पदवीला असताना जेरोम कार्ले तिला भेटला. रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत जेव्हा जेरोम व इसाबेला यांची पहिली भेट झाली तेव्हा काही कारणाने ते एकमेकांशी बोललेच नाहीत, पण नंतर हा अबोला संपला व प्रेमात पडून त्यांचा विवाहही झाला.

रेणूंच्या रचनांबाबत जेरोमने जे संशोधन केले होते त्यात मोठा वाटा इसाबेलाचा होता. लॉरेन्स ब्रॉकवे हे दोघांचेही पीएचडीचे मार्गदर्शक होते. अगदी पारंपरिक पद्धतीने सांगायचे तर एका यशस्वी शास्त्रज्ञाच्या मागे एक महिला वैज्ञानिक होती, असे जेरोम यांच्या नोबेलबाबत सांगता येईल. स्फटिकांवर क्ष किरण टाकून त्यांच्या रेणूंची रचना निश्चित करण्याचे तंत्र १९४० पर्यंत उदयास आले होते, पण ते मर्यादित व कि चकट होते. नौदल संशोधन प्रयोगशाळेत काम करीत असताना जेरोम यांच्या संशोधनाला इसाबेलाची साथ मिळाली, त्यातून त्यांनी रेणवीय रचना निश्चित करण्याचे नवे तंत्र शोधले. त्यासाठी डॉ. जेरोम कार्ले यांना १९५० च्या दशकात गणितज्ञ हर्बर्ट हॉप्टमन यांच्यासमवेत नोबेल मिळाले होते. आपल्या पत्नीचाही यात सन्मान व्हायला हवा होता असे डॉ. जेरोम यांना त्या वेळी वाटले होते. त्यांच्या या तंत्राने रेणूंच्या त्रिमिती रचना शोधता आल्या. त्यातून नवीन औषधांची निर्मिती शक्य झाली. माझ्या वडिलांनी स्फटिकांच्या रचनेत फारसे संशोधन केलेच नव्हते, ते काम आईने  केले होते, असे त्यांची कन्या हॅन्सनने सांगितले.

क्ष किरण स्फटिक शास्त्राचे उपयोग पतीने मांडलेल्या सिद्धांताच्या आधारे इसाबेला यांनी व्यवहारात आणले. औषधे, स्टेरॉइड्स व काही विषे यांच्या रेणवीय रचनांचा त्यांनी अभ्यास केला होता. प्रथिनांसारख्या रेणूंचा अभ्यास त्यांच्या तंत्राने शक्य झाला. त्यांच्या या संशोधनाची इतर वैज्ञानिकांनी उशिराने दखल घेतली. इसाबेला व जेरोम या दोघांनीही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अणुबॉम्ब बनवण्याच्या मॅनहटन प्रकल्पात काम केले होते. इसाबेलाने त्या वेळी अशुद्ध प्लुटोनियम ऑक्साइडपासून प्लुटोनियम क्लोराइड वेगळे काढले होते. पुढे दोघेही नौदलाच्या प्रयोगशाळेत काम करीत होते व जुलै २००९ मध्ये दोघे एकाचवेळी निवृत्त झाले.

इसाबेला यांच्या नावावर किमान साडेतीनशे शोधनिबंध होते व त्या अमेरिकन कला व विज्ञान अकादमी, राष्ट्रीय विज्ञान अकादमी, अमेरिकन तत्त्वज्ञान अकादमीच्या सदस्या होत्या. त्यांना बोवेर पुरस्कार मिळाला होता. १९९५ मध्ये त्यांना राष्ट्रीय विज्ञान पदकाने सन्मानित करण्यात आले. इसाबेला यांच्या संशोधनाचा करिष्मा एवढा की, जो कुणी नौदलाच्या संशोधन प्रयोगशाळेत येत असे तो इसाबेला यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करीत असे. त्यांच्या निधनाने रसायनशास्त्रात काम करणाऱ्या मोजक्या महिला संशोधकांपैकी एक दुवा निखळला आहे.