डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“तुमचं काय, बरंय बुवा, एकटा जीव सदाशिव. घरी पोहोचायला उशीर झाला तरी घरी कुणीही कटकट करायला नाही, आता आम्ही घरी गेल्याबरोबर प्रश्नांची सरबत्ती चालू होणार.” ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या बैठकीतून बाहेर पडताना रानडेकाका असं म्हणाले तेव्हा रघुनाथरावांनी हसून वेळ मारून नेली खरी; पण त्यांना फारच वाईट वाटलं होतं. रजनीताईंच्या जाण्यानंतर ते एकटेच राहात होते. एकटं राहणं म्हणजे, स्वतःला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. कशावरही बंधन नाही, सारखं कुणाचं तरी मागं टुमणं नाही, असं इतरांना वाटतं असलं तरी एकटं राहाणं म्हणजे काय? याचा अनुभव रघुनाथराव घेत होते. त्यांना वाटायचं, यांना नुसतं बोलायला काय जातंय? पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. माझं दुःख कुणीच समजून घेऊ शकणार नाही. रजनीताई आणि रघुनाथराव यांना सर्व जण जोडगोळी म्हणायचे, कारण एकमेकांशिवाय दोघांचंही पान हलायचं नाही. कोणत्याही कार्यात, प्रसंगात दोघंही एकत्रच असायचे, एकमेकांना सोडून ते कधीही राहायचे नाहीत. रागिणीचे लग्न झाल्यानंतर आणि रघुनाथराव निवृत्त झाल्यानंतर सकाळचा व्यायाम, हास्य क्लब या ठिकाणीसुद्धा दोघंही एकत्रच असायचे. त्या दिवशीही हास्य क्लबची पिकनिक होती. सर्वांसोबत रजनीताई आणि रघुनाथराव यांनी खूपच मजा केली. ‘मी पुन्हा एकदा बालपण अनुभवलं,’ असं रजनीताई म्हणत होत्या. त्या दिवशी त्या अतिशय आनंदात होत्या आणि घरी आल्यानंतर रात्री ११ वाजता अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. रघुनाथरावांनी शेजारच्या मंदारच्या मदतीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं; परंतु त्यांना सिव्हीअर हार्ट अटॅक आल्यामुळं दवाखान्यात पोहोचेपर्यंतच सर्व काही संपलं होतं.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

आयुष्याचा साथीदार अचानक सोडून गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. ‘‘बाबा, आता तुम्ही अजिबात एकटं राहायचं नाही, माझ्यासोबत नाशिकला राहा. आपण येथील घर भाड्यानं देऊ,’’ असं रागिणी म्हणत होती. काही दिवस हट्टाने ती तिच्या घरी त्यांना घेऊन गेली; पण रघुनाथरावांचं मन तिथं रमेना. मग त्यांनी एकटं राहण्याचा निर्णय घेतला. रघुनाथराव एकटे राहात असले तरी ते स्वतःला सतत अपूर्ण समजत होते. रजनीताईंच्या आठवणी मनातून अजिबात जात नव्हत्या. त्यांना सतत त्यांचे भास होत राहायचे. आजही ते अशाच आठवणी काढत घराकडे चालले होते, तेवढ्यात शेजारच्या शांताकाकू त्यांना भेटल्या आणि म्हणाल्या, “रघुनाथराव, आज आमच्या घरी जेवायला या.”

हेही वाचा… लिसा स्थळेकर : भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा श्रीवत्स ते सिडनीचा प्रवास

“काकू, आज नको. मी पुन्हा कधी तरी येईन, आज माझं पोट बिघडलं आहे. मी जेवणार नाहीये,” असं शांताकाकूंना सांगून त्यांनी जाण्याचं टाळलं. हल्ली ते कुणाच्याही घरी जातच नव्हते. मागे सोसायटीमधले अरविंदकाका यांच्याकडं दसऱ्याला जेवायला बोलावलं म्हणून ते गेले तेव्हा तिथं बायकांची कुजबुज त्यांच्या कानावर पडली होती. ‘‘बिचारे रघुनाथराव एकटे पडले आहेत. रजनीताई गेल्यापासून त्यांनी मेसचा डबा लावला आहे. घरचं जेवण त्यांना मिळत नाही म्हणून आज त्यांना जेवायला बोलावलं.’’ ‘‘नवरा लवकर गेला तर बाई घरात रमू शकते; पण बायको आधी गेली तर पुरुषाला एकटेपण अनेकदा असाहाय्य होतं.’’

‘‘खरं तर आता त्यांनी दुसरं लग्न करायला हवं. उतारवयात कुणाची तरी सोबत आवश्यक असते.’’

अजून बरंच काही त्यांच्या कानावर येत होतं. सर्व जण त्यांना ‘बिच्चारे’ समजत होते आणि हे त्यांना अजिबात नको होतं, म्हणून कुणाच्यात मिसळायलाच नको असं त्यांना वाटायचं. ते एकटेच घरात बसलेले असताना त्यांचा जुना मित्र अजित त्यांना अचानक भेटायला आला. ‘‘रघुनाथ, आज तुझी खूप आठवण आली म्हणून भेटायला आलोय.’’

हेही वाचा… Miss universe 2023 : मिस युनिव्हर्स २०२३ किताब पटकावणारी शेनिस पॅलासिओस नक्की आहे तरी कोण?

रजनीताई गेल्यापासून घरात पाहुणेरावळे, मित्रमंडळी असं कुणीही यायचं नाही. घरात गृहलक्ष्मीचा वावर किती महत्त्वाचा असतो, हे त्यांना आता चांगलंच समजलं होतं. अजितला बघून त्यांना आश्चर्य वाटलं आणि खरं तर आनंदही झाला. अजित कॉलेजमध्ये अगदी हरहुन्नरी होता. ग्रुपमध्ये तो असला की चैतन्य असायचं, सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि सर्वांना आवडणारा असाच तो होता. “अरे, आज तुझ्या त्या मेसच्या डब्याला सुट्टी देऊन टाक. आज आपण जुन्या आठवणी काढत मस्त पार्टी करू या. मी आपल्या आवडत्या डिशची ऑनलाइन ऑर्डर करतो.”

रघुनाथराव आणि अजित यांच्या गप्पा खूपच रंगल्या. अजितची पत्नीही पाच वर्षांपूर्वी एका अपघातात गेली होती. मुलगा परदेशात होता, त्यामुळं अजितही एकटाच राहात होता. “रघुनाथ, अरे रजनी वहिनी गेल्या, त्याचं दुःख किती दिवस उराशी बाळगणाऱ आहेस? यातून बाहेर पड. अपर्णा गेल्यावर मीही काही दिवस माझ्या कोषात होतो; पण मग विचार केला, कुणी तरी अगोदर जाणारच. त्याचं दुःख किती दिवस करत बसायचं? जगावं लागतं म्हणून जगण्यापेक्षा आपल्या साथीदाराची उरलेली स्वप्नं पूर्ण करू. चांगल्या आठवणी आपल्या सोबत आहेतच, मग त्याच त्याच गोष्टी कशाला उगाळत बसायचं? आपल्याला वाटतं असतं, की लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात, सहानुभूतीने बघतात; पण आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपणच बदलायचा. प्रत्येकाला आपआपले व्याप असतात. त्यांना आपल्याकडं लक्ष द्यायला वेळही नसतो, त्यामुळं त्यांचं कोणतंही बोलणं मनावर घ्यायचं नाही. आपले मार्ग आपणच शोधायचे. जर कुणी तरी नवीन जोडीदार सोबतीला असावा असं वाटलं तर, पहिल्या जोडीदाराशी त्याची तुलना न करता नवीन जोडीदाराचा सोबती म्हणून स्वीकार करावा आणि त्या वेळी मुलं काय म्हणतील? लोक काय म्हणतील? याचा विचार न करता स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला काय पटतं, याचा विचार करून स्वतःचा निर्णय घ्यावा. एकट्यानेच आयुष्य जगायचं असं ठरवलं तरी, आपली दिनचर्या आपण ठरवून घ्यावी, स्वतःचे छंद जोपासावेत. नातेवाईकांकडे, मित्रमंडळींकडे बोलावलं तर, आपला जोडीदार सोबत नाही, आपल्याशी लोक पूर्वीप्रमाणे वागणार नाहीत, असा कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता नाती जपावीत. म्हणूनच तू न बोलावताही मी आज तुझ्याकडे आलो की नाही? ” रघुनाथराव अजितचं सगळं बोलणं ऐकत होते. तो मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलत होता. तोही एकटाच आहे; पण त्यानं स्वतःचा मार्ग स्वतः स्वीकारला आहे, दुःखाची सतत उजळणी न करता आता आपणही यातून बाहेर पडायचं आणि उरलेलं आयुष्य समाधानानं जगायचं असं त्यांनी ठरवून टाकलं. अजितच्या रूपाने त्यांना आज दिशादर्शक मिळाला होता. त्यांनी मनातल्या मनात त्याचे मनापासून आभार मानले.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

smitajoshi606@gmail.com