उत्तरा मोने

नातेसंबंध हे माझ्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहेत. या नात्यात संवादाचा सेतू जर नीट बांधला गेला तर मग आयुष्य नेहमीच सोपं होऊन जातं. या सगळ्यात आपल्यावर झालेल्या संस्काराची भूमिका खूप मोठी आहे, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. माझ्या माहेरी आम्ही तिघी बहिणी, आईलाही (रजनी वेलणकर) तीन बहिणी, बाबाही (प्रदीप वेलणकर) तीन बहिणींचे एकटेच भाऊ. म्हणजेच आमच्या घरात मुळातच स्त्रियांची संख्या जास्त आणि घरातल्या सगळ्या बायका करिअर करणाऱ्या होत्या. माझी आजीसुद्धा नोकरी करायची, अनेक कार्यक्रम करायची. तसंच घरातले पुरुषही घरातली सगळी कामं करणारे होते. माझे आजोबा दूध तापवायचे, भाजी निवडायचे. त्यामुळे आमच्या घरी ही कामं पुरुषांची ही कामं स्त्रियांची असं नव्हतं. जो घरात असेल त्यानं घर सांभाळायचं. प्रसंगी घरातली कामंही करायची. त्यामुळे आमच्या घरात भेदाभेद नव्हता. आम्ही ‘माणूस’ म्हणून वाढलो.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

घरात एखाद्या विषयावर निर्णय घ्यायचा असेल किंवा काही समस्या असेल तर चर्चा करून त्यावर तोडगा निघायचा. प्रत्येकाला बोलण्याचं, व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य होतं. त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन, अगदी प्रेमाने आम्ही राहात होतो. एखाद्या कठीण प्रसंगातही सगळे एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचो. संस्कारांचा हा पाया मजबूत असल्यामुळे लग्नानंतर त्या घराला समजून घेणं मला सोपं गेलं. अर्थात काही गोष्टी दोन घरं म्हटल्यानंतर वेगळ्या होत्या. मला सासूबाई नाहीत त्यामुळे माहेरी आम्ही सगळ्या बायका आणि सासरी नवरा (अभिजीत साटम), दीर, सासरे (शिवाजी साटम) त्यामुळे इकडे सगळे पुरुष. शिवाय आमच्या जाती वेगळ्या. त्यामुळे खाण्याच्या पद्धती वेगळ्या. पण एक समान धागा होता तो म्हणजे सासरीही सगळेच या क्षेत्रात काम करणारे होते त्यामुळे माझं काम किंवा कमिटमेंट काय हे मला समजून सांगावं लागलं नाही. त्यामुळे नातेसंबंध सांभाळताना सासरच्यांचाही पाठिंबाच मिळाला. म्हणजे मी रात्रभर शूटिंग करून आले की मला सकाळी झोपता येत होतं किंवा सणासुदीला, महत्त्वाच्या कार्यात मी जाऊ शकले नाही तरी नातेवाईकांनी मला समजून घेतलं. पण अर्थात मी ही घरी असताना पूर्णपणे घरासाठी वेळ दिला.

मी सगळ्यांशी नातं जपलं. कारण मी माझ्या लहानपणापासून आईचा उरक पाहिलेला आहे. आई शाळेत शिक्षिका होती. ३५ वर्षं घर, शाळा, नाटक हे सगळं करताना आईला मी पाहिलंय त्यामुळे तेच मीही करत आले. तो समतोल साधता आला की नाती सांभाळणं सोपं होतं. करिअर करताना मुलांना क्वॉलिटी टाइम देणं. त्यांच्या जडणघडणीत सगळ्याच गोष्टींची उत्तम सांगड घालता येणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी युवनला वाढवताना जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या आज तो नऊ वर्षाचा आहे. या नऊ वर्षांत ज्या ज्या उत्तम गोष्टी त्याच्यापर्यंत मला पोहोचवता आल्या त्या मी पोहोचवल्या. छोट्या छोट्या गोष्टीतही माणूसपण कसं जपता येतं हे कृतीतून त्याच्यापर्यंत पोहोचवलं. युवनमध्ये जाणिवा रुजवण्याचा प्रयत्न केला. युवनच्या वाढदिवसाला एक वेळचं तरी जेवण आणि केक मी घरी करते. म्हणजे वाढदिवस साधेपणानेही करता येतो. हे त्याला कळलं पाहिजे. पण त्याचबरोबर आम्ही घरातले सगळे एकत्र बाहेर जाऊन मजाही करतो. आम्ही सगळेच मनोरंजनाच्या या क्षेत्रात काम करत असल्यामुळे सगळ्यांच्या वेळा जमणं मुश्कील असतं. जेव्हा आमची सगळ्यांचीच वेळ जुळते तेव्हा तोच आमच्यासाठी सण असतो. त्यामुळे युवनला त्यातला आनंदही अनुभवता येतो. त्याच्या लहानपणापासून मी एक गोष्ट आवर्जून पाळली ती म्हणजे मी कधीही त्याच्याशी खोटं बोलले नाही. तो अगदी ३/४ महिन्यांचा असल्यापासून मी काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला तर नाटकाच्या तालमीलाही मी त्याला घेऊन जात असे. त्याला जेव्हा कळतही नव्हतं तेव्हाही मी बाहेर जाताना त्याच्या कानात सांगून जात असे, की मी नाटकाच्या प्रयोगाला जाते आहे किंवा मी दौऱ्यावर जाते आहे. म्हणजे त्याच्या नकळत्या वयापासून आई कुठे जातेय, कधी परत येणार हे त्याला माहिती असायचं.

आता लॉकडाऊनमध्ये सगळेच घरी होतो तेव्हा आम्ही एकमेकांबरोबर उत्तम वेळ घालवला, पण जेव्हा लॉकडाऊननंतर एकदा मी माझ्या मैत्रिणींबरोबर बाहेर गेले तेव्हाही मला काम आहे म्हणून मी बाहेर जातेय असं खोटं सांगून गेले नाही. तर आज मीही कंटाळले आहे. मला माझं अवकाश हवं आहे म्हणून मी जातेय असं सांगितलं. प्रत्येकाला ही स्वतःचं अवकाश हवं असतं. हे त्याला समजावलं. मुलांना या गोष्टी समजावून सांगितल्या तर त्या नक्की कळतात. अर्थात आई आपल्यासाठी नेहमीच वेळ देते. खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहाते हा विश्वासही आपण मुलांना द्यायला हवा आणि तो देण्याचा प्रयत्न मी नेहमीच करते. तो स्वावलंबी झाला पाहिजे, याकडेसुद्धा माझं लक्ष असतं. त्याची शाळा निवडतानासुद्धा मी हाच विचार केला. सरधोपटपणे स्पर्धा न करता वेगळा विचार, वेगळे संस्कार देणाऱ्या शाळेत मी त्याला घातलं. मी स्वतः शाळेत असताना लाजरीबुजरी होते, अभ्यासात आपण हुशार नाही याचा एक न्यूनगंड मला होता. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला येत असूनही मी लहानपण एन्जॉय केलं नाही. हे युवनच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी त्याला अशा शाळेत घातलं जिथे ७वीपर्यंत परीक्षाच होत नाहीत. पण त्यामुळे स्पर्धात्मक जगाशी त्याचा संपर्कच नाही.

एकदा असं झालं की सोसायटीत बॅडमिंटनच्या स्पर्धेत त्याने भाग घेतला. दोन मॅचेस तो जिंकला आणि तिसऱ्या मॅचला एक १४ वर्षांचा मुलगा नऊ वर्षांच्या युवन समोर आला. युवनला खूप भीती वाटली. तेव्हा मी त्याला शांत केलं, समजावलं की स्पर्धेत भाग घेणं महत्त्वाचं असतं. हरणं-जिंकणं या दुय्यम गोष्टी आहेत. मग आपल्या भीतीवर मात करत त्या स्पर्धेत त्याने ब्राँझ मेडल मिळवलं. त्यामुळे पालकांनी शांतपणे बसून मुलांशी बोलणं हे खूप महत्त्वाचं असतं. हे सगळं शिकण्यासाठी मी आणि अभिजितने साडेतीन महिन्यांचा ‘पेरेंटिंग कोर्स’सुद्धा केला. आज युवन नऊ वर्षांचा असूनही स्वतः पाणी गरम करतो, दूध गरम करून घेतो, स्वतःचं ताट धुतो, एकदा मला बरं नव्हतं तर आपणहून त्याने मला लिंबू सरबतसुद्धा करून दिलं. थोडक्यात समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणंसुद्धा त्याला उत्तम जमतं. आपल्या मुलांना वाढवताना पालक म्हणून आपण आपल्या निर्णयांवर ठाम राहाणं आणि त्यासाठी लागेल तितकी मेहनत करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणूनच तर म्हणतात ना, वन्स अ मदर ऑलवेज अ मदर