प्राची पाठक

लोनसाठी किंवा कार इन्शुरन्ससाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन येतात. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज बाईचा आहे हे समजूनही ते लोक ‘सर – सर’ करत राहतात. जणू काही आर्थिक व्यवहार आणि स्त्रियांचा काही संबंधच नाही. पैशांच्या गुंतवणुकीचा आणि बायांचा तर त्याहूनही काही संबंध नाही, अशीच धारणा असते. शेवटी त्या लोकांना सांगायला लागतं, ‘‘अहो, तुम्हाला आवाज ओळखता येत नाही का बाईचा? सर सर काय लावलंय?’’ मग लाजेकाजेस्तोवर ते मॅडम वगैरे बोलतात. असा अनुभव आलाय का तुम्हाला?

हेही वाचा… आहारवेद : थंडावा देणारी चिंच

साधी सायकल दुरुस्त करायला गेलात तरी दुकानदार बाईकडे खालीवर बघतात आणि म्हणतात ‘‘सायकल रख के जाओ मॅडम, दो तीन दिन लगेंगे. आप के पति को भेज देना. आप क्यू लकलीफ लेती हो?’’ म्हणजे ती सायकल दुरुस्त कशी करणार, काय दुरुस्त करणार, त्याला किती खर्च येईल, हे बाईला समजू शकत नाही. सायकल दुरुस्त करायला आलेली कोणतीही व्यक्ती ही व्यक्ती नसते. तिला एक जेंडर जोडायचं. तिनं लग्न केलेलं असेलच, असं मानून चालायचं. त्यावर म्हणायचं, तुम्ही नको, त्या दुसऱ्या व्यक्तीला पाठवा. आम्ही त्या पुरुषाशी बोलू, असं सुचवायचं असतं. यात काही गैर आहे, असं त्यांना वाटत देखील नाही.

साधा सोफा सेट बघायला चार दुकानात फिरलात तर दुकानदार सहजच सांगतात, ‘‘मॅडम, आपके छोटे बच्चे भी खेलेंगे तो खराब नही होगा सोफा. चार आदमी बैठ के सो सकते है ऐसा सेटिंग है.’’ अरे, सोफा बघायला आलेल्या प्रत्येक बाईला नवरा, मूल असायची काय गरज आहे? मेडिकल रिपोर्ट्स काढायला गेलात तर तिथले कर्मचारी वाद घालत बसतात की आमच्या सिस्टीममध्ये लिहावंच लागेल, मिस आहे की मिसेस. साधीशी हिमोग्लोबिनची टेस्ट करायची असेल तरी नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये बिलिंग काउंटरला लोक विचारतात, ‘‘मिस अमुक लिहू का मिसेस अमुक?’’ एखाद्या विशिष्ट वैद्यकीय चाचणीला वैवाहिक स्थिती समजून घ्यायची गरज असेलही. परंतु एखाद्या बाईच्या रक्तामध्ये किती लोह आहे, याचा तिच्या लग्नाशी काय संबंध? पाय घसरून रस्त्यात पडल्यावर पायाचा एक्स रे काढायचा असेल, तर तिथे त्या अमुक स्त्रीच्या वैवाहिक स्थितीची नोंद सिस्टीम म्हणून तरी कशाला करायची आहे? असे प्रश्न पुरुषांना विचारले जातात का, की बाबा तू विधुर आहेस की विवाहित की एकटा की अविवाहित की परित्यक्ता?

हेही वाचा… स्वातंत्र्य दिन विशेष: भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील मणिपूरची ‘राणी गाइदिन्ल्यू’ !

एखाद्या कंपनीच्या कस्टमर केअरला तक्रार केलीत, ऑनलाईन काही प्रॉडक्ट मागवलं आणि ते रिटर्न करायचं असेल वगैरे, जिथे कुठेही स्त्रीचे नाव लिहायचे असते, लोक स्वतःहूनच थेट मिस किंवा मिसेस लिहून टाकतात. कंपनीच्या प्रॉडक्टच्या तक्रारीमध्ये कोणा तरी अज्ञात स्त्रीच्या वैवाहिक स्टेटसचा काय संबंध? आजकाल अनेक स्त्रिया माहेरचंच आडनाव लग्न झाल्यावरही ठेवतात. त्यांनी सासरचं नाव लावलं नसेल तरी लोकच त्यांच्या नावापुढे एक तर सासरचं आडनाव लावून मोकळे होतात किंवा उदाहरणार्थ, मिसेस ऐश्वर्या राय बच्चन असं लिहून टाकतात. तुम्ही मुळात त्या बाईला विचारलं का, तिला कसं नाव लिहिलेलं चालणार आहे?

तुम्ही ऑफिसच्या कामासाठी भाड्याच्या गाडीत प्रवास करत असाल किंवा तुमचा ड्रॉयव्हर असेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेल्यावर बाईकडे पैसे न मागता ड्रॉयव्हरकडे बघत तिथले पुरुष बोलतात, असाही अनेक स्त्रियांचा अनुभव आहे. आपल्या बाजूला बसलेल्या पुरुषाचा रोजगारच त्या स्त्रीने दिलेला असतो. तरीही, पैसे मागताना किंवा किती पेट्रोल टाकू ते विचारताना लोक सहजच पुरुषाकडे पाहत बोलतात. घरात दुरुस्ती काम करायला येणारे कारागीर, फर्निचरचं काम करणारे, असे सगळे लोक ‘स्त्रियांना त्यातलं काय कळतंय’, या अविर्भावात पुरुषाकडे बघत बोलत राहतात.

हेही वाचा… स्वातंत्र्य दिन विशेष: इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात पहिला मानवी बॉम्ब वापरणारी राणी ‘वेलू नचियार’!

स्त्रीकडे बघून बोलायची वेळ आली की नजर सतत वरखाली निरखत असते. कारण, अधिकाराच्या पदावर असलेली, सगळ्यातलं थोडं फार समजणारी, हातात स्वतःचा पैसा असलेली स्त्री पाहायची सवयच नसते. सवय असली, तरी तिच्याशी बोलायचं काय आणि कसं, ते कळत नसतं. मग असे सगळे मजेदार अनुभव स्वतंत्र राहणाऱ्या, स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांना येतात. डोकं शांत ठेवूनच या सर्व अनुभवांना टोलवून लावावं लागतं किंवा त्यांना वेगळं विश्व असूच शकतं, याची जाणीव करून द्यावी लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

prachi333@hotmail.com