मालती या संथाली समुदायातील असल्याने त्या मुलांना त्यांच्या संथाली मातृभाषेत शिकवू लागल्या. नंतर संथाली सोबत बंगाली, थोडेफार इंग्रजी शिकवू लागल्या. जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा सुरुवातीला ५-६ मुलेच होती. त्यांच्या शिकवणीची पद्धत अगदी निराळी आहे. मुलांना अवघड, नकोसे वाटणारे शिक्षण त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने आणि खेळाच्या रुपातून शिकवत मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. हळूहळू गावातील इतर मुला- मुलींनादेखील शिक्षणामध्ये आवड निर्माण होऊ लागली आणि काही दिवसांतच विद्यार्थ्यांची संख्या २०, ४०, ५० अशी वाढतच गेली.

शिक्षण हा देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु समाजातील अनेक घटक आजही शिक्षणापासून वंचित आहेत. आज आपण शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण, स्पर्धा, फी वाढ यावर चर्चा करतो, दुसरीकडे पश्चिम बंगालमधील झिर्लिंगसेरेंग या आदिवासी गावातील एका महिलेने केवळ चर्चा न करता स्वत: कृती करून जगासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी त्यांच्या गावातील मुलांसाठी एक शाळा सुरू केली- तेही कोणत्याही सोयीसुविधा नसताना. फक्त एक झोपडी आणि काळा बोल्ड. आजच्या घडीला त्याच्यांकडे ४५ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आपले भवष्यि उज्वल करण्याचे स्वप्ने पाहत आहेत. अशा या आदर्श महिलेचे नाव आहे मालती मुर्मू.

मालती मुर्मू यांचे शिक्षण १२ वीपर्यंत झाले आहे. २०१९ मध्ये लग्नानंतर त्या नवऱ्याच्या गावी आल्यावर त्यांना जाणवले की या आदिवासी गावातील मुलांना/ लोकांना शिक्षणाचा गंधसुद्धा नाही. जवळच्या गावात सरकारी शाळा असली तरी सुसज्जतेचा अभाव, शिक्षकांची अनुपस्थिती आणि आदिवासी लोकांकडे पाहण्याचा तुच्छ दृष्टिकोन यामुळे आदिवासी समाजासदेखील शिक्षणामध्ये फारसा रस नव्हता. १२ वीपर्यंत शिक्षण झालेल्या मालती यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्यामुळे त्यांनी स्वत: शिक्षक बनून आपल्या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा विडा उचलला.

गावात शाळा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हते. त्यांची स्वत:ची घरची परिस्थितीदेखील बेताचीच. परंतु सोबत होते ज्ञान, शिक्षणाची ओढ आणि आपल्या मुलांसाठी- समाज बदलासाठी वाटणारी आंतरिक तळमळ. त्यांच्या या प्रयत्नांना पतीचादेखील पूर्ण पाठिंबा मिळाला.

मातृभाषेतील शिक्षण हीच शिक्षणाची गोडीची पहिली पायरी…

मालती या संथाली समुदायातील असल्याने त्या मुलांना त्यांच्या संथाली मातृभाषेत शिकवू लागल्या. नंतर संथाली सोबत बंगाली, थोडेफार इंग्रजी शिकवू लागल्या. जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा सुरुवातीला ५-६ मुलेच होती. त्यांच्या शिकवणीची पद्धत अगदी निराळी आहे. मुलांना अवघड, नकोसे वाटणारे शिक्षण त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने आणि खेळाच्या रुपातून शिकवत मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. हळूहळू गावातील इतर मुला- मुलींनादेखील शिक्षणामध्ये आवड निर्माण होऊ लागली आणि काही दिवसांतच विद्यार्थ्यांची संख्या २०, ४०, ५० अशी वाढतच गेली.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मुले लिहू, वाचू लागलेत हे पाहून पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व कळू लागले. मातृभाषेत शिक्षण मिळू लागल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढला. पण हे सर्व काही एवढे सोपे नव्हते. सुरुवातीला साध्या झोपडीत, माती, तट्ट्यांच्या भिंतीत सुरू झालेला हा शिकवणी वर्ग गावातील लोकांच्या मदतीने थोडासा भक्कम म्हणजे बांबू- गवताच्या आधारावर एक छत उभारून तिथे वापरात नसलेले घरातील फडकी, चादर अंथरून मुलांना बसण्यायोग्य आसनव्यवस्था करण्यात आली. पुढे सोशल मीडियावर ही बातमी पसरताच काही स्वयंसेवी संस्थांनी आणि आजूबाजूच्या दानशूर लोकांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन चांगला ब्लॅकबोर्ड, वह्या, पुस्तके, दप्तरे अशा स्वरुपात मदत केली. थोडीफार आर्थिक मदतदेखील मिळू लागली. पण मालती ही आर्थिक मदत स्वत:साठी न वापरता शाळेवर खर्च करतात.

मालती मुर्मू एका मुलाखतीत म्हणतात की, माझे शिक्षणदेखील जेमतेम झालेले आहे. पण जेवढे काही शिकले त्यामुळे मला शिक्षणाचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे माझ्या जीवनाला एक दिशा मिळाली आहे. लग्नानंतर गावात आल्यावर माझ्या लक्षात आले की सरकारी कागदपत्रे लोकांना वाचता येत नाहीत. त्यात काय लिहिलं आहे हे जाणून घेण्यासाठी ते सर्वजण कागदपत्रे घेऊन माझ्याजवळ येत असत. समाजाची ही अवस्था पाहून मी मनाशी ठाम निश्चय केला की आपला नवरा तर कुटुंबासाठी रोजीरोटीची व्यवस्था करतोय तर आपण समाजाच्या भविष्याच्या रोजीरोटीसाठी काहीतरी करूया. माझा हा विचार मी माझ्या पतीला बोलून दाखवल्यावर त्यांनीदेखील आनंदाने होकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालती मुर्मू यांचे हे कार्य शिक्षणसंस्थांसाठी आणि आपल्या परिस्थितीवर रडत बसणाऱ्यांसाठी एक जिवंत उदाहरण आहे. पैसा आणि सोयीसुविधा नसतानादेखील निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात बदल घडवता येतो. शिक्षण म्हणजे केवळ एक प्रमाणपत्र नसून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठीचे मुख्य साधन आहे. शिक्षणामुळे आपली मुलेदेखील मोठे अधिकारी, डॉक्टर, अभियंते होतील अशी स्वप्ने गावकरी पाहू लागले आहेत.
rohit.patil@expressindia.com