प्रश्न : मी पंचवीस वर्षाचा सुशिक्षित युवक आहे. माझी लहान बहीण अठरा वर्षांची आहे. माझ्या बहिणीला मुलांशी मैत्री करण्यात विशेष आवड असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. तिला दिवसभर व कधीकधी रात्री उशीराही वेगवेगळ्या मुलांचे फोन येतात. त्यांच्याशी अरेतुरेची भाषा वापरत लांबलचक गप्पा मारताना मी रोज पाहतो. कॉलेजमध्येही मुलांच्या घोळक्यात मुक्तपणे वावरताना मी तिला अनेकदा पाहिलं आहे. तिचं हे वाह्यात वागणं मला जराही आवडत नाही; तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, काही गोष्टी सांगितल्या, तर मोठा भाऊ म्हणून ती जराही माझं ऐकत नाही. आईलाही तिच्या वागण्यात फारसं गैर असं काही दिसत नाही. माझ्या वडिलांचं व माझं फारसं पटत नाही, त्यामुळे त्यांच्याशी हा विषय मी बोलू शकत नाही. वाहवत चाललेल्या माझ्या बहिणीला योग्य मार्गावर आणण्यासाठी मी काय करावं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : कोण आहे मीरा मुराटी?

उत्तर : तुमची बहीण एक मोकळ्या स्वभावाची, खेळकर वृत्तीची नवयुवती दिसते. तुम्हाला वाटतं तेवढी ती लहान मात्र नक्कीच नाही. या वयात समवयस्क मित्र मैत्रिणी असणं अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही वर्णिलेल्या तुमच्या बहिणीच्या वर्तनात वाह्यात असं काहीच नाही. तुम्ही पंचवीस वर्षांचे असूनही तुमचे विचार मात्र कट्टरपंथी दिसतात. आपल्या वयात येणाऱ्या मुलांबद्दल विशेषत: मुलीबद्दल आई अधिक सावध असते. मुलीच्या वागण्यावर तिचं पूर्ण लक्ष असतं कारण या वयातल्या मुलींबद्दल समजाने घालून दिलेली भीती प्रत्येक आईच्या मनात असते. असं असताना जर तुमच्या आईचं मत तुमच्यापेक्षा वेगळं असेल आणि तुम्ही लिहिल्याप्रमाणे ‘तुमच्या आईला तुमच्या बहिणीच्या वर्तनात फारसं गैर असं काही दिसत नाही,’ या वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. तुमची आई पुढारलेल्या विचारसरणीची दिसते. अशा आईकडून संस्कारीत होऊनही तुमचे विचार असे संकुचित रहावे, याचं आश्चर्य वाटतं. तुमच्या वडिलांशी तुमचं पटत नाही, ही बाबही दुर्लक्ष करण्यासारखी नाही. खरं तर तुमच्यामध्ये नेमके अंतर कशामुळे आले आहे याचाही विचार तुम्ही करावा.

आणखी वाचा : सलाम तिच्या जिद्दीला! बाळाला जन्म दिल्यानंतर तीन तासांतच दिली १० वीची परीक्षा!

केवळ तुमच्या प्रश्नाच्या आधारे तुमचं मनोविश्लेषण करायचं ठरवलं, तर असं जाणवतं, की तुम्ही स्वत: एका असह्य उद्विग्नतेतून जात आहात. अशा अवस्थेत अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज तुम्हाला आहे. तुमच्या उद्विग्नतेचा रोख बहिर्मुखी असल्याने तुमचे सर्वच संबंध तणावपूर्ण असण्याची दाट शक्यता आहे. यावेळी वैयक्तिक थेरपीची खरं तर तुम्हांला गरज आहे. पुष्पौषधी उपचारसुद्धा तुम्हाला खूप उपयोगी होईल… पण तोपर्यंत बहिणीचं पालकत्व पत्करणं थोडं टाळा. बहिणीवर आपल्या थोरलेपणाचा हक्क गााजवण्याने तिच्यात परिवर्तन घडणं तर दूरच, तुमच्यातील संबंधमात्र अधिक विकृत व तणावग्रस्त होतील. आणि कोणतीही गोष्ट केवळ चिंता करून, किंवा आपल्या चष्मातून एखाद्या व्यक्तीच्या वागण्याकडे बघत त्याचे अर्थ लावून स्वत:ला त्रास करून घेणं नेहमीच योग्य असेल असे नाही.

आणखी वाचा : यशोगाथा : ‘सिंगल मदर’ आईच माझी हिरो! संध्या रंगनाथच्या ट्विटनंतर क्रीडाप्रेमीही झाले भावूक!

सेक्सविषयीचे प्रश्न विचारा बेधडक
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elder brother worried about younger sisters open relationship with her friends vp
First published on: 27-02-2023 at 18:30 IST