हा ‘बेस्ट’चा जमाना आहे. आपल्याला सगळंच बेस्ट हवं असतं. बेस्ट शिक्षण, बेस्ट नोकरी, बेस्ट ठिकाणी घर, बेस्ट स्मार्टफोन… सगळंच सर्वोत्तम! खरेदी करण्याच्या बाबतीतही आपण तसाच विचार करतो. मग ते कपडे असोत, वा खाद्यपदार्थ; आपल्याकडून आधी ब्रँड बघितला जातो आणि मगच आपण ते विकत घेतो. रस्त्यावरच्या किंवा हातगाडीवरच्या वस्तू विकत घेण्याआधी आपण दोनदा विचार करतो. मी काही कोणाला दोष देत नाही, कारण माझ्याकडूनही असंच व्हायचं. पण एक दिवस असं काही घडलं ज्याने मला वेगळा दृष्टिकोन दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहायला गेलं तर माझी त्या दिवशीची सकाळ थोडी वेगळी होती. मी माझ्या ऑफिसला जायच्या घाईत पटापट सकाळी आवरत होते. काम करत असताना अचानक एक आवाज कानावर पडला, “भाजीsssss”. तसं यात काही मुद्दाम त्याकडे लक्ष जाण्यासारखं नाही पण आज गेलं आणि मी हातातली कामं बाजूला ठेवून लगेच दारात येऊन पाहिलं. कारण तो आवाज एका कोवळ्या वयातल्या लहान मुलीचा होता. आपल्या बाबांबरोबर त्यांना हातभार लागावा म्हणून भाजी विकायला भर उन्हात दारोदार फिरत होती. अगदी चौथी-पाचवीत असेल! त्यांच्या टोपलीतली भाजी चांगली आणि कोवळी दिसली म्हणून त्यांना माझ्या बाबांनी थांबवलं. भाजी घेताना बाबांचं त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते म्हणले, “पहाटे ४:३० ला आलोय इथे. उशीर झाला तर पोलिस अडवतात; मग जे मिळायचेत तेवढेही पैसे मिळत नाहीत.” मी त्यांच्या त्या टोपलीत नजर टाकली. फार नाही पण ५००-६०० रुपयांची भाजी होती त्यात! पटकन मनात विचार आला, किती कठीण काम असतं पैसे कमावणं! काय काय करावं लागतं त्यासाठी! आमच्या घरी भाजी दिल्यानंतर ते त्यांच्या वाटेने निघून गेले.

आणखी वाचा : थंडीमध्ये केसांची घ्या, अशी काळजी…

त्यादिवशी माझी कामं नेहमीसारखी सुरू राहिली तरी डोक्यात कुठेतरी हाच विचार घोळत होता. संध्याकाळी येताना ट्रेनला प्रचंड गर्दी. बायकांना उभं राहायलाही ट्रेनमध्ये जागा नाही आणि अशातच डब्यात एके ठिकाणी भांडणं सुरू झाली. भांडणाचं निमित्त ठरलं ट्रेनमध्ये संत्री विकायला आलेल्या काकू. सगळं शांत होतं पण त्या काकू आल्यानंतर मात्र उभ्या असलेल्या बायका नाकं मुरडायला लागल्या. “कुठे यांना गर्दीच्या वेळेला यायचं असतं इथे तडमडायला!”, “इथे आम्हाला उभं राहायला जागा नाही, तुम्हाला जायला कुठून जागा देऊ?”, “रोजचंच आहे हिचं. गर्दीच्या वेळी मोठी टोपली घेऊन यायचं आणि सगळ्यांची अडवणूक करायची,” असं काही बायका बोलू लागल्या. शब्दाला शब्द वाढला आणि त्यांच्यात वादावादी सुरु झाली. त्या संत्री विकणाऱ्या काकू काही फार बोलत नव्हत्या, पण त्या बायका मात्र त्यांना टोमणे मारून डिवचत होत्या.

माझ्या आजूबाजूला बसलेल्या बऱ्याचशा बायका समजूतदार होत्या, तर एक-दोन भोचकही होत्या. आपला काहीही संबंध नसताना फक्त स्वतःचं मनोरंजन व्हावं म्हणून त्या संत्री विकणाऱ्या काकू आमच्याकडे आल्यावर त्या बायकांनी विचारलं, “काय हो, काय झालं तिकडे?” त्यावर त्या संत्रीवाल्या काकूंनी त्यांची बाजू आमच्याकडे येऊन मांडली. “पहाटे चार वाजता रोज दादरच्या फळ मार्केटला जाण्यासाठी आम्ही ट्रेन पकडतो. तिथे कधी धंदा होतो तर कधी होत नाही. तसं आम्ही नेहमी माल डब्यातच चढतो. पण जर कधी खूपच फळं उरली असतील तर येतो इथे विकायला. पण यांना आमची गर्दी वाटते. तुम्ही जसं रोज ऑफिसमध्ये बसून तुमची कामं करता, त्यातून पैसे कमावता तसंच आम्ही पैसे कमावण्यासाठी करत असलेला हा व्यवसाय आहे. आम्हालाही आमची पोटं भरायचीच आहेत की! मग त्यासाठी आम्ही ट्रेनमध्ये येऊन फळ विकली तर यात आमचं काय चुकलं?” हे बोलत असताना त्यांचे डोळे थोडे पाणावले. दोन वेळच्या जेवणासाठी करावे लागणारे काबाडकष्ट हे त्यांच्या शब्दांतून जाणवत होते. पुन्हा माझ्या डोक्यात तोच विचार घोळू लागला, “किती कठीण काम असतं पैसे कमावणं! काय काय करावं लागतंय त्यासाठी!”

हेही वाचा : लग्नासाठी मुलगा हवायं की एटीएम?

बायका फार पटकन समोरच्या व्यक्तीला जज करून एखादा निष्कर्ष काढतात. बऱ्याचदा त्या समोरच्या व्यक्तीचं म्हणणं, त्याची बाजू समजूनही घेत नाहीत. प्रत्येकाचं आयुष्य जसं वेगळं तसंच प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अडचणी वेगळ्या आणि अशा प्रसंगांमध्ये आपणच एकमेकींना मदत नाही केली तर कोण करणार? सगळ्यांनाच आयुष्यात बेस्ट हवं असतं पण प्रत्येकाची ‘बेस्ट’ची व्याख्या वेगवेगळी असते. जसं कोणासाठी एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणं म्हणजे बेस्ट असेल तर, त्या संत्री विकणाऱ्या काकूंसाठी किंवा सकाळी दारावर भाजी विकायला आलेल्या त्या काकांसाठी स्वतःच्याच गावात फळांचं मोठं दुकान टाकणं ‘बेस्ट’ असू शकतं. काय हरकत आहे जर आपण अशा प्रत्येकालाच सारखाच आदर दिला तर! कारण बेस्ट मिळवण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defination of best is not same for everyone rnv
First published on: 23-12-2022 at 14:06 IST