पत्रकाराचे मन बंडखोर असावे लागते, नाही तर त्याचा कारकून होतो. सत्तर वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकीर्दीत एस. निहाल सिंग यांनी स्वतला कधीच कारकून होऊ दिले नाही. म्हणूनच आणीबाणीविरोधात ताठ मानेने उभे राहिलेल्या थोडय़ा पत्रकारांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. सत्ताधाऱ्यांची तळी उचलण्यास पत्रकारिता मानणाऱ्या संपादकांच्या फौजेत निहाल सिंग कधीही नव्हते. सरकारचे ‘प्रचार सैनिक’ बनण्यासाठी आत्ताच्या पत्रकारांमध्ये चढाओढ लागलेली असताना, निहाल सिंग यांच्यासारख्या लोकशाही विचारांच्या उदारमतवादी संपादकाला देशाने गमवावे हे खरोखरच पत्रकारितेचे मोठे नुकसान आहे!

आणीबाणीत त्यांनी ‘स्टेट्मन’च्या पहिल्या पानावर ‘आजचा अंक सेन्सॉरशिपखाली छापला गेला आहे’ असे वाक्य ठळकपणे छापून इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात शड्ड ठोकला. आणीबाणीचा निषेध म्हणून सरकारी बातमी न छापता विदेशी बातम्यांनाच महत्त्व देण्यास सुरुवात केली. इंदिरा गांधींचे ‘अनुयायी’ तत्कालीन माहिती-प्रसारणमंत्री विद्याचरण शुक्ल यांनी जाब विचारताच, ‘वृत्तपत्रात काय छापायचे नाही हे तुम्ही आणीबाणी लादून ठरवू शकता, पण काय छापायचे हे तुम्हाला ठरवायचे असेल तर तसा नवा कायदा तुम्हाला करावा लागेल’, हे निहाल सिंग यांचे सडेतोड उत्तर होते. इंदिरा गांधींनी आणीबाणीचे कौतुक करताच त्यांना त्यांच्यासमोरच सुनावण्याची हिंमतही त्यांनी दाखवली होती. न्यूयॉर्कमधील ‘इंटरनॅशनल एडिटर ऑफ द इयर’ (१९७७) हा पुरस्कार, ही या निष्ठेची पावती. सत्तेच्या दरबारातील सत्य लोकांपर्यंत पोहोचवणे हेच पत्रकारांचे काम असते. त्यासाठी सरकारच्या विरोधात लिखाण करावेच लागते असे मानणाऱ्या निष्ठावान पत्रकारांपैकी निहाल सिंग हे एक ; त्यामुळेच वृत्तपत्र हे संपादकानेच चालवायचे असते (इतरांनी नाही!) या भूमिकेवर ते ठाम राहिले.

स्टेट्मन, दी इंडियन एक्स्प्रेस, इंडियन पोस्ट आणि खलीज टाइम्स या चार वृत्तपत्रांत त्यांनी संपादकपद भूषवले. गेली वीस वर्षे ते स्तंभलेखन करत असत. ओघवत्या शैलीत ते सरकारी धोरणांतील चुकांवर बोट ठेवत त्यामुळे त्याचे लेखन लोकप्रिय होते. संपादक होण्याआधी निहाल सिंग यांनी देश-विदेशात बातमीदारी केली. पाकिस्तान, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, सिंगापूर, अमेरिका, इंडोनेशिया या देशांत प्रतिनिधी म्हणून काम केले. यामुळे निहाल सिंग यांच्याकडे विदेशनीतीतज्ज्ञ म्हणूनही पाहिले जाई. त्यांचे वडील गुरमुख सिंग दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री होते, नंतर राजस्थानचे राज्यपालही होते. १९२९ मध्ये रावळिपडीत जन्मलेल्या निहाल सिंग यांना सत्तेचा दरबार लहानपणापासून ज्ञात होता. पण, त्याच्या आहारी न जाता सत्तेतील उणिवा चिमटीत पकडून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे भान त्यांनी कधीही सोडले नाही!