“ मैथिली, तू माझं काम केलंस का?”
“कोणतं काम आई.”
“अगं, असं काय काय करतेस, तुला किती वेळा सांगितलं, की मला एखाद्या चांगल्या वकिलांचा कॉन्टॅक्ट नंबर दे, मिहीरसाठी मला त्यांना भेटायचं आहे.”
“आई, तुला कितीवेळा सांगितलं की, मिहीरच्या भानगडीत तू पडू नकोस, त्याचे निर्णय त्याला घेऊ देत.”
“असं कसं म्हणतेस तू मैथिली, तो माझा मुलगा आहे आणि त्याचं सुख दु:ख मला जास्त समजतं. तो मितभाषी आहे, काही बोलू शकत नाही, पण त्याला काय हवंय हे मला कळतं. तो त्याच्या बायकोबरोबर खुष नाही,आणि ती त्याला कधीही सुखात ठेवू शकणार नाही. लग्न झाल्यापासून त्याची काय अवस्था झाली आहे तू ही बघते आहेस ना? तुझ्या संसारात तू सुखी आहेस म्हणून तुला भावाचं दु:ख समजत नाही, पण मी रोज त्याची अवस्था माझ्या डोळ्याने बघते आहे. तो ऑफिसमध्ये निघण्यापूर्वी मी त्याचा नाष्टा आणि डबा तयार ठेवायचे, संध्याकाळी घरी आल्यावर त्याला हवं नको बघायचे, पण कोमल यातलं काही करत नाही. काल दोघांचे वाद झाले आणि माझं पोरगं उपाशीपोटी झोपलं, तूच सांग मला किती त्रास झाला असेल? एक निर्णय माझ्या मनाविरुद्ध घेतला तर बघ त्याला कसा त्रास होतोय ते. म्हणूनच त्याला या लग्नबंधनातून मुक्त करून घ्यायचं आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मन चिंता करू लागलं तर?

सुमित्राताई बोलतच होत्या आणि आईला कसं समजावून सांगावं हे मैथिलीला कळत नव्हतं. मिहीर शेंडेफळ असल्याने तो लहानपणापासून आईचा खूप लाडका होता. त्याला कोणत्याही गोष्टीत काहीही कमी पडू नये याची काळजी त्या घ्यायच्या आणी त्यामुळेच त्याच्या बाबतीतील सर्व निर्णय त्याच घ्यायच्या. त्याने कोणते शिक्षण घ्यावे, कोणत्या स्पोर्ट्स मध्ये भाग घ्यावा, कोणते क्लासेस लावावे, कोणाशी मैत्री करावी, कोणाशी करू नये याबाबतीतील सर्व निर्णय त्यांनीच घेतले होते. लहानपणी तो आईचंच सर्व ऐकायचा, पण जसं जसं तो मोठा होऊ लागला तसं तसं आईचा त्याच्या आयुष्यातील हस्तक्षेप त्याला नकोसा वाटू लागला, तथापि, आईवर अतोनात प्रेम असल्यानं तो आईला कधींच दुखवायचा नाही आणि आईच्या म्हणण्यानुसार वागायचा.
कॉलेजमध्ये असताना मिहीरची कोमलशी मैत्री झाली. तो कधी कधी मित्र मैत्रिणींच्या सोबत तिला घरीही घेऊन यायचा, पण सुमित्राताईंना ती कधीच आवडली नव्हती. ती मुलगी तुझ्याशी जास्त लगट करते, तिला घरी आणू नकोस असंही त्यांनी मिहीरला सांगितलं होतं, पण या बाबतीत मिहीरनं कोणाचंही ऐकलं नाही. दोघांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हा सुमित्रा ताईंनी कडाडून विरोध केला, पण कोमलशिवाय मी जगूच शकत नाही, असं म्हटल्यामुळे आणि अनेक विनंत्या करूनही मिहीर कोमलला विसरू शकत नाही हे लक्षात आल्यावर अगदी नाईलाजाने त्यांनी मिहिरला लग्नाची परवानगी दिली.

आणखी वाचा : हम काले है तो क्या हुआ!

खरं तर, लग्न झाल्यानंतर प्रियकर-प्रेयसी या भूमिकेतून पती-पत्नी या भूमिकेत आल्यानंतर एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा बदलतात त्यामुळे सुरुवातीला एकमेकांना समजून घेणं अवघड होऊन जातं. बऱ्याच वेळ आपण उगाचंच लग्न केलं असंही वाटायला लागतं. लग्नाच्या पूर्वी एकमेकांच्या सोबत राहात नसताना एकमेकांना जेवढा वेळ दिला जायचा तेवढाही वेळ एकत्र राहात असूनही दिला जात नाही आणि त्यामुळं एकमेकांच्यात वाद होण्याची शक्यता असते. असेच वाद मिहीर आणि कोमल मध्ये सुरू झाले होते आणि त्यांचे मतभेद ऐकून माझा मुलगा या लग्नात खुष नाही आणि त्याला या लग्नबांधनातून मोकळं करून घ्यावं, असं सुमित्राताईंना वाटत होतं. आईची ही भूमिका चुकीची आहे हे मैथिली जाणून होती म्हणूनच ती आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होती.

आणखी वाचा : Open Letter: अहो गृहमंत्री, लक्ष कुठे देणार? दीपिकाच्या कपड्यांकडे की हुंडाबळींच्या मोठ्या संख्येकडे?

“आई, मिहीर आणि कोमल यांचा प्रेमविवाह आहे, ते दोघंही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात, एकमेकांशी बरोबरीनं वागतात. ते भांडत असले तरी पुन्हा एकत्र येतात म्हणून त्यांचे प्रश्न त्यांना सोडवू देत. मिहिरला कोमलसोबत संसार करताना काही अडचणी येणार आहेतच, पण त्याने स्वतः मार्ग काढणं आवश्यक आहे. आता तो केवळ तुझा मुलगा नाही, तर कोमलचा नवरा आहे. जबाबदारीनं निर्णय घेणं त्यालाही जमू देत. किती दिवस तू त्याला पुरी पडणार आहेस? बाबा आणि तू , तुम्ही दोघेच कुठतरी बाहेर ट्रीपला जा, नातवाला संभाळायचं आहे असं कारण सांगून काही दिवस माझ्याकडे राहायला या. त्या दोघांनाच एकमेकांसोबत खरंच रहायचं आहे की नाही? दोघांचं खरंच पटणार आहे का? हा निर्णय त्यांनाच घेऊ देत. कोमल पासून विभक्त राहून तो खरंच सुखी होणार आहे का?आई, तुला काय वाटतं हे महत्वाचं नाही तर त्या दोघांना काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे, मिहीरच्या तात्पुरत्या सुखाचा विचार करू नकोस तो आयुष्यभर सुखी कसा राहील याचाच विचार कर.”
“ मैथिली, खरंय तुझं. त्यांचा निर्णय त्यांनाच घेऊ देत. शेवटी काय, त्याचं सुख हेच माझं सुख. मी केवळ माझ्या दृष्टीकोनातून विचार केला. आज मी अल्लड मुलीसारखी वागले, पण तू मला आईसारखं समजून सांगितलंस. खरंच आम्ही दोघे युरोप टूर्सच प्लॅनिंग करतो आणि त्या दोघांनाच त्यांचा विचार करण्याचं स्वातंत्र्य देतो.”
सुमित्रा ताईंना लेकीशी बोलून हलकं वाटलं आणि आपली मुलं समजदार आहेत याचं कौतुकही वाटलं. उगाचंच आपण काळजी करत राहतो, आता आपलंही सेकंड इनिंग आनंदात घालवू हा विचार करीत त्या पुढच्या नियोजनाला लागल्या.
smitajoshi606@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get yourself out of your son and daughters day to day life let them live vp
First published on: 16-12-2022 at 19:47 IST