News Flash

वीरा साथीदार

वीरा साथीदार यांचे मूळ नाव विजय वैरागडे. पण, आडनावावरून जात कळते म्हणून त्यांनी कधीही आडनाव लावले नाही.

वीरा साथीदार

तो जातिव्यवस्थेच्या तीव्र शस्त्रांनी छिन्न झालेल्या रणात समतेची तुतारी फुंकत एकटाच उतरायचा, वीरासारखा. तो ‘साथीदार’ही होता. एक असा साथीदार जो रंजल्या-गांजल्यांच्या अडत्या काळात रात्री-अपरात्री धावून यायचा मदतीची रसद घेऊन. मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडात करकचून बांधल्या गेलेल्या समाजाला क्रांतीचा संदेश देत तो फिरायचा. परंतु, ही क्रांती सम्यक होती बुद्धाच्या शालीन कृतिशीलतेसारखी. म्हणून त्याने या सम्यक क्रांतीसाठी शस्त्र नव्हे तर डफली हातात घेतली. तो गात असलेल्या परिवर्तनाच्या पोवाड्यांनी अनेक वाड्या-वस्त्या जागृत केल्या. परंतु, करोनाशी मात्र त्याची झुंज अपयशी ठरली अन् इतरांना स्वातंत्र्याचे श्वास वाटणारा हा अवलिया अखेर निष्प्राण झाला. वीरा साथीदार असे या झुंजार माणसाचे नाव.

वीरा साथीदार यांचे मूळ नाव विजय वैरागडे. पण, आडनावावरून जात कळते म्हणून त्यांनी कधीही आडनाव लावले नाही. वंचितांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी खऱ्या साथीदाराची गरज असते म्हणून ‘साथीदार’. महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह््यात त्यांचा जन्म झाला. जन्मापासूनच विषमतेचे दाहक चटके त्यांनी सोसले होते. त्यातून एक प्रचंड संताप धमन्यांमधून सारखा वाहत असायचा. दलित रंगभूमीने या संतापाला वाट मोकळी करून दिली. पण, केवळ रंगभूमीवरून केलेल्या स्थित्यंतराच्या गर्जना वंचितांच्या वस्त्यांपर्यंत पोहोचणार नाहीत, हे लवकरच त्यांच्या लक्षात आले. म्हणून मग त्यांनी ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेतून समाजजागृतीचे काम हाती घेतले. ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाच्या रूपाने त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष उभा केला. हा संघर्ष इतका टोकाचा असायचा की अनेकदा त्यांना पोलिसांचा ससेमिराही सोसावा लागला. पण, साथीदार यांनी घेतला वसा सोडला नाही.  ‘कोर्ट’ चित्रपटात त्यांनी साकारलेला नारायण कांबळे हे जणू त्यांचेच सिने-प्रतिरूप होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो ऑस्करसाठी नामांकित झाला, देश-विदेशात नाव झाले. प्रसिद्धीचे वलयही लाभले. परंतु, ते शेवटपर्यंत साधेच राहिले, कधीही त्यांच्यात अहंकार आला नाही. कॅमेऱ्याचा झगमगाट मागे ठेवून वीरांची पुन्हा बाबासाहेबांच्या स्वप्नातील समतेची चळवळ कशी पुढे जाईल यासाठीची धडपड सुरू झाली. ते भाड्याच्या घरात राहात, कारण त्यांनी कमावलेला सर्व पैसा हा सामाजिक कार्यासाठी  दिला. समाजासाठीचा हा संघर्ष एक नवा इतिहास घडवेल असे वाटत असतानाच १३ एप्रिल रोजी करोनाने तो संघर्षच संपूवन टाकला. पण, वीरा साथीदार तरीही उरतील, त्यांनी उभारलेल्या लढ्याच्या कणाकणातून…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 12:06 am

Web Title: veera sathidar profile abn 97
Next Stories
1 तु. शं. कुळकर्णी
2 आय. ए. रहमान
3 फातिमा झकेरिया
Just Now!
X