संदीप चव्हाण
आपल्याला सर्वप्रकारचा भाजीपाला घरीच घेण्याची इच्छा असेल व बऱ्यापैकी जागा उपलब्ध असेल तर प्लास्टिकच्या ड्रमचा विचार झाडं लावण्यासाठी अवश्य करावा. बाजारात प्लास्टिकचे २०० लिटर आकाराचे लंबगोलाकार ड्रम उपलब्ध आहेत. या ड्रमला वरती दोन छोटी झाकणे असतात. ही बऱ्यापकी दणकट असतात. कडक उन्हातही बरीच वर्षे टिकतात. या ड्रमचे उभे दोन भाग करावेत. त्यापासून दोन कुंड्या तयार होतील.
ड्रमच्या पसरट भागामुळे एकच भाजी मोठ्या प्रमाणात घेता येते किंवा २-३ भाज्या एकत्र पिकवता येतात. या आडव्या कापलेल्या ड्रममध्ये वेलवर्गीय फळभाज्या छान वाढतात. वेलांच्या मुळ्यांना जितका खाली पसरायला वाव असतो. तेवढ्या प्रमाणातच वर पसरतो. याप्रमाणे ड्रमला आडवा काप दिल्यास अडीच फूट खोली असलेले दोन भाग मिळतात. यात आपण कलम वर्गातील फळझाडे लागवड करता येतात. उदा.: अंजीर, शेवगा आदी. कारण अशा झाडांना मुळांना आधार म्हणून खोलगटपणा गरजेचा असतो. यासाठी शक्यतो झाकण असलेले ड्रम वापरू नये. तसेच निळ्या रंगाचे ड्रम असेच कापून ठेवले तरी छान दिसतात. मात्र, काळ्या किंवा इतर रंगांचे ड्रम वेगवेगळ्या रंगांत रंगवता येतात. त्यामुळे त्याचे आयुर्मानही वाढते.
या ड्रमप्रमाणे घरात येणाऱ्या विविध गोण्यांचा वापरही आपणास बाग फुलवण्यासाठी करू शकतो. अगदी ज्यूटच्या धान्याच्या गोण्यापासून ते सिमेंटच्या गोण्यांपर्यंत काहीही चालते. ज्यूटच्या गोण्यांचे आयुर्मान कमी असले तरी यात हवा चांगली खेळती रहाते. रोज पाणी व ऊन लागल्यामुळे या गोण्या लवकर कुजतात. मात्र या कुजलेल्या गोण्यांचे तुकडेही कुंडीच्या पुनर्भरणासाठी वापरता येतात. गांडुळांना खाद्य म्हणून हे खूप आवडते. तसेच या गोण्यात व्हर्मी कम्पोस्टिंग भरून त्यात जागोजागी भोक करून बिया पेरल्या तर चारही बाजूने गोणी हिरव्या रंगाने फुलून येते.
सिमेंटच्या गोण्या मात्र वापरण्यापूर्वी एकदा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावात तसेच या गोण्याच्या आतील प्लास्टिकचे अस्तर काढून टाकावे. गोणी या प्रकारात वायूविजन उत्तम होत असल्यामुळे झाडांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो तसेच उत्तम पाणी निचरा होतो. कम्पोस्टिंग होताना आतमध्ये तयार होणारी उष्णताही बाहेर टाकली जाते. ज्यूटच्या कापडी गोण्यांप्रमाणे प्लास्टिकच्या गोण्याही उन्हात लवकर कुजतात. त्याचा बारीक चुरा होतो. पण या गोण्या थोड्या सावलीच्या आडोशाला ठेवल्यास गोणीचे आयुर्मान वाढते.
-sandeepkchavan79@gmail.com