भारतातील तृतीयपंथी समुदायाचे लोक अजूनही त्यांच्या स्वीकृती आणि हक्कांसाठी लढत आहेत. पण, अनेक तृतीयपंथी त्यांच्या संघर्षाच्या जोरावर सर्व अडचणींमधून मार्ग काढत आहेत. जिद्दीच्या जोरावर यशोमार्गावर वाटचाल करणाऱ्या अशा तृतीयपंथी व्यक्तींपैकीच एक आहे ओडिशाची ऋतुपर्णा प्रधान. तिनं पहिली तृतीयपंथी सिव्हिल सर्व्हंट बनून आपली योग्यता सिद्ध केली आहे.

ऋतुपर्णा प्रधान हिचा जन्म ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील कटीबगेरी गावात झाला. सहाव्या वर्गात असताना तिला ती पहिल्यांदा तृतीयपंथी असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला कोणालाही गोंधळून जायला होईल तसं ऐश्वर्याचंही झालं. पण, हळूहळू तिनं हे सत्य मनापासून स्वीकारलं आणि ती स्त्रीसारखं वागू लागली. मात्र, यासोबतच तिच्या अडचणीही वाढू लागल्या.

तिच्या वेगळ्या लैंगिक वागणुकीमुळे तिला वर्गशिक्षकांकडून अपमान सहन करावा लागला. वर्गमित्रांकडूनही अत्याचार सहन करावे लागले. महाविद्यालयाच्या वसतिगृहात ती लैंगिक शोषणाला बळी पडली. तथापि, तिनं तिचं शालेय शिक्षण कसंतरी सांभाळलं. त्यानंतर तिनं इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिनं लोकप्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. एकंदर परिस्थिती पाहता, महाविद्यालयामध्ये ऐश्वर्याचं लैंगिक शोषण होऊनही ती डगमगली नाही; उलट तिनं जिद्दीनं शिक्षण पूर्ण केलं.

(हे ही वाचा : महिला सजग! आरोग्य विमा काढणाऱ्या महिलांचे वाढले प्रमाण, गतवर्षीच्या तुलनेत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ )

ऐश्वर्या ऋतुपर्णा प्रधान २०१० मध्ये ओडिशाच्या राज्य लोकसेवा आयोगाच्या PCS परीक्षेत पुरुष उमेदवार म्हणून बसली होती. ती पात्र ठरली; पण तिच्या वाटेतले अडचणीरूपी काटे अजूनही संपले नव्हते. प्रशासनातील लोकांनीही तिच्या क्षमतेवर शंका घेऊन, ती या पदासाठी पात्र नसल्याची जाणीव करून तिचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीना ‘थर्ड जेंडर’ म्हणून मान्यता दिल्यानंतर तिला काहीसा दिलासा मिळाला होता.

सर्वोच्च न्यायालयानं ‘थर्ड जेंडर’ म्हणून मान्यता दिल्यानंतर ऐश्वर्यानं लगेचच पुल्लिंगाचे स्त्रीलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मग ऋतुपर्णानं लिंगबदलाची ही प्रक्रिया पूर्ण केली आणि ऐश्वर्या ऋतुपर्णा प्रधान, असं नवीन नाव धारण केलं. अशा प्रकारे ऐश्वर्यानं केवळ सामाजिक लढाच दिला नाही, तर तिनं भारताची पहिली तृतीयपंथी सिव्हिल सर्व्हंट बनून इतिहासही रचला.