प्रियदर्शिनी मुळ्ये

असं म्हणतात, की ‘सिंगल मदर’ अर्थात एकल माता ही सर्वांत कणखर स्त्रियांपैकी एक असते! भावनिक पातळीवर कणखर राहण्याबरोबरच तिला आर्थिक बाबतींत सक्षम आणि स्वयंपूर्ण असणं गरजेचं असतं. त्यामुळे सिंगल मदर्सनी आपल्या आणि आपल्या अपत्याच्या चांगल्या भविष्याच्या दृष्टीनं आर्थिक नियोजनाचा वेगळा विचार नक्कीच करायला हवा. तुम्हाला अर्थविषयक शिक्षणाची पार्श्वभूमी असो वा नसो, ‘मला त्यातलं काही कळत नाही’ असं न म्हणता एकेक गोष्ट शांतपणे समजून घेतलीत, तर आर्थिक बाबी तुम्हाला निश्चित उत्तम समजतील. चला, मग आज अशाच काही गोष्टी पाहू या.

सिंगल मदर्स आपलं आर्थिक नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी, पुढील गोष्टी अमलात आणू शकतील

१. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा : खरंतर सगळ्याच सिंगल मदर्सना आर्थिक अडचणी असतीलच असं नाही. परंतु तरीही, तुम्ही प्रत्येकीनं स्व-कमाई सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची गरज आहे. तुमचे छंद, कौशल्य आणि शिक्षण तुम्हाला कमाईच्या योग्य संधी प्राप्त करून देऊ शकतात. यात आणखी एक चांगली गोष्ट होते- कामाच्या निमित्तानं तुम्ही नवनवीन लोकांमध्ये मिसळता, तुमच्या ओळखी होतात, अनेक गोष्टी शिकता येतात आणि त्याने आत्मविश्वास वाढतो.

२. व्यवहारकुशल बना : आर्थिक व्यवहारांची माहिती, बँकेचे व्यवहार, मालमत्तेसंबंधी कागदपत्रं, कर्जाचे तपशील आणि व्यवहार, इत्यादींबद्दल योग्य माहिती घेऊन ती स्वतः हाताळा. यामुळे तुमची आर्थिक बाबतीत फसवणूक होणार नाही.

३. ध्येय निश्चित करा : आयुष्यात तुम्हाला भविष्याचा विचार करणं खास गरजेचं आहे. तुमची स्वप्नं आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ उभं करून ते पूर्ण करण्यासाठी ध्येयनिश्चिती महत्त्वाची आहे. यात तुमच्या मुलांसंबंधी उच्च शिक्षण, तुमच्यासाठी एखादी छानशी फॉरेन ट्रिप, इत्यादी काहीही ध्येय असू शकतात. कमी, मध्यम आणि लांब पल्ल्याची ध्येय तुम्ही निश्चित करा.

४. आपत्कालीन निधी तयार करा : आर्थिक नियोजनातला महत्त्वाचा भाग म्हणजे आपत्कालीन निधी. आयुष्यातील कोणताही आकस्मिक प्रसंगात आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी हा महत्त्वाचा आहे. यासाठी तुम्ही तुमच्या ठोस स्वरूपातल्या मासिक खर्चांची बेरीज करा. यात तुमचं वीज बिल, गॅस बिल, इतर बिलं, इ., मुलांचे खर्च, वैद्यकीय खर्च, किराणा सामान, कर्जाचे हफ्ते वगैरे येतात. त्यावरून आपत्कालीन निधी किती हवा, ते तुम्हाला समजेल. तुमचा आपत्कालीन निधी हा किमान १२ महिने पुरेल इतका असला पाहिजे. हा निधी तुम्ही flexi FD, savings a/c, liquid debt मुच्युअल फंड, इत्यादींमध्ये गुंतवू शकता. तुमचं आर्थिक ‘प्रोफाइल’, तुम्हाला गुंतवणुकीतून काय साधायचं आहे आणि त्यानुसार तुमच्यासाठी गुंतवणुकीचं कोणतं साधन चांगलं, यात स्पष्टता यावी, यासाठी तुमच्या जवळच्या विश्वासू सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.

५. नियमित गुंतवणूक करा : ध्येय प्राप्ती, खर्चाचा योग्य ताळमेळ, आर्थिक व्यवहारातील शिस्त साधण्यासाठी नियमित गुंतवणूक महत्त्वाची आहे. आज इक्विटी, बाँड, एफडी, म्युच्युअल फंड, इत्यादी अनेक प्रकारचे गुंतवणूक प्रकार उपलब्ध आहेत. त्यांची योग्य माहिती घेऊन, तुमची जोखीम क्षमता, ध्येय आणि गुंतवणूक कालावधीनुसार तुम्ही त्यात नियमित गुंतवणूक करा.

६.आयुर्विमा आणि आरोग्य विमा घ्या : आयुर्विमा हा अत्यंत महत्त्वाचा विमा आहे. प्रत्येक सिंगल मदरनं तर तो अवश्य घ्यावा, ज्यामुळे तुमच्यानंतर तुमच्यावर आर्थिकदृष्टया अवलंबून असणारे कुटुंबीय कायम आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहतील. खरंतर तो किती रकमेचा घ्यावा, हे निश्चित करण्यासाठी काही गणिती पद्धती आहेत. परंतु thumb rule प्रमाणे तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० ते १५ पट इतक्या रकमेचा आयुर्विमा घेऊ शकता.

याबरोबरच आरोग्य विमा महत्त्वाचा आहे. वैद्यकीय खर्च, औषधोचारासाठी खर्च, इस्पितळात होणारे खर्च, इत्यादींसाठी आर्थिक हातभार म्हणून आरोग्य विमा महत्त्वाचा. यात तुम्ही तुमच्या स्वतःबरोबरच तुमच्या मुलांचा विमा ‘फॅमिली फ्लोटर पॉलिसी’ म्हणून घेऊ शकता.

आर्थिक नियोजनाची योग्य जोड असेल तर बरीचशी आर्थिक आव्हानं तुम्ही आत्मविश्वासानं पेलू शकाल.

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

priya199@gmail.com