अपर्णा देशपांडे

आपल्या आयुष्यात चांगले, समजूतदार नातेवाईक असणं आणि त्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं, ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. बहुतांश वेळा आपले जवळचे नातेवाईक आपलं भलं चिंतणारे असतात, पण काही जणांच्या बाबतीत तसं घडत नाही. आता तसं बघितलं तर मत्सर, स्पर्धा, ईर्ष्या, हेवेदावे, राग, हे सर्वसाधारण मनुष्य स्वभावाचे गुणधर्म आहेत. काही प्रमाणात आपणा सर्वांमध्ये हे गुण असतातच. त्याचं प्रमाण जेव्हा एका मर्यादेपेक्षा जास्त होतं, तेव्हा मात्र तो काळजीचा विषय बनतो. हे हेवेदावे किंवा मत्सर करणारे आपले नातेवाईकच असतील, तर मात्र जरा सांभाळूनच राहायला हवं. आपले नातेवाईक आपल्याशी तुलना करून टोमणे मारत असतील, तर तिथल्या तिथे त्यांना सडेतोड उत्तर देऊन किंवा खुबीने त्यांचे वाक्य त्यांच्याच घशात घालून आपली भावनिक कोंडी सोडवता आली पाहिजे.

कविता आणि सारंगची ( नाव बदलले आहे ) परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशी होती . मुलं खूप अभ्यासू आणि हुशार. तिची मोठी बहीण मात्र श्रीमंतीत लोळत होती. मोठा बंगला, मोठ्या गाड्या, परदेशी सहली, अशी चंगळ होती. मोठ्या बहिणीचे पती कायम त्यांच्या श्रीमंतीचा दिमाख दाखवत असत. एकदा मोठ्या बहिणीला कविताकडे मुक्कामाची वेळ आली. घरात ए.सी. नाही, छोटी जुनीच कार आहे, स्वयंपाकाला बाई नाही, या गोष्टींवरून मोठीचा नवरा टोमणे मारत होता. वेळीच योग्य ‘इन्व्हेस्टमेंट’ करुन पैसा वाढवण्याचे सल्ले देत होते. सारंग दुखवला जाईल म्हणून कविता विषय बदलत होती, पण तिचे भाऊजी पुन्हा पुन्हा तेच बोलत होते. कविताला ते सहन झालं नाही आणि ती म्हणाली, ” माझा निर्व्यसनी नवरा हा माझा सर्वांत मोठा दागिना आणि माझी अत्यंत हुशार मुलं ही माझी श्रीमंती! चाळीस लाखांच्या गाडीत फिरताना जर एखाद्याला व्यसनी मुलांची काळजी पोखरत असेल, तर खरा श्रीमंत कोण हे तपासायची गरज आहे. आमची सगळी गुंतवणूक संस्कारी मुलं घडविण्यात आहे. पैसा काय, आज आहे उद्या नाही.” हे बोलून तिनं बोलणाऱ्याचं तोंड बंद केलं.

संजना ( नाव बदललं आहे) ‘सी.ए.’च्या परीक्षेची तयारी करत होती. परीक्षा कठीण असल्यानं कुठल्याही कौटुंबिक समारंभात फारशी सहभागी न होता ती अभ्यासात मग्न असायची . तिच्या मामेबहीणीच्या- मीनलच्या लग्नात तिला इच्छा असूनही आठ दिवस आधी जाता आलं नाही, कारण परीक्षा होती. पेपर देऊन ती वेळेवर लग्नाला गेली. तिच्या मामींना तिचं हे असं वेळेवर येणं आवडलं नाही . त्या म्हणाल्या, “बहिणीच्या लग्नापेक्षा तुम्हाला तुमच्या परीक्षांचं पडलेलं असतं. बघू आता किती मार्क पडतात ते !” संजना म्हणाली, “ती परीक्षा खरंच खूप अवघड असते. पहिल्या प्रयत्नात जमेलच असं नाही. पण मी पूर्ण जीव तोडून अभ्यास केला होता.” मामी म्हणाली, “इतकी अवघड परीक्षा द्यायचीच कशाला? तू मीनलच्या लग्नाची जबाबदारी टाळून परीक्षा दिलीस खरी, आता पास नाही झालीस तर?” त्यावर संजना म्हणाली, “मी पुन्हा प्रयत्न करेन. अपयशाच्या भीतीने परीक्षा देणं बंद करणार आहोत का आपण? मला सांग मामी, कित्येक लग्न अपयशी ठरतात, घटस्फोट होतात. पण म्हणून लग्नच करायचं नाही असं सर्व लोक ठरवतात का? मीनल ताईचं लग्न केलं ना आपण?” हे उदाहरण मात्र मामीला चटकन समजलं आणि तिनं विषय बदलला .

सविताबाईंना दोन नातू झाले आणि मानसीताईंना नात झाली. त्यावरून सविताताई म्हणाल्या, ” वंशाला दिवा लाभायला भाग्य लागतं.” मानसीताई हसत त्यांना म्हणाल्या, “तुमचे आईवडील मात्र फारच भाग्यवान ठरले हो ताई! तुम्ही तिघी बहिणीच, पण तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही बहिणींनी आईवडिलांचे नाव केले हो. मी तुमचं उदाहरण देत असते नेहमी सगळ्यांना. वंशाचं नाव उज्वल करायला मुलगा काय अन् मुलगी काय सारखंच, हे मी तुमच्याकडूनच शिकले! सविताताईंना त्यांची चूक लगेच लक्षात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे असं तिथल्या तिथे समोरच्याचं तोंड गप्प करणं जमलं पाहिजे. त्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीचा अपमान करावा लागतो असं मुुुळीच नाही. काही मंडळी कुजकट बोलून आपल्याला टोचण्यात आनंद मिळवतात आणि आपण निमूटपणे ऐकत बसलो, तर मनात त्याचा सल राहतो. शाब्दिक टोले हसत हसत परतावून लावले, की आपल्या मनावर ओझं राहात नाही! कधीतरी करून बघा!

adaparnadeshpande@gmail.com