फोर्ब्सने २०२४ मधील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जगभरातील २ हजार ७८१ व्यक्तींचा समावेश असून यांच्याकडे एकत्रितपणे १४.२ डॉलर ट्रिलिअन संपत्ती आहे. विविध बाजारपेठांमधील संपत्तीच्या वाढीमुळे गेल्या वर्षभरात २६५ व्यक्ती अब्जाधीश झाल्या आहेत. २०२३ च्या तुलनेत यंदा १५० अब्जाधीशांची वाढ झाल्याचं फोर्ब्सच्या यादीतून स्पष्ट होत आहे. दरम्यान, २ हजार ७८१ अब्जाधीश व्यक्तींमध्ये फक्त ३६९ महिला अब्जाधीशांचा समावेश आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट हे सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यांच्या संपत्तीमध्ये २०२३ च्या तुलनेत २२ डॉलर अब्जची वाढ झाली आहे. तर, टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनीही यावर्षी दुसरे स्थान कायम ठेवले आहे. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत अर्नॉल्ट यांचा गेल्या २८ वर्षे समावेश होत आहे. १९९७ मध्ये सर्वप्रथम ३.१ डॉलर बिलिअनच्या अंदाजे संपत्ती असताना त्यांचा समावेश झाला होता.
जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे?
अब्जाधीशांच्या यादीत पुरुषांचे वर्चस्व कायम आहे. तर फोर्ब्सच्या यादीनुसार महिला या यादीत अगदी नगण्य आहेत. एकूण २ हजार ७८१ अब्जाधीशांपैकी फक्त ३६९ म्हणजेच सुमारे १३ टक्केच महिलांचा समावेश आहे. २०२३ मध्येही १३ टक्केच महिलांचा समावेश या यादीत झाला होता. पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत महिला लॉरिअल पॅरीसच्या सीईओ ७० वर्षीय फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स ठरल्या आहेत. या फ्रान्समधील उद्योगपती आहेत. त्यांची अंदाजे संपत्ती ९९.५ डॉलर अब्ज आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत महिला वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांची मुलगी ॲलिस वॉल्टन आहे. यांच्याकडे ७२.३ डॉलर अब्ज आहेत.
हेही वाचा >> एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?
भारतात सर्वात श्रीमंत महिला कोण?
फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत भारतीय महिलेचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे. देशभरातील श्रीमंतांच्या यादीत रेणुका जगतियानी ४४ व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे ५ अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.
कोणत्या देशात सर्वाधिक अब्जाधीश आहेत?
अब्जाधीशांच्या सर्वाधिक संख्येसह युनायटेड स्टेट्स आघाडीवर आहे. या देशात जवळपास ८१३ अब्जाधीश व्यक्ती आहेत. चीन ४०६, भारत २०० आणि जर्मनी १३२ अशी क्रमवारी आहे.