इंधन म्हणून डिझेल हे काही वर्षांपूर्वी अक्षरश: इंधन क्षेत्रातील राजा होते. मायलेज चांगले मिळते म्हणून प्रत्येकालाच डिझेलवर धावणारे वाहनच हवे होते. त्यासाठी अधिक किंमत मोजायची तयारीही अनेकांची असायची. कारण त्यामागे लाभ मिळत होते. डिझेल वाहनांना मिळत असलेली ही पसंती पाहून ज्या कंपन्या या इंधनावर वाहने तयार करत नव्हत्या त्याही मग या गटात उतरल्या. स्पर्धकांबरोबर टिकून राहण्यासाठी आणि आपल्या उत्पादनांची विक्री वाढण्यासाठी ते त्यांनाही आवश्यकच होते.

सुपर कॉम्पॅक्ट हॉचबॉक या श्रेणीतील वाहनांना कधीच डिझेल इंजिनाची गरज पडली नाही. मात्र तीदेखील या गटात येऊ लागली. दिवसेंदिवस ही स्पर्धा वाढतच गेली. मात्र गेल्या वर्षभरापासून हे चित्र बदलले आहे. डिझेलचा इंधन क्षेत्रावरील वरचष्मा जाऊ पाहत आहे. गेल्या वर्षांतील फोक्सवॉगनचा अमेरिकेतील घोटाळा आणि या वर्षी भारतातील नवी दिल्ली परिसरातील मोठय़ा क्षमतेच्या डिझेल वाहनांवरील बंदी यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. डिझेल वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांबरोबरच ग्राहकही याबाबत संभ्रमावस्थेत सापडला.

डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमतीमध्ये गेल्या दहा वर्षांतच खूपच दरी होती. मात्र मायलेजबाबत दीर्घकालीन विचार करत खरेदीदार डिझेलवरील वाहनखरेदीलाच प्राधान्य देई. गेल्या आठवडय़ापर्यंत मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ६५.७० व ५७.४० रुपये प्रतिलिटर होते. हा फरक आता एकेरी अंकात (८) आला आहे. अशा वेळी कोणती कार घ्यावी हे कसे ठरवावे?

एक साधे उदाहरण घेऊ या. महिन्याला १५,००० विक्री होणारी एक भारतीय बनावटीची कॉम्पॅक्ट सेदान कार आहे. तिचे डिझेलवरील सर्वात वरच्या श्रेणीतील वाहन ९.६० लाख (एक्स शोरूम-मुंबई) रुपये किमतीचे आहे. पेट्रोलवरील याच कारची किंमत ८.२० लाख रुपये आहे. म्हणजेच दोन्हींमध्ये फरक १.४० लाख रुपयांचा आहे. तुम्ही पेट्रोलवरील कार खरेदी केली तर तुम्ही २,१३० लिटर पेट्रोल खरेदी करू शकणारी बचत करू शकता. या वाहनाचा १६ किलोमीटर प्रतिलिटर असा प्रतिसाद गृहीत धरला तर तुम्ही ३४,००० किलोमीटर प्रवास करू शकता. वर्षांला १०,००० किलोमीटर वाहन चालविले तरी तुम्ही तीन वर्षांचे इंधन वाचवू शकता. डिझेल वाहने प्रतिसाद चांगला देतात यात शंका नाहीच. मात्र तुमचा प्रवास किती आहे, सरासरी तुम्ही किती अंतर वाहनाद्वारे कापता?

वाहन खरेदीदार आता पुन्हा एकदा पेट्रोल कारकडे वळला आहे. डिझेलवरील नव्या वाहनाकरिता अजूनही तुमचा आग्रह असेल तर तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीबद्दल आणि भविष्यातील प्रवासाबद्दल विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, हे लक्षात घ्या.

ls.driveit@gmail.com