नुकताच एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर पाहण्यात आला. सांगलीतील एका शाळेचा होता तो. तिथल्या विद्यार्थ्यांनी एका अनोख्या स्पर्धेत भाग घेतला, भाकरी भाजण्याच्या. जो सगळ्यात उत्तम भाकरी चुलीवर भाजेल तो विजेता. मुलं-मुली दोघंही त्या चुरशीच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात एक पाचवीत असणारा विद्यार्थी अगदी सहज म्हणून गेला, ‘मला भाकरी भाजायला खूप आवडते. आधी घरच्यांनी ही मुलींची कामं असतात म्हणून सांगितलं पण मला मात्र मजा येते म्हणून मी या स्पर्धेत भाग घेतो.’ अजून ‘खऱ्या’ जगाचा स्पर्श न झालेलं कोवळ्या मनाचं ते पोर हे काम बाईचं आणि हे पुरुषाचं अशी वर्गवारी न जाणता त्याला जे आवडतंय ते मनापासून करतंय हे पाहून बरं वाटलं खरं पण तो जेव्हा मोठा होईल तेव्हा कदाचित त्याची ही आवड हे ‘खरं’ जग त्याला फार काळ जगू देणार नाही हेही जाणवलं. पुरुषांनी हेच करायचं आणि बायकांनी हेच करायचं या विभागणीमुळे बाईचं जितकं नुकसान झालंय तितकंच पुरुषांचंही झालंय. सतत पुरुष असल्याचं एक अवजड आणि तितकंच पोकळ ओझं वागवण्यात त्यांचं आयुष्य निघून जातं. अगदी लहानपणापासून त्याचं ट्रेनिंग आपसूकच प्रत्येक घरात दिलं जातं. अगदी रंगांपासूनच हे अंतर अधोरेखित केलं जातं. गर्द हिरवा, गुलाबी, पिवळा, नारिंगी, अशा ‘बायकी’ रंगांपासून त्यांना आधीच लांब केलं जातं. पाळण्यात दिसणाऱ्या बाळाच्या पायांवर त्याच्या लिंगानुसार बायकी किंवा पुरुषी रंगांचे मोजे घातले जातात. आपली मजल रंगांमध्ये सुद्धा लिंगभेद करण्यापर्यंत गेली आहे. आणखी वाचा : …आणि रविवार असाच गेला! आपल्या भावना दुसऱ्यांसमोर मांडणं हे तर पुरुषी वृत्तीच्या अगदी विरुद्ध असं आपणच ठरवून टाकलं आहे. आपल्या आई-वडीलांच्या निधनाने धाय मोकलून रडलेले किती पुरुष पाहिले असतील आपण? लहानपणीच ‘मुलगी आहेस का रडायला’चं बाळकडू इतक्या जबरदस्तीने गळ्याखाली उतरवलेलं असतं की मोठं झाल्यावर पुरुष रडणंच विसरुन जातात. मला आठवतंय कॉलेजमध्ये असताना एका मित्राच्या खूप जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन झालं. ही बातमी ऐकताच तो थोडा वेळ स्तब्ध बसला आणि वरवरुन कोऱ्या वाटणाऱ्या नजरेने मला म्हणाला, ‘मला खूप रडायचंय, पण मला रडायलाच येत नाहीये.’ असहाय्य होऊन जणू तो मला सांगत होता की मला रडायला शिकव. साध्या मानवी भावनांनाही आपण लिंगभेदाचा रंग देऊन टाकलाय. मुलगी असेल तर ती लाजेल, रडेल, गालात हसेल पण राग, स्थितप्रज्ञता हे सर्व मुलाकडेच असायला हवं. कारण त्याला संपूर्ण घर सांभाळायचं असतं. खंबीर राहण्याच्या बुरख्याखाली त्याची सतत होणारी भावनिक कुचंबणा आपण अव्हेरायला तयार असतो. लग्नासाठी मुली शोधणाऱ्या एका मुलाशी गप्पा मारताना लक्षात आले की मुलींची प्रथम मागणी ही त्या मुलाचा पगार तिच्यापेक्षा कैकपटीने जास्त असावा अशी असते. घरचा कर्ताधर्ता हे त्याने न मागितलेलं बिरुद त्याला कधीकधी त्याच्या इच्छेविरुद्ध कायम मिरवावं लागतं. मग अशी घरं सांभाळणाऱ्या पुरुषांचा आणि त्यांच्याच मुशीत वाढलेल्या त्यांच्या मुलांमधला संवाद ऐकला तर जाणवतं की नोकरीच्या मुलाखतीमध्ये यापेक्षा जास्त संभाषण असतं. ‘नोकरी कशी सुरू आहे?’ किंवा ‘अभ्यास कसा चालू आहे?’ यापलीकडे त्या बोलण्यात फारसा जीव नसतो. आणखी वाचा : मैत्रीला एक्स्पायरी असते का? कधी पाहिलंय बाप आणि मुलगा हसतखेळत ऐसपैस वायफळ गप्पा मारताना…फार क्वचित. म्हणून मग आपल्या मनातलं बोलायला, मन मोकळं करण्यासाठी कित्येक पुरुषांना आपल्या माणसांपेक्षा दारू जवळची वाटते. कारण कदाचित ती त्या पुरुषाचं कमजोर होणं, अगतिक असणं, भावनिक होणं सामावून घेते असावी. ‘मर्द को दर्द नही होता’ या उबग आणणाऱ्या फिलॉसॉफीला आपण इतके कवटाळून बसलो आहोत की त्यामुळे होणाऱ्या नुकसानीकडे आपण कानाडोळा करतोय. अभिनेता आयुषमान खुरानाने काही वर्षांपर्वी एक कविता सादर केलेली, जेंटलमन किसे कहते है नावाची, त्यात एक ओळ आहे, जी खरंतर आता आपण सर्वांनीच अंगीकारणं गरजेचं आहे, तो म्हणतो ‘जिसको दर्द होता है, असल में वही मर्द होता है.’!