वैशाली मोरे

“ज्या महिलेचा विवाह झालेला असतो ती महिला दोन प्रकारे ओळखली जाते. एक म्हणजे तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं आणि दुसरं म्हणजे भांगेत सिंदूर भरलेला असतो. जर एखादीच्या गळ्यात मंगळसूत्र नसेल आणि कपाळाला सिंदूर नसेल तर आम्ही समजून घेतो, की हा प्लॉट रिकामा आहे. जर गळ्यात मंगळसूत्र असेल किंवा कपाळाला सिंदूर असेल, तर दुरूनच आम्हाला समजतं, की रजिस्ट्री झालेली आहे.” बागेश्वर धामच्या स्वतःला ‘पंडित’ म्हणवून घेणाऱ्या धीरेंद्र शास्त्री नावाच्या व्यक्तीची ही मुक्ताफळं आहेत. हो, मुक्ताफळंच!

धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यामध्ये अनेक दोष आहेत. महिलेला मालमत्ता समजणं, तिच्यावरील कोणाची तरी मालकी सिद्ध करणं, तिने कसं राहावं हे ठरवण्याचा अधिकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करणं, हे गंभीर दोष आहेत. स्त्री विवाहित नसली तरी तिच्यावर फक्त तिचा स्वतःचाच अधिकार असतो, अन्य कोणाचाही नाही, हे धीरेंद्र शास्त्री आणि त्यांच्या बेलगाम भाषणावर टाळ्या पिटणाऱ्यांना माहित असायलाच हवं.

विवाहित स्त्रीने कुंकू लावावं की नाही, गळ्यात मंगळसूत्र घालावं की नाही, लग्नानंतर नाव बदलावं की नाही, हे सर्व अधिकार तिचे स्वतःचे आहेत आणि असायला हवेत. कुंकू लावणं किंवा मंगळसूत्र घालणं, यासंबंधीचा निर्णय अनेकदा पोशाखानुसार घेतला जातो. प्रसंगानुरुप पारंपरिक प्रकारची साडी आणि दागिने असतील तर कुंकू, गजरा, विवाहित असल्यास मंगळसूत्र यांचा आवर्जून वापार केला जातो. आधुनिक पेहराव असेल, तर आधुनिक दागिन्यांना प्राधान्य दिलं जातं, त्यामध्ये कुंकू किंवा मंगळसूत्राला स्थान असेलच असं नाही. ही खूप सामान्य बाब आहे. या बाबतीत बऱ्याच स्त्रिया आणि त्यांचे जोडीदारही सुटसुटीत विचार करतात आणि त्याप्रमाणे स्वतःची जीवनशैली ठरवतात. त्यांच्या खासगी अवकाशात घुसून त्यावर शेरेबाजी करण्याचा, हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाही नाही.

एखादी स्त्री कुंकू लावत नसेल, मंगळसूत्र घालत नसेल तर ‘प्लॉट रिकामा आहे’- म्हणजेच अशी स्त्री ‘अव्हेलेबल’ आहे, असं बिनदिक्कतपणे म्हणणं हे समस्त स्त्रियांसाठी अपमानास्पदच आहे. जवळपास दोन शतकांची चळवळ, प्रबोधनानंतरही ‘स्त्री ही कोणाचीही खासगी मालमत्ता नाही’ असं सांगावं लागत असेल, तर ते आपल्या समाजाचं अपयशच आहे. या प्रकारची विधानं करणाऱ्यांना कोणत्याही भल्याबुऱ्या विचारांची चाड नाही हेच त्यातून दिसतं. जाहीरपणे अशी वक्तव्यं करणाऱ्या लोकांचा धिक्कार करण्याऐवजी उपस्थित श्रोते त्यावर टाळ्या वाजवत असतील, तर त्यातून समाजाचं मागासलेपण अधोरेखित होतं.

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ या प्रकारात मोडतील अशी वक्तव्यं करणारे लोकही स्वतःच्या नावामागे ‘पंडित’, ‘महाराज’, ‘गुरू’ यांसारख्या उपाध्या लावून घेतात. असं करताना ते त्या उपाध्यांचं अवमूल्यन करतातच, शिवाय लोकांनाही फसवतात. पंडित या शब्दाचा अर्थ आहे विद्वान. पंडा म्हणजे बुद्धी आणि जो पंडेनं युक्त आहे तो पंडित. धीरेंद्र शास्त्रींच्या आतापर्यंतच्या कोणत्या व्याख्यानातून अथवा कृतीमधून त्या व्यक्तीच्या विद्वत्तेचं दर्शन घडलं आहे, असा प्रश्न विचारला तर उत्तर ‘एकही नाही’ असेच मिळेल. धीरेंद्र शास्त्रीच नव्हे, तर अनेकजण स्वतःच्या नावामागे अशा पंडित, आचार्य इत्यादी पदव्या लावतात. या लोकांना पंडित का म्हणायचं असा प्रश्न पडू शकतो. धीरेंद्र शास्त्री या व्यक्तीची ओळख सांगायची, तर ‘मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम सरकार इथले पीठाधीश’ अशी सांगावी लागेल. वयाच्या २७ व्या वर्षी पीठाधीश असलेली व्यक्ती आपल्या कामात यशस्वी झाली आहे, असं कदाचित म्हणता येईल, पण त्याला विद्वान आणि मुख्य म्हणजे ‘सुसंस्कृत’ कसं म्हणावं, हा प्रश्न उरतोच. समाज म्हणून अशा वाचाळांच्या सभांना जाणं, त्यांना आणखी लोकप्रियता मिळवून देणं आपण कधी थांबवणार?…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

lokwomen.online@gmail.com