वनिता पाटील

‘हो, माहितीये तू मोठी इंग्लंडची महाराणी लागून गेली आहेस ते…’
राणी एलिझाबेथ द्वितीयने हे वाक्य ऐकलं असेल की नाही माहीत नाही, पण जवळपास प्रत्येक सामान्य मुलीने तिच्या आयुष्यात हे वाक्य एकलेलंच असतं. थोडक्यात काय तर राणी एलिझाबेथ द्वितीय सारखा तोरा तू नाही करायचास…

पण राणी एलिझाबेथ द्वितीयने कुठे केला होता असा तोरा. अत्यंत साधा दिसणारा पण तितकाच अभिजात असा पेहराव, हलकासा मेकअप, गळ्यात मोत्यांचा सुंदर सर, हातात देखणी पर्स आणि डोक्यावर सुरेख टोपी घालून सगळीकडे तुरूतुरू चालणारी इंग्लंडची महाराणी ती.

आपल्या आसपासच्या सत्तरीच्या पुढे गेलेल्या आज्यांची निर्वाणीची भाषा सुरू झालेली असते. पैलतीराकडे डोळे लागलेले असतात. सांध्यांनी असहकार पुकारलेला असतो. आज्ज्या- आज्ज्यांमध्ये औषधं- बाम यांची सतत चर्चा सुरू असते. नव्या म्हणजे नातवांच्या जगात काय चाललंय ते त्यांना अजिबात उमगत नसतं. आणि तिकडे ही नव्वदी पार केलेली जगाची आज्जी मस्त फॅशन स्टेटमेंट करून फक्त इंग्लंडवरच नाही तर सगळ्या जगावर आपला प्रेमाचा दाब ठेवत फिरत होती.

तसा आपला आणि तिचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. कारण तिने १९५२ मध्ये राणीपदाचा मुकूट घातला तेव्हा आपण इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून बसलो होतो. पण तरीही विशेषतः ज्यांनी ‘क्राऊन’ ही वेबसीरिज पाहिली असेल त्यांच्यासाठी तरी राणी एलिझाबेथ द्वितीयचं जाणं म्हणजे आपल्या घरातलंच कुणीतरी पिकलेलं माणूस जाणं…

राणीचा १९२६ चा जन्म आणि २०२२ चा मृत्यू, म्हणजे जवळपास अख्खं एक शतक सत्तापदावर बसून बघणं म्हणजे तिने काय काय बघितलं असेल नाही?

या एलिझाबेथ द्वितीयचं सगळं आयुष्यच चक्रावून सोडणारं… तिच्याकडे आलेलं राणीपद खर तर योगायोगाचं किंवा नशिबाचं. काकाने सोडलेलं सिंहासन तिच्या वडिलांना मिळालं आणि वडिलांनंतर तिला. वडिलांचा मृत्यू झाला त्या रात्री केनियात फिरायला गेलेली एलिझाबेथ जंगलातल्या एका झाडाच्या मचाणावर मुक्कामाला होती. पहाऱ्याला होते भारतात सुप्रसिद्ध असलेले जिम कॉर्बेट. दुसऱ्या दिवशी ती झाडावरून खाली उतरली ती इंग्लंडची महाराणी म्हणूनच.

ती इंग्लडला परतली तेव्हा सगळे जुने पाश तुटले होते. नातीगोती, कुटुंब नाही तर कर्तव्य महत्त्वाचं होतं. राणीपद ही तिची चैन नव्हती तर तिचं कर्तव्य होतं. त्यामुळेच तिची आई, बहिणी त्यांच्या लाडक्या लिलिबेटला नाही तर इंग्लंडच्या महाराणीला मुजरा करण्यासाठी तिच्यासमोर उभ्या होत्या… आणि तितक्याच करारीपणे आणि शालीनतेने एलिझाबेथ ते मुजरे घेत होती. आता तिचे नवे पाश जुळले होते ते इंग्लंडच्या जनतेशी. कारण आता ती त्यांची फक्त राणी नव्हती तर त्यांच्या धर्मसंस्थेची, चर्चची प्रमुखदेखील होती. आपण इंग्लंडच्या जनतेचे पालक आहोत हा आपला आब राणीने अगदी अखेरपर्यंत राखला.

खरं तर तसं पाहिलं तर गमतीशीरच आयुष्य होतं एलिझाबेथचं. लोकशाहीचे गोडवे गाणाऱ्या देशामधल्या राजेशाहीसारख्या सरंजामी परंपरेची ती प्रमुख. राजेशाही असावी या बाजू ने इंग्लंडमधल्या लोकांनी एकेकाळी मतदान केलं होतं. म्हणजे लोकशाही देशातली लाडकी, पाळीव मांजरंच एक प्रकारे. लोकांना त्यांच्या मनोरंजनासाठी हवा असलेला राजा -प्रजा हा खेळ. तो राजघराण्याने प्राणपणाने खेळायचा, ही त्यांची अपेक्षा. आपली ही जबाबदारी राणी एलिझाबेथने अचूक ओळखली आणि पार पाडली.

काय काय नाही बघितलं तिनं? दुसरं महायुद्ध… इंग्लंडचा जगातला वरचष्मा कमी होत जाणं, अमेरिकेचा वाढत जाणं… शीतयुद्ध… डायनामुळे झालेला वाद, तिची घुसमट, तिचा मृत्यू, मुलाने नव्याने मांडलेला डाव… राजघराण्यातल्या नव्या पिढीचा उदय… करोनाची महासाथ… पती फिलिपचा वियोग… ब्रिटनच्या १४ का १५ पंतप्रधानांना शपथ दिली तिने. आणि या सगळ्यातही सामान्य माणसांशीही तिची नाळ जोडलेली राहिली.

आपण कोण आहोत याचं अचूक भान असलेली व्यक्ती म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय असं तिचं नेमकं वर्णन करता येईल. आता ती गेलीच. सगळ्यात जास्त काळ राणीपदावर राहिलेली ब्रिटनच्या राजघराण्यातली व्यक्ती अशी तिची इतिहासात नोंद होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण महाराणी आहोत या तोऱ्यात ती कधी दिसली नाही, पण जगातल्या प्रत्येक सामान्य मुलीसाठी मात्र ती ‘तू काय इंग्लंडची महाराणी लागून गेली आहेस का?,’ हे स्टेटमेंट देऊन गेली आहे.