या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅनोनंतर बाजारात आलेल्या झेस्ट, बोल्ट, टियागो, हेक्झा या अनुक्रमे सेडान, हॅचबॅक आणि एसयूव्ही सेगमेंटमधील टाटाच्या गाडय़ांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टियागोने तर प्रस्थापितांना धडकी भरेल, अशा प्रकारची लोकप्रियता प्राप्त केली. या यशानंतर आता टाटा मोटर्सने टिगोर ही देखणी कॉम्पॅक्ट सेडान बाजारात आणली आहे.

टाटांनी झेस्ट बाजारात आणून सेडान सेगमेंटमध्ये आपला बाजारहिस्सा वाढविण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र झेस्टला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की, झेस्टला फारसा उठाव नव्हता; परंतु या सेगमेंटमधील स्पर्धकांच्या तुलनेत तो कमी भरला. झेस्टचा आकार ग्राहकांना आकर्षक वाटला नाही, असेही एक कारण त्यामागे आहे. असो. त्यामुळे बाजारातील आपला हिस्सा वाढविण्याच्या टाटांच्या प्रयत्नांत खंड पडला नाही. उलटपक्षी गेल्या वर्षी हेक्झा ही एसयूव्ही लाँच करून टाटांनी एक पाऊल पुढेच टाकले. झेस्टची कसर टियागोने भरून काढली आणि आता बाजारात आलेल्या टिगोरची सुरुवातही आश्वासक झाली आहे. टियागोचेच सेडान व्हर्जन म्हणजे टिगोर, असे एका शब्दात वर्णन करता येईल. एवढीच टिगोरची ओळख आहे का? तर नाही. आणखीही बरेच टिगोरमध्ये आहे. कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये डिझायर, अ‍ॅक्सेंट, अ‍ॅमियो आणि अस्पायर यांना टक्कर देऊ शकेल, अशी बरीच वैशिष्टय़े आहेत टिगोरमध्ये. प्रथमत: म्हणजे तिचा लुक. समोरून अगदी टियागो वाटत असली तरी थोडे पुढे आले की टिगोरचे सौंदर्य नजरेत भरते. दमदार पॉवरट्रेन इंजिन, आकर्षक लुक आणि वैविध्यपूर्ण इनबिल्ट फीचर्समुळे टिगोरने प्रस्थापितांसाठी आव्हान उभे केले आहे.

बाह्य़ रूप

टिगोरचे बम्पर दोन रंगांनी तयार करण्यात आले असून त्यावर टाटांचे सिग्नेचर ग्रिल बसविण्यात आले आहे आणि त्यावर टाटांचे आश्वासक बोधचिन्ह विराजमान आहे. क्रिस्टल लाइक स्मोक प्रोजेक्टर हेडलॅम्पमुळे टिगोरचा पुढील भाग अधिक आकर्षक वाटतो. गाडीच्या मागचा भाग तर अधिक लक्षणीय आहे. सी पिलरपासून बूट लिडपर्यंत असलेल्या कव्‍‌र्हमुळे बूट स्पेस मोकळाढाकळा (४१९ लिटर, जो कॉम्पॅक्ट सेडान प्रकारातील सर्वात मोठा बूट स्पेस आहे.) मिळाला आहे. मागील बाजूला प्रोजेक्टर टेललॅम्प्स, त्यावर कॅरेक्टर लाइन्स आणि दोन स्टायलिश हायमाऊंटेड एलईडी स्टॉप लॅम्पमुळे टिगोरची लांबी अधिक खुलून दिसते. डबलस्पोक अलॉय व्हील्सना गनमेटलच पॉलिश असल्याने ते चकाकतात. टिगोरच्या टॉप मॉडेलला १६ इंचांचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तर त्याखालील मॉडेलना १५ इंचांचे अलॉय व्हील्स आहेत. इम्पॅक्ट डिझाईन तत्त्वानुसार विकसित करण्यात आलेले टिगोर हे टाटा मोटर्सचे तिसरे वाहन आहे. खास करून युवा पिढीला आकर्षति करेल असेच टिगोरचे रूप आहे.

अंतरंग

इथेही टिगोरची अंतर्गत रचना टियागोसारखीच जाणवते. टिगोरमध्ये प्रवेश करताक्षणीच आरामदायी प्रवासाची हमी आपल्याला आश्वस्त करते. चालक अधिक चार जण असे एकूण पाच जण बसू शकतील, एवढी आरामदायी अंतर्गत रचना टिगोरमध्ये नक्कीच आहे. चालकाच्या बाजूला बसलेल्याला आरामात पाय ठेवून बसता येईल, असा लेग स्पेस देण्यात आला आहे. मात्र, मागे जर थोडी स्थूल देहाची व्यक्ती बसल्यास त्या प्रवाशाला पाय आखडून बसावे लागेल, असे चित्र आहे. कारण मागच्या बाजूला तेवढा लेग स्पेस जाणवत नाही. कारची अंतर्गत सजावट अत्यंत कल्पकरीत्या करण्यात आली असून डय़ुएल टोन कॉकपिट, बोल्स्टर्ससह आरामदायी सीट्स, प्रीमियम नॉटेड रूफ लायनर तसेच हवा येण्यासाठी प्रशस्त खिडक्या या सुविधा टिगोरमध्ये आहेत. एकंदर २४ ठिकाणी जागेचा योग्य वापर करण्यात आला असल्याने अतिरिक्त सामान घेऊन प्रवासाला निघायचे असेल तरी चिंता करण्याचे कारण नाही. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गाडीतील हर्मन इन्फोटेनमेंट सिस्टम. चार स्पीकर आणि चार ट्विटर यांच्यासह असलेली टचस्क्रीन अशी ही सिस्टम आहे. याद्वारे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधून नेव्हिगेटही करू शकते तसेच ब्लूटूथ, यूएसबी, एफ रेडिओ, ऑक्झिन या नेहमीच्या सुविधाही आहेत. हर्मनची सिस्टम असल्याने साऊंड क्वालिटी उत्तम आहे. मागच्या बाजूकडील दारांना एक लिटर आकाराची बाटली सहज बसू शकेल एवढी स्पेस आतील बाजूने देण्यात आली आहे. मात्र, पुढील दरवाजाला ती सोय नाही. त्या ठिकाणी छोटय़ा आकाराची बाटली बसू शकेल. चालकाला त्याच्या उंचीनुसार स्टीअिरग (इलेक्ट्रिक पॉवर्ड) आणि सीट यांची रचना करता येईल, अशी सोयही टिगोरमध्ये आहे. वातानुकूलन व्यवस्थाही चांगल्या दर्जाची आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचीही पुरेशी काळजी टिगोरमध्ये घेण्यात आली आहे. पुढील बाजूला दोन एअरबॅग्ज देण्यात आल्या असून त्याचबरोबर अ‍ॅब्झॉìबग बॉडी स्ट्रक्चरसह आधुनिक अशी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) प्रणालीही टिगोरमध्ये आहे. कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोलमुळे ब्रेकिंगची कार्यक्षमताही वाढविण्यात आली आहे.

इंजिन

टिगोर रेव्हट्रॉन १.२ लिटर (पेट्रोल) आणि रेव्हटॉर्क १.५ लिटर (डिझेल) अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही इंजिने इको आणि सिटी या मल्ट्रिडाइव्ह मोडमध्ये उपलब्ध आहेत. इको मोड हा सर्वोत्तम इंधन क्षमतेसाठी इंजिनाची कार्यक्षमता वाढवतो, तर सिटी हा डिफॉल्ट मोड आहे.

इतर वैशिष्टय़े

टिगोर विविध अ‍ॅपने सज्ज असून त्यात नेव्हिगेशनसाठी नेव्हीमॅप्स, म्युझिक ऑन द गो, ज्युक कार अ‍ॅप यांसारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. तसेच ब्लूटूथवर आधारित रिमोट म्हणजेच टाटा स्मार्ट रिमोटचाही त्यात समावेश आहे. टाटा इमर्जन्सी अ‍ॅपमुळे वाहन चालवताना चालकाला सुरक्षेसंबंधी सूचना दिल्या जातात. त्याचबरोबर अपघात वगरे झाल्यास सेव्ह असलेल्या इमर्जन्सी काँटॅक्ट पर्सनला अपघाताची माहिती दिली जाते. या सर्व अ‍ॅप्समुळे टिगोर अधिक सुरक्षित वाटते.

चालविण्याचा अनुभव

टाटांच्या गाडय़ा तशा दणकटच. म्हणजे नाजूकपणा नावाला. टिगोरही त्याला अपवाद नाही. भारतीय रस्त्यांची अवस्था टाटा मोटर्स चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे येथील परिस्थितीला अनुकूल अशीच टिगोरची रचना आहे आणि आश्चर्य म्हणजे टिगोरमध्ये बसल्यानंतर रस्त्यातील खड्डय़ांचा किंवा खराब रस्त्यांचा फारसा परिणाम जाणवत नाही. दुसरे वैशिष्टय़ म्हणजे टिगोर अगदी टॉप स्पीडला चालवली तरी ती स्थिर राहते. इंजिनाचा कणभरही आवाज येत नाही. सस्पेन्शन उत्तम आहे. मायलेजच्या बाबतीतही टियागोसारखीच (२३ किमी प्रतिलिटर, असा कंपनीचा दावा) आहे. त्यामुळे एका चांगल्या कॉम्पॅक्ट सेडानच्या शोधात असाल तर टिगोर हा एक चांगला पर्याय तुमच्यासमोर आहे, याचा विसर पडू देऊ नका.

किंमत (एक्स शोरूम)

पेट्रोल व्हेरिएंट्स – टिगोर एक्सई (४ लाख ७० हजार), एक्सटी (५ लाख ४१ हजार), एक्सझेड (५ लाख ९० हजार), एक्सझेड (ओ) (६ लाख १९ हजार)

डिझेल व्हेरिएंट्स – टिगोर एक्सई (५ लाख ६० हजार), एक्सटी (६ लाख ३१ हजार), एक्सझेड (६ लाख ८० हजार), एक्सझेड (ओ) (७ लाख ०९ हजार)

रंग    

कॉपर डॅझल, एस्प्रेसो ब्राऊन, पर्लसेंट व्हाइट, प्लॅटिनम सिल्व्हर, बेरी रेड, स्ट्रायकर ब्लू.

vinay.upasani@expressindia.com

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %ef%bb%bf tata tigor car tata sedan car
First published on: 07-07-2017 at 01:03 IST