आहना आणि अन्वेशच्या लग्नाला आता चार वर्ष होत आली होती. अजूनही दोघांचे तिघे झाले नसल्याने दोन्ही बाजूंनी म्हणजे आई, आजी, सासूबाई, मावस सासूबाई यांच्याकडून ‘आता मूल होऊ द्या बाई’असा तगादा सुरू झाला होता. कुठेही कुणी नातेवाईक भेटले, की ‘गोष्टी वेळेतच व्हाव्यात , मग फार उशीर होतो. आता झाली की चार वर्षं!’ असलं काहीतरी ऐकावंच लागे. दुसरा कुठला विषय निघतच नसे. हल्ली तिला याचा कंटाळा आला होता.

ती लोकांना भेटायचं टाळू लागली. एकदा सासूबाई मुद्दाम मुक्कामी आल्या. आहाना आणि स्वतःच्या मुलाला समोर बसवून त्यांनी सरळ सरळ विषयाला हात घातला. “मला सांगा नेमकी समस्या काय आहे? आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊयात का? आहना म्हणाली, “आई, मीही स्पष्टच बोलते. तुम्हा सगळ्यांना नातवंड हवंय. याला सुद्धा वडील व्हायची इच्छा आहे, पण त्यासाठी मी का सगळं सोसायचं? हे मूल फक्त माझ्याच पोटात का वाढवायचं? माझी याला तयारी नाही.” सासूबाईंना या प्रश्नाचं हसूच आलं. “अगं हा काय प्रश्न झाला? निसर्गानेच केलेली रचना आहे ना ती! त्याला आपण चॅलेंज नाही देऊ शकत. तुला आई व्हायचं असेल तर यातून जावं लागेल. अगदी सरळ सोपं आहे ते. आणि मातृत्व काय असं अलगद विना कष्टाचं मिळतं का? नऊ महिने मूल पोटात वाढवल्यावर आई आणि मुलाचं एक अतूट नातं तयार होतं.”

“मला मूल नको असं नाही, पण त्यासाठी इतका शारीरिक त्रास सहन करण्याची माझी तयारी नाही. मला आई व्हायचं तर यालाही वडील व्हायचं आहे ना? पण याला त्याचा फार त्रास नाही होणार. सगळ्यांना मूल हवं आहे, पण त्यासाठी मी त्याग का करायचा? याचं करिअर जसं चालू आहे तसं सुरळीत चालेल, पण माझं काय? करिअरमध्ये मी सध्या अगदी वेगळ्या उंचीवर पोहोचले आहे. बाळ जन्माला घालून त्याला एकदम ब्रेक नाही लावायचा. ते एवढं मोठं पोट, तो लठ्ठपणा, आणि ते सगळं… नाही बाबा माझी तयारीच नाही.” आहना भडाभडा बोलून गेली.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: ज्ञानदेवता

अन्वेश मात्र शांत बसला होता.

“अन्वेश, तू बोल की काही. तुम्हाला मूल नकोय असं तर नाही ना? आई बाप व्हायचं तर त्या प्रक्रियेतून जावं लागेल. नैसर्गिक आहे ते.” सासूबाई बोलत होत्या, पण आहना गप्प होती.

“मला वाटतं, की तुम्ही दोघांनी डॉक्टरांकडे आणि समुपदेशकाकडे जावं. बाकी तुम्ही नीट विचार करा.” असं म्हणून त्या उठल्या. “आहना, आपण सरोगसीचा पर्याय निवडायचा का? मूल आपल्या दोघांचंच असेल, पण तुझ्या पोटात वाढणार नाही. तू निदान तितके नऊ महिने तरी मोकळी असशील. पण जन्मदातीकडून बाळ आपल्याकडे घेतल्यावर पुढे सगळं आपल्यालाच करावं लागेल ना? ते करण्याची तुझी तयारी आहे ना?”

“हो, आहे. आपण बऱ्याचदा बोललोय यावर, पण घरच्यांना तयार करणं हे मोठं आव्हान आहे . आपलं मूल जिच्या पोटात वाढेल तिची काळजी तर घ्यावीच लागेल आपल्याला. त्या सगळ्या दिव्यातून जावं लागेलच. किती अवघड आहे हे सगळं.”

घरच्यांच्या सल्ल्याने ते दोघं समुपदेशकाकडे गेले. तिथे या विषयावर सर्वंकष विचार झाला. आहनाची मानसिकता थोडी बदलायची आवश्यकता होती, बस. मूल दोघांचं असताना फक्त आईने सगळा त्रास का भोगायचा या तिच्या निसर्गाविरुद्ध जाऊन केलेल्या तात्विक विधानावर सविस्तर चर्चा झाली. दत्तक मूल, सरोगसी, हे सगळे पर्याय विचारात घेऊन झाले. मॅडम म्हणाल्या, “तुला इतर कुठलेही पर्याय मान्य नसतील तर फक्त वाट बघणे हा एकच पर्याय आहे. मूल माझ्याच पोटात का? या तुझ्या प्रश्नाला वैज्ञानिक उत्तर मी दिलंय. तुझं मन जोपर्यंत मूल जन्माला घालण्यासाठी तयार होणार नाही, तोपर्यंत तुला असे प्रश्न त्रास देत राहाणार. तुझं मन यासाठी जेव्हा हो म्हणेल त्या दिवसाची वाट पाहूया. मला खात्री आहे की तुझ्यातली ‘आई’ जागी झाली की हे बाकी प्रश्न डोकं वर काढणारच नाहीत. भेटू आपण लवकरच.”

अन्वेशला खात्री होती, की आपली बायको नक्की यावर विचार करेल. बाकी सुचवेल त्या पर्यायाला त्याची तयारी होतीच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

adaparnadeshpande@gmail.com