दुचाकी असो वा चार चाकी तिच्या निर्मिती क्षेत्रात – कंपन्यांमध्ये पडद्याआड काय घडते हे उलगडून दाखविणारे हे नवे सदर वाचकांसाठी. चालक-वाहन खरेदीदारांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या बाबींचा ऊहापोहही यात केला जाईल. त्याचबरोबर नवनव्या वाहनांमधील वैशिष्टय़पूर्ण अ‍ॅक्सेसरीजची ओळख व त्याची भारतीय वाहन क्षेत्र तसेच येथील रस्ते-वाहतूक व्यवस्थेबरोबरची सांगडही ‘न्युट्रल व्हय़ू’द्वारे दर आठवडय़ाला येथे घातली जाईल.

कल्पना करा. सरळ रस्ता आहे. तोही अगदी गुळगुळीत. काहीही वळणे नाहीत. अथवा डायव्हर्शनही. डिव्हायडरही लक्षात येण्यासारखे आहेत. मध्यभागी छोटी झाडे आहेत की ज्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाइटचा त्रास जाणवणार नाही; शिवाय त्या झाडाची रंगबिरंगी फुले रेडियमप्रमाणे कार्य करू शकतील. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पुरेसे कुंपण आणि दिशादर्शक आहेत.
आता हेच युरोपातील रस्त्यांबाबत. त्यांचं साधम्र्य इथंही आढळतं. तेही आपल्या शेजारच्या गुजरातमध्ये. राज्यातील रस्त्यांवरून प्रवास करण्याची संधी नुकतीच आली. वाहन चालविण्याचा खरा आनंद या वेळी मिळाला. कोणत्याही वाहनचालकासाठी आदर्श रस्ता व्यवस्था इथे आढळते आणि त्यामुळे मोठा प्रवासही सुखद ठरतो. अर्थात रस्त्याची देखभालही त्यासाठी कारणीभूत ठरते. नियमित दुरुस्ती तेही विनावाहतूक अडथळा वगैरे सारे ओघाने आलेच.
विकसित देशामधील रस्तेस्थिती खरच खूपच चांगली आहे. गुजरातकडे पाहून त्याबाबत थोडं समाधान नक्कीच होतं. तुम्ही भारतात आहात हे कधी विसरायला होतं त्यामुळे. महाराष्ट्रात जेव्हा मी आमचे डिझेलवरील वाहन चालवितो तेव्हा ते १० किलो मीटर प्रति लिटर अ‍ॅव्हरेज देते. हेच वाहन गुजरातमध्ये १३ किलो मीटर प्रति लिटर इंधनक्षमता देत होते. म्हणजे चक्क ३० टक्के सुधारणा होती! वाहनाचं मायलेज वाढविण्याचा प्रयत्न केला तरी इथं ते व्यर्थ होतं.
राज्य महामार्ग म्हणून गुजरातचे रस्ते निश्चितच आदर्श आहेत. तिथे प्रति तास १०० किलो मीटर वेग सहज राखू शकता येतो. तुमच्या वाहनप्रकाराशी त्याचा संबंध नसतो. अशा वेळी दिवसाला ७०० किलो मीटरचा प्रवासही तुम्ही न थकता करू शकता. अहमदाबाद ते वडोदराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवरील ९५ किलो मीटरचा प्रवास तर अवघ्या तासाभरात पूर्ण झाला.
कोणत्याही अडथळ्याविना सलग आणि निर्धोक प्रवास हा वाहन चालविणाऱ्या आनंदच देत नाही तर तो प्रवास अधिक सुखासीनही करतो. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग हे गतिरोधकमुक्त करणंही तेवढंच गरजेचं आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांबाबत चांगलं बोलणं जरा कठीणच आणि गुजरातशी तुलनाच करायची झाली तर ते एक दिव्य संकट. आपल्या राज्यात अनेक राज्य महामार्ग हे तर एकेरी मार्गिकेचेच आहेत. शिवाय दुभाजनकरिता साधी पट्टीही त्यावर नसते. चौपदरी रस्त्यांवर ती काही प्रमाणात आढळते. राष्ट्रीय महामार्गाशी तर त्याची तुलनाच नको.
अशा चांगल्या रस्त्यांसाठी किंमत ती काय मोजावी लागणार? गुजरातमधील राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गाचा टोल खर्च अवघा प्रति किलो मीटर एक रुपया आहे. अडथळाविना आणि सुलभ दीर्घ प्रवास होत असेल तर त्याकरिता हा खर्चही काहीच नाही!
प्रणव सोनोने pranavsonone@gmail.com