पुरुषांनी कमविणं आणि स्त्रीने कमविण्याबरोबर घरदेखील संभाळणं, ही मानसिकता स्त्री आरोग्याच्या विविध समस्यांना खतपाणी घालत आहे. जर ही परिस्थिती बदलवायची असेल तर घर म्हणजे फक्त स्त्रीची जबाबदारी नसून, ती घरातील सर्व सदस्यांचीआहे, ही मानसिकता खोलवर रुजणं अपेक्षित आहे.
अलीकडेच एक रील पाहण्यात आलं. ते असं होतं- नुकतेच नवीन लग्न झालेलं जोडपं. सकाळी दोघेही लवकर उठून घरीच एकत्र व्यायाम करतात.एकत्र स्वयंपाक करून एकमेकांचे डबे भरतात. मग एकत्र नाश्ता करून तयार होऊन ऑफिसला जातात. आणि मग टॅगलाइन येते, लग्न म्हणजे ओझं नव्हे तर एकत्र सहजीवन. हे बघायला जितक छान आणि सहज वाटतं, तितकं मात्र प्रत्यक्षात ते कमालीचे तणावपूर्ण आहे, असं म्हटल्यास ते चुकीचं ठरू नये. कारण आजही लग्न झाल्यानंतर महिला कोणत्याही मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असो वा छोट्या-मोठ्या नोकरीत, नोकरी आणि घर-संसाराची जबाबदारी तिच्यावरच येऊन पडते. त्यामुळे सकाळपासून सुरू झालेला दिवस रात्र होता होता कधी संपतो हेच कळत नाही.
सकाळी उठल्यापासून बहुतांश स्त्री वर्ग हा घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे कार्यरत असतो. जेवण-नाश्त्याची जबाबदारी पासून ते मुलं असतील तर त्याचं वेळापत्रक सांभाळत, घरात जेष्ठ नागरिक असतील तर त्यांची जबाबदारी पार पाडून ऑफिसला जात असतात. पुढे ऑफिसची कामे आटपून परत घरच्या आघाडीवर कार्यरत होतात, त्यामुळे तासभर निवांत बसून स्वत:साठी वेळ द्यावा, ही चैन फक्त सुट्टीच्याच दिवशी परवडणारी असते. त्यासाठी देखील आधी काही कामाचे नियोजन करावं लागतं.
पुरुषांच्या बाबतीत मात्र तसं नसतं. मुलांचा अभ्यास किंवा त्यांना शाळा-क्लासमधून ने-आण करण्याची जबाबदारी बहुतेक वेळेला स्त्रियांवर येऊन पडते. या शिवाय घरातील अनेक छोटी छोटी कामं जसं वाळलेल्या कपड्यांची घडी करणं, भांडी जागेवर लावणं, भाजी निवडणं- चिरणं अशा अनेक कामात पुरुषांचा सहभाग बहुतांश घरात नसतोच. सतत कराव्या लागणाऱ्या या लहान-सहान कामामुळे महिलांची चिडचीड होऊन त्याचा ताण तब्येतीवर पडू लागतो. यासंदर्भात अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे, त्यानुसार लग्नानंतर पुरुष वर्गाचा दिवसभरातून एक ते दोन तास इतकाच वेळ घरकामात जातो तर स्त्रियांचा सहा ते सात तास इतका वेळ घरकामात जातो.
लग्नानंतर घरची जबाबदारी, घरातील जेष्ठ नागरिकांची जबाबदारी ही त्या महिलेवरच येऊन पडते. त्यामुळेच लग्नाआधीचं आणि लग्नानंतरचं महिलांचं आयुष्य यात जमीन-आसमानाचा फरक पडलेला दिसून येतो. या येत असलेल्या ताणामुळेच अलीकडे बऱ्याच तरुणी या लग्न करण्यासाठी फारशा उत्सुक नसतात.याबाबत आपलं मत व्यक्त करताना आयटी क्षेत्रातली नम्रता म्हणते की, अलीकडे ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा असल्यामुळे प्रवासाचा येण्या-जाण्याचा वेळ वाचतो खरा, पण मग कामाची अपेक्षा जास्त ठेवली जाते. घरीच आहात तर काम करण्यात काय त्रास आहे? असे खोचक प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. तर घरात असूनसुध्दा सारखी सारखी काय काम घेऊन बसतेस, अशी तक्रार मुले करतात. कामाचा ताणही सहन करा आणि घरच्यांची बोलणी देखील खा. घरून काम करणाऱ्या बहुतांश महिला वर्गाची स्थिती अशीच काहीशी असते. त्या मानानं पुरुषांना इतका ताण घ्यावा लागत नाही. कारण पुरुष वर्ग घरून काम करायला बसला तर त्याचा पूर्ण फोकस हा त्याच्या कामांवरच असतो. घरातील इतर कामं बायको किंवा घरातील मंडळी बघून घेतील. परिणामी ते कामांत असताना इतर कामाचे काय होणार, याचा फारसा ताण नसल्यामुळे ते अधिक वेळ आपले काम सहजपणे करू शकतात.
ही परिस्थिती जर बदलवायची असेल, तर मुळात स्त्रियांच्या मानसिकतेत बदल करणं गरजेचे आहे. लहानपणापासून एक मुलगा व एक मुलगी असेल तर घरातला केर काढणं, स्वयंपाकातील लहान-सहान मदत ही कामं मुलीलाच करायला सांगितली जातात. जर घरात दोनही मुलगे असतील तर अशा घरातली महिलाच वरील कामे स्वत:हूनच करते. कारण मुलांना असली कामं सांगावयाची नसतात, ही एक मानसिकता त्यामागे असते.
पण मग आता बदलत्या काळानुसार मुलांवरदेखील घरातील सर्व छोट्या कामाची जबाबदारी टाकली तर हे काम स्त्रियांचे ,हे काम पुरुषांचे अशी विभागणी होणार नाही. घर हे सर्वांचे असून, यातील कामाची जबाबदारीही सर्वांची आहे, हा दृष्टीकोन लहानपणापासूनच विकसित होईल. वडिलांइतकेच आईचे कामही तितकेच महत्त्वाचे असते, ही मानसिकता तयार होईल. लहानपणापासून हा संस्कार घराघरांत रुजविणे आवश्यक आहे. ‘आमच्याकडे बाबा कुणीही पुरुष हात लावणार नाही असल्या कामांना’ अशी भूमिका स्त्रियांनी ही आता घेणं बंद केलं पाहिजे. स्वत:चे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवायचे असेल तर महिलांनाच कामाच्या समान वाटणीचे रोप रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल, इतकं मात्र निश्चित. suchup@gmail.com